आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
राजस्थानमधील आशा: कोविड-19 विरुद्धच्या प्रदीर्घ लढ्यात लोकांप्रति निःस्वार्थ वचनबद्धता
Posted On:
05 JUL 2020 4:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जुलै 2020
राजस्थानमध्ये कोविड -19 आणि कापणीचा हंगाम एकत्र आला. बहुतांश “आशा” सेविका कापणीच्या कामांमध्ये मदत करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांबरोबर असतात. यावर्षी, महामारी संबंधी कामांमधील आशा कार्यकर्त्याच्या व्यापक सहभागामुळे अनेकींना असे करता आले नाही. यामुळे त्यांच्या कुटुंबियांकडून तीव्र नाराजी आणि प्रतिकार त्यांना सहन करावा लागला. गोगी देवी देखील याला अपवाद नव्हत्या. परंतु त्यांनी आशा कार्यकर्ता म्हणून काम सुरु ठेवण्याचा दृढनिश्चय केला आणि सामाजिक सेवा देणारी, सामाजिक स्तरावर काळजी घेणारी, आरोग्य सुविधांसाठी दुवा साधणारी कार्यकर्ती म्हणून आपली भूमिका पार पाडली.
कोविड संबंधित प्रतिबंधात्मक उपाययोजनांमधील तिच्या योगदानाची जेव्हा ग्रामपंचायतीच्या प्रधानांनी जाहीरपणे प्रशंसा केली तेव्हा तिचे प्रयत्न सार्थकी लागले. यामुळे तिच्या कामाप्रति तिच्या कुटुंबाचा दृष्टीकोन बदलला आणि त्यांनी कामाप्रति तिच्या बांधिलकीची प्रशंसा करायला सुरुवात केली. गोगी देवीसाठी, तिच्या समुदायाकडून पावती आणि तिच्या कामाची ओळख हे अथक प्रयत्न करण्यासाठी तिची प्रबळ प्रेरणा आहेत.
जयपूर येथे यावर्षी मार्चच्या सुरुवातीच्या काळात पहिल्या रुग्णाचे निदान झाल्यानंतर कोविड -19 प्रतिसादाचे अविभाज्य स्तंभ म्हणून आशा कार्यकर्त्यांचे काम सुरू झाले. 8 मार्च रोजी राजस्थानच्या सर्व 9,876 ग्रामपंचायतींनी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते, त्यामध्ये कोविड -19 प्रादुर्भावाची माध्यमे, सावधगिरी आणि नियंत्रणविषयक उपाय स्पष्ट करून सांगण्यात आशा कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला होता, कारण या सर्वांना या सार्वजनिक कार्यासाठी तयारी करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रतिबंध व नियंत्रण उपाय सुनिश्चित करण्यासाठी तसेच आशा व इतर आघाडीवरील कामगारांना कोणत्याही अडचणीशिवाय त्यांचे कार्य करण्यात मदत करण्यासाठी ग्रामपंचायत प्रतिनिधींचा पाठिंबा मिळवून देण्यात हे धोरणात्मक प्रारंभिक प्रयत्न महत्त्वपूर्ण होते.
राज्याच्या ऑक्सिलरी नर्स मिडवाइव्ह्स (एएनएम) च्या सहकार्याने आशा कार्यकर्त्यांना सक्रिय पाळत ठेवता आली आणि माहितीचा प्रसार करता आला. या सगळ्यामध्ये आणि लक्षणे असलेल्या कोणाबद्दलही सतर्क राहताना आशा गर्भवती महिला, नवजात आणि मुलांची काळजी घेत होत्या. रुग्णवाहिका उपलब्ध नव्हत्या तेव्हा त्यांनी आरोग्य सुविधांपर्यंत पोहचण्यासाठी वाहतुकीची सोय केली.
कोविड-19 च्या लक्षणांविषयी आणि सावधगिरीविषयी जागरूकता निर्माण करण्यात गोगी देवीसारख्या विविध आशा कार्यकर्त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यामुळे रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यात बरीच मदत झाली आहे. त्यांनी लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून कोविड-19 च्या नियंत्रण आणि व्यवस्थापनातील सरकारी प्रयत्नांना बळ देण्यासाठी समुदायाचा विश्वास आणि स्थानिक सामाजिक घटकांच्या ज्ञानाचा उपयोग केला.
राजस्थानमधील झलक: कोविड -19 विरुद्ध मोहिमेत आशा कार्यकर्त्या
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1636642)
Visitor Counter : 328