संरक्षण मंत्रालय

एमआय-17 हेलिकॉप्टरच्या माध्यमातून स्वदेशी हवाई टोळधाड नियंत्रण प्रणाली कार्यरत

Posted On: 30 JUN 2020 10:53PM by PIB Mumbai

 

देशाच्या काही भागांत आणि राज्यांमध्ये पिकांवर मोठ्या प्रमाणावर होत असलेला टोळधाडीचा हल्ला थांबवण्याचे सरकारसमोर आव्हान निर्माण झाले होते. टोळधाडीची गंभीर समस्या लक्षात घेवून कृषी मंत्रालयाने संरक्षण मंत्रालयाच्या मदतीने तातडीने उपाय योजना केली आहे. टोळधाड नियंत्रणाचे आव्हान भारतीय हवाई दलाच्या चंदीगड येथील 3 बेस रिपेअर डेपोने स्वीकारले. अवघ्या काही दिवसांत या तळावर एम-17 हेलिकॉप्टरमध्ये आवश्यक तसे बदल करून आणि त्यासाठी स्वदेशी घटकांचा वापर करून कीटकनाशकाची स्वयंचलित हवाई फवारणी करणारी यंत्रणा बसवण्यात आली. एम-17 हेलिकॉप्टरच्या बाह्य परिघावर दोन्ही बाजूला नोजल्स बसवण्यात आले. त्यांच्यामार्फत कीटकनाशकाची हवाई फवारणी करणे शक्य होणार आहे. यासाठी हेलिकॉप्टरमध्ये  800 लीटर क्षमतेची ऑक्सिलिअरी टाकी बसवण्यात आली. या टाकीला जोडण्यात आलेल्या इलेक्ट्रीकल पंपाने नोजल्सपर्यंत कीटकनाशक पोहोचू शकेल अशी व्यवस्था करण्यात आली. ज्याभागात टोळधाडीने हल्ला चढवला आहे, त्या भागात अंदाजे 750 हेक्टर क्षेत्रामध्ये 40 मिनिटे हवाई फवारणी करून टोळधाडीवर नियंत्रण मिळवणे शक्य होते, असे दिसून आले आहे.

वास्तविक कृषी मंत्रालयाने देशाच्या काही भागात, राज्यांमध्ये टोळधाडीचा हल्ला होण्याची शक्यता आधीच वर्तवली होती. टोळधाडीच्या संकटाला सामोरे जाण्याची तयारीही कृषी मंत्रालयाने केली होती. यासाठी टोळधाडीच्या प्रजननाचा काळ अंदाजे मे महिन्यात असणार, त्यावेळी हवाई फवारणी करण्यासाठी मेसर्स मायक्रॉन या यू.के.च्या कंपनीबरोबर एमआय-17 हेलिकॉप्टर्समध्ये सुधारणा करण