गृह मंत्रालय
राष्ट्रीय सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी सरकार कटिबद्ध; दहशतवादाविरुद्ध मोदी सरकारच्या ‘शून्य सहिष्णुता’ धोरणाअंर्तगत, बेकायदा कृत्य (प्रतिबंध) कायदा 1967 अनुसार केंदीय गृहमंत्रालयाकडून नऊ जणांना ‘दहशतवादी’घोषित
Posted On:
01 JUL 2020 6:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जुलै 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मजबूत केंद्र सरकारने जर एखादी व्यक्ती अवैध, निषेधार्ह कृत्ये करीत असेल तर त्याला ‘दहशतवादी’ म्हणून घोषित करता यावे, यासाठी यूएपीए म्हणजेच बेकायदा कृत्य (प्रतिबंध) कायदा 1967 मध्ये दुरूस्ती करण्यासाठी ऑगस्ट 2019 मध्ये मंजुरी दिली होती. यापूर्वी बेकायदा कृत्य (प्रतिबंध) कायदा 1967 अनुसार केवळ संघटनांनाच ‘दहशतवादी संघटना’ म्हणून घोषित करता येत होते. आता कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आल्यामुळे बेकायदा कृत्य करणा-या व्यक्तींनाही ‘दहशतवादी’ म्हणून सरकार घोषित करू शकते.
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी गेल्यावर्षी संसदेमध्ये ‘बेकायदा कृत्य (प्रतिबंध) कायदा 1967’ मध्ये सुधारणा करण्यासंबंधी झालेल्या चर्चेत दहशतवादाविरुद्ध अधिक दृढतेने लढा देण्यासाठी मोदी यांच्या नेतृत्वाखालचे सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच दहशतवादी कारवाया निपटून काढण्यासाठी सरकारने दृढसंकल्प केला आहे, याचाही पुनरूच्चार केला होता. या कायद्यातल्या दुरूस्तीनंतर केंद्र सरकारने सप्टेबर-2019 मध्ये चार व्यक्तींना दहशतवादी म्हणून घोषित केले होते. यामध्ये मौलाना मसूद अजहर, हाफिज सईद, जाकी-उर-रेहमान लख्वी आणि दाउद इब्राहिम यांचा समावेश होता.
राष्ट्रीय सुरक्षा सुदृढ करण्यासाठी विद्यमान सरकार कटिबद्ध आहे, यावर भर देवून दहशतवादाच्याविरोधात ‘शून्य सहिष्णुता’ धोरण राबवण्यात येणार आहे. त्याअनुसार केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या गृह मंत्रालयाने आज नऊ व्यक्तींना ‘बेकायदा कृत्य (प्रतिबंध) कायदा 1967’ (2019 मध्ये केलेल्या दुरूस्ती अनुसार) ‘दहशतवादी’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला. या नऊजणांची नावे सुधारित कायद्याच्या चौथ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. या नऊजणांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:-
- वाधवा सिंह बब्बर - पाकिस्तानमध्ये असलेला, दहशतवादी संघटना ‘‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’चा प्रमुख
- लखबिर सिंह - पाकिस्तानमध्ये असलेला, दहशतवादी संघटना ‘इंटरनॅशनल सिख युथ फेडरेशन’चा प्रमुख
- रणजीत सिंह - पाकिस्तानमध्ये असलेला, दहशतवादी संघटना ‘‘खलिस्तान झिंदाबाद फोर्स’’चा प्रमुख
- परमजित सिंह - पाकिस्तानमध्ये असलेला आणि दहशतवादी संघटना ‘‘खलिस्तान कमांडो फोर्स’’चा प्रमुख
- भूपिंदर सिंह भिंडा - ‘‘खलिस्तान झिंदाबाद फोर्स’’ या दहशतवादी संघटनेचा जर्मनीमध्ये राहणारा मुख्य सदस्य
- गुरमीत सिंह बग्गा - ‘‘खलिस्तान झिंदाबाद फोर्स’’या दहशतवादी संघटनेचा जर्मनीमध्ये राहणारा मुख्य सदस्य
- गुरपतवंत सिंग पन्नून - ‘‘सिख फॉर जस्टिस’’ या बेकायदा संघटनेचा अमेरिकेत राहणारा मुख्य सदस्य.
- हरदीप सिंह निज्जर - ‘‘खलिस्तान टायगर फोर्स’’चा कॅनडामध्ये राहणारा प्रमुख
- परमजित सिंह - ‘‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ या दहशतवादी संघटनेचा यू.के.मध्ये राहणारा प्रमुख.
या सर्व नऊ व्यक्ती परदेशात वास्तव्य करतात आणि भारतामध्ये सीमेपलिकडून दहशतवादी कृत्ये घडवून आणण्यासाठी मदत करतात. आपल्या राष्ट्राच्या विरोधी कृत्यांमध्ये सहभागी होत आहेत. तसेच ही मंडळी खलिस्तान चळवळीमध्येही सहभागी आहेत. खलिस्तानचे समर्थन करून पंजाबमध्ये दहशतवादी कारवाया पुन्हा सुरू करण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे दिसून आले आहे. निषेधार्ह कृत्ये करून देशामध्ये सातत्याने अस्थिरता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या कारणांमुळे या नऊ व्यक्तींना गृह मंत्रालयाने ‘दहशतवादी’ घोषित केले आहे.
B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1635874)
Visitor Counter : 303