Posted On:
06 JUL 2020 10:12PM by PIB Mumbai
भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने देखो अपना देश वेबिनार मालिकेअंतर्गत "वुमन ऑफ इंडिया- शिफ्टिंग गियर्स" नावाने 40 व्या वेबिनारचे आयोजन केले, ज्या पर्यटनाशी निगडीत महिलांनी दुचाकीवरील रोमांचक अनुभव सांगितले. या वेबिनारचे आयोजन भारताच्या दोन उत्साही महिला दुचाकीस्वार, जय भारती, ज्या हौशी दुचाकीस्वार, प्रवास उत्साही आणि मोवो (मुव्हिंग वुमन) च्या सह-संस्थापक आहेत आणि महिलांना मोटारसायकल चालवण्यास प्रोत्साहित करतात, आणि कँडिडा लुई, दुचाकीस्वार आणि ब्लॉगर, कथाकार आणि मोटारसायकल टूर यामार्फत आयोजित करण्यात आले होते.
पर्यटन मंत्रालयाच्या व्यवस्थापकीय महासंचालक श्रीमती रुपींदर ब्रार यांनी या सत्राचे संचालन केले. सुमारे एक तास चाललेल्या या सत्रात भारतातील महिला दुचाकीस्वारांची सुरक्षितता, मोटारसायकलवरुन देशातील असंख्य भूभागांचे दर्शन, जबाबदार प्रवास आणि दडपण न बाळगता भारतभर मोटरसायकलवरून प्रवास करणे अशा विविध विषयांवर चर्चा झाली. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या मोहिमेअंतर्गत “देखो अपना देश" ही वेबिनार मालिका भारतातील संपन्न विविधतेचे दर्शन घडविणारी मालिका आयोजित केली जात असून ती सतत आभासी पध्दतीने ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ही भावना वृद्धींगत करत आहे.
या दोन्ही वक्त्या, महिला दुचाकीस्वारांमधे प्रसिद्ध असून, त्यांच्या मोटारसायकल प्रवासाने अनेक महिला दुचाकीस्वारांना प्रेरित करून त्यांचा मार्ग प्रशस्त केला आहे. जयभारती तेलंगणा राज्यातील असून,व्यवसायाने वास्तूरचनाकार आहेत आणि त्या ना नफा ना तोटा तत्वावर मोवो (MoWo) ही महिलांना दुचाकी चालवायला शिकवणारी संस्था चालवतात, तसेच त्यांचा हैदराबादमध्ये ‘बाइकरनी’ नावाचा महिला दुचाकीस्वारांचा क्लब आहे. कँडिडा लुई या पर्यटनाला प्रभावित करणाऱ्या तरुण मोटरसायकलीस्ट असून त्यांचे यू ट्यूब आणि इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. कर्नाटकातील हुबळी येथील कँडिडा या स्वतःला कथाकथनकार म्हणतात आणि देशातील आणि परदेशातील पर्यटकांना विविध थरारक आणि वेगळे उत्कट मोटरसायकल अनुभव घेण्यासाठी त्या सहल मार्गदर्शन करतात.
तेलंगण सरकारचा ‘विशिष्ट महिला पुरस्कार’ मिळवणाऱ्या जयभारती या तेलंगणा राज्यातील एकमेव महिला दुचाकीस्वार आहेत. त्यांनी देशभरातील सर्व सीमा तसेच अमेरिका, थायलंड, लाओस, कम्बोडिया अशा सात देशांत हजारो मैलांचा प्रवास केला असून त्या बाईकवरून प्रवास करणाऱ्या महिला म्हणून आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांच्या यूनेस्को वारसा स्थळांबद्द्लच्या आकर्षणामुळे त्यांनी देशांतील यूनेस्कोच्या सर्व 38 स्थळांना भेट देण्याचे आव्हान पूर्ण केले आहे. या प्रवासाने त्यांना फारशी प्रसिद्ध नसलेली ठिकाणे पाहता आली आणि देशातील वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती शिकायला मिळाली.
