ऊर्जा मंत्रालय

‘पीएम-कुसुम’ योजनेअंतर्गत नोंदणी करण्यास सांगणाऱ्या फसव्या संकेतस्थळांविरुध्द ‘एमएनआरई’ने नवीन मार्गदर्शक नियमावली जारी केली

Posted On: 10 JUL 2020 6:25PM by PIB Mumbai

 

नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने (एमएनआरई) आज ‘प्रधानमंत्री किसान ऊर्जा एवं उत्थान महाअभियान-(पीएम-कुसुम)’ योजने अंतर्गत नोंदणीचा दावा करणाऱ्या फसव्या संकेतस्थळांविरुध्द नवीन नियमावली जारी केली. दोन नवीन संकेतस्थळांनी ‘पीएम-कुसुम’ योजनेसाठी नोंदणी पोर्टलचा बेकायदेशीरपणे दावा केल्याचे अलिकडेच लक्षात आले आहे.

या  संकेतस्थळांचे ‘वेब ऍड्रेस’ पुढीप्रमाणे आहेत-

https://kusum-yojana.co.in/  आणि https://www.onlinekusumyojana.co.in/

या संकेतस्थळांमागील उपद्रवी लोक सर्वसामान्यांना फसवत आहेत व या बनावट पोर्टलद्वारे हस्तगत केलेल्या माहितीचा गैरवापर करत आहेत. ‘एमएनआरई’ या संकेतस्थळांमागील उपद्रवी लोकांविरोधात कारवाई करत आहे. मंत्रालयाने सर्व संभाव्य लाभार्थ्यांना, तसेच सर्वसामान्य लोकांना याची माहिती द्यावी व या संकेतस्थळांवर पैसे किंवा माहिती जमा करणे टाळावे, अशी सूचना करण्यात आली आहे.

तसेच, ‘न्यूज पोर्टल’ना देखील सूचना करण्यात आली आहे कि, त्यांनी डिजिटल किंवा प्रिंट प्लॅटफॉर्मवर सरकारी योजनांसंबंधी माहिती प्रकाशित करण्यापूर्वी सरकारी योजनांसाठी नोंदणी पोर्टल असल्याचा दावा करणाऱ्या संकेतस्थळांची सत्यता तपासून पहावी.

पीएम-कुसुम योजनेला 8 मार्च 2019 रोजी ‘एमएनआरई’ने प्रशासकीय मान्यता जारी केली. 22 जुलै 2019 रोजी योजनेच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली. या योजनेत सौर पंप बसविणे, विद्यमान ग्रीड-संलग्न कृषी पंपांचे सोलराइझेशन, तसेच ग्रीड संलग्न केलेल्या नवीकरणीय उर्जा प्रकल्पांची तरतूद आहे. ही योजना सुरू झाल्यानंतर असे लक्षात आले की, पंतप्रधान-कुसुम योजनेसाठी नोंदणी पोर्टल असल्याचा दावा करणारी काही संकेतस्थळे निर्माण झाली आहेत. सर्वसामान्यांचे नुकसान होऊ नये म्हणून, ‘एमएनआरई’ने यापूर्वी 18 मार्च 20193 मार्च 2020, रोजी नियमावली जारी केली होती; लाभार्थी तसेच सर्वसामान्य जनतेला कोणतेही नोंदणी शुल्क जमा न करण्याची व अशा संकेतस्थळांवर  त्यांची माहिती सामायिक न करण्याची सूचना केली होती.

मंत्रालयाद्वारे सर्व हितधारकांना असे कळविण्यात आले आहे की, पंतप्रधान-कुसुम योजना संबंधित राज्यात अंमलबजावणी संस्थांमार्फत राबविली जात आहे. अशा संस्थांचा तपशील एमएनआरईच्या www.mnre.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ‘एमएनआरई’ आपल्या कोणत्याही संकेतस्थळाद्वारे या योजने अंतर्गत लाभार्थ्यांची नोंदणी करत नाही; म्हणूनच या योजनेसाठी ‘एमएनआरई’चे नोंदणी पोर्टल असल्याचा दावा करणारे कोणतेही पोर्टल दिशाभूल करणारे व बनावट आहे. कोणतेही संशयित संकेतस्थळ कुणाला आढळले तर त्याची माहिती ‘एमएनआरई’कडे कळवू शकता.

योजनेतील सहभागासाठी पात्रता व अंमलबजावणी प्रक्रियेची माहिती ‘एमएनआरई’च्या www.mnre.gov.in  सांकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक लोक ‘एमएनआरई’ संकेतस्थळाला भेट देऊ शकतात किंवा टोल फ्री हेल्प लाईन क्रमांक 1800-180-3333 वर फोन करू शकतात.

*****

S.Pophale/S.Kane/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1637800) Visitor Counter : 277