कँडिडा यांनी 2015 मध्ये, 7 महिन्यांत , 22 राज्यात 32,000किलोमीटर प्रवास करून संपूर्ण देशाची सहल केली. अगदी अलीकडे त्यांनी भारत ते ऑस्ट्रेलिया 8 महिन्यांचा आणि 10 देशांचा प्रवास केला. त्यांच्या मोटारसायकल वरून प्रवास करण्याच्या आत्यंतिक ओढीमुळे त्यांनी आतापर्यंत 15 पेक्षा जास्त देशांत 40 सहली पूर्ण केल्या आहेत. सामाजिक सेवा आणि स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या कँडिडा यांनी स्थानिक संस्कृती आणि खाद्यपदार्थ याबाबत माहिती दिली.
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वास्तू, रूंद किनारपट्टी, मोठमोठय़ा पर्वतरांगा आणि डोंगर, शेती, आणि जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेले देशातील रस्त्यांचे जाळे हे महिलांना दुचाकीवरून जाताना थरार अनुभवायला तर मिळतोच शिवाय घरापासून दूर जाऊन खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव देतो, असे जयभारती आपले विचार व्यक्त करताना म्हणाल्या.
कँडिडा यांनी आपल्या सादरीकरणात, भारताच्या विविध भागांतील नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन घडविले. उत्तरेला हिमालयाच्या रांगा आणि रस्त्यावरील प्रवास हे प्रत्येक दुचाकीस्वाराचे स्वप्न असते, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक उत्साही दुचाकीस्वाराला लेह, लडाख, खडकाळ रस्ते हा भाग, उमलींग ला चा सर्वात ऊंच मोटाररस्ता, कारगिल युध्द स्थान या स्मरणात राहील अशा जागा असून प्रत्येक उत्साही मोटारसायकलस्वाराचे ते स्वप्नस्थान असते. उत्तर भारतात सुद्धा अशा जागा आणि ऐतिहासिक स्थळे असून तो प्रदेश बायकींगसाठी देशी आणि परदेशी पर्यटकांसाठी सुयोग्य आहे.
कँडिडा यांच्या मते देशाचा पूर्व भाग आपल्या हिरवाईचे मोटारसायकलस्वारांना सुंदर दर्शन घडवतो. नैसर्गिक सौंदर्याने नटलेला, धबधबे, घनदाट जंगले, स्वच्छ गावं उंच पर्वतरांगा असलेला ईशान्येतील सात भगिनी राज्यांचा भूप्रदेश सर्वात उत्तम असून हा देशाचा ईशान्य भाग सर्वात उठून दिसणारा आहे आणि अशा दुर्गम भागांचा अनुभव हा मोटारसायकल वरूनच घ्यायला हवा, असे कँडिडा यांनी भारताच्या पूर्व भागाबद्दल बोलताना सांगितले.
दक्षिणेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, की मी स्वतः दक्षिणेची असल्याने माझे दक्षिणेशी विशेष नाते आहे आणि तिथेच माझे मोटारसायकलप्रेम वाढीस लागले. दक्षिण भारताला रूंद किनारपट्टी लाभली असून तेथील स्वच्छ समुद्र किनारे ही बाईक रायडर्स आणि मोटारसायकल प्रवासासाठी परीपूर्ण स्थाने आहेत. येथील लोकांच्या मैत्रभावानेच त्यांना अधिकाधिक प्रवास करायला लावून, आत्मविश्वास स्वतःच्या प्रवासाची क्षितीजे उघडायला आत्मविश्वास दिला.
पश्चिम भारताबद्दल बोलताना त्या म्हणाल्या , की त्यांनी एकटीनेच एक वेगळीच सहल पुष्कर, उदयपूर, जैसलमेर या भागांत केली आणि एका नवीन रंगीत जगाचे दर्शन घेत, अनेक अनवट जागा शोधून काढल्या तसेच मूषक मंदिर, बुलेट बाबा मंदिर, वा बायकर मंदिर आणि कधीही न ऐकलेल्या जागा पाहिल्या तर काही त्यांच्या प्रवासात शोधून काढल्या. पश्चिम भारत हा त्यांच्या मते अतिशय चित्रमय दृश्य असलेला भूभाग असून बाईक वरून प्रवासाला तो उत्तम पार्श्वभूमी प्रदान करतो.
शेवटी त्यांनी मध्यभारताबद्दल बोलताना सांगितले, हा प्राचीन मंदिर, आश्चर्यकारक किल्ले, वने, राने, जंगली प्राणी, आणि अनेक उत्साहवर्धक शहरे असलेला मृदू आणि स्वर्गीय असा प्रदेश आहे. लोकप्रिय विश्वासाविरुध्द, सुरक्षिततेचे कोणतेही प्रश्न निर्माण न होता आणि रस्त्यावरील कोणतेही संकट न येता त्यांनी केलेला प्रवास समाधानकारक होता, असेही त्या यावेळी म्हणाल्या. पूर्ण काळजी घेऊन, सर्वाधिक विश्वास आणि किमान भीती बाळगून देशात कुठेही प्रवास करा,असा सल्ला त्यांनी दर्शकांना दिला.
आपल्या भाषणाअखेरीस त्या म्हणाल्या, सर्वत्र विविध आकर्षक स्थाने, लखलखीत परंपरा आणि संस्कृती लाभलेला भारत हा मोठा खंडप्रदेश असून, तो प्रत्येक नागरिकाला विशेषतः महिलांना बोलावत आहे.
जयभारती आपल्या भाषणात म्हणाल्या, की भारत आपल्या संस्कृतीने येथे भेट देणाऱ्या प्रत्येकाची जिज्ञासा जागृत करत असतो आणि येथील प्रत्येक परंपरेला अर्थ आहे. त्यांनी यावेळी तेलंगणात नवरात्रात साजऱ्या होणाऱ्या बथुकाम्मा या उत्सवाची आणि मोटरसायकलवरून त्याची जाहिरात केल्याची एक आठवण सांगितली. या महिलांसाठी असलेल्या महिलांच्या नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवात स्त्रीवर्ग आपल्या आजूबाजूच्या भागांत सापडणाऱ्या विविध फुलांनी आपल्या घराबाहेरील खणलेला खड्डा सुशोभित करतात. 2018 साली बथुकाम्मा सणाची जाहिरात करण्यासाठी जया आणि त्यांच्या 9 जणींचा गटाने पारंपरिक हातमागाच्या कपड्यांची आणि सांस्कृतिक वेषभूषा करून तेलंगणातील 9 जिल्ह्यांत 1200 किलोमीटरचा प्रवास बुलेट वरून केला होता. आपल्या कडील सर्व संसाधने वापरून आणि विविध व्यासपीठावरून आपण आपल्या संस्कृतीची उन्नती करायला हवी, असे भारती यावेळी म्हणाल्या.
बाईक वरून प्रवासाला सुरुवात करण्याआधी त्याचे तपशीलवार नियोजन करायला हवे, यावर जयभारती यांनी भर दिला. सहलीला आवश्यक सर्व घटकांचा आणि वाहनाचा विचार, सहलीचे पूर्वनियोजन करताना करणे आवश्यक आहे. रस्ता सुरक्षा हा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे, ज्याचाही सखोल अभ्यास करायला हवा. रायडिंग गिअर्सचा वापर करणे, वाहतूक नियमांचे पालन, विश्रांती घेणे आणि गाडी बिघडणार नाही याची नियमितपणे दक्षता घेणे हे अशा प्रकारच्या साहसाला प्रारंभ करण्याअगोदर प्रत्येक रायडरला अत्यावश्यक आहे.
संवादाची सुरुवात करत, सकारात्मक दृष्टीकोन वाढवत, कोणतीही भीती न बाळगता आपल्या चिंता घरीच ठेवून, आपल्या देशातील सौंदर्य टिपण्यासाठी, महिलांनी स्वतः ला सक्षम करावे असे त्यांनी आपल्या भाषणाअखेरीस सांगितले.
वेबिनारची सत्रे या लिंक्स वर उपलब्ध आहेत.
https://www.youtube.com/channel/UCbzIbBmMvtvH7d6Zo_ZEHDA/featured
http://tourism.gov.in/dekho-apna-desh-webinar-ministry-tourism
https://www.incredibleindia.org/content/incredible-india-v2/en/events/dekho-apna-desh.html
पुढील सत्र शनिवार, 11 जुलै 2020 रोजी होणार असून योगभूमी -उत्तराखंड या विषयावर होईल.
*****
S.Thakur/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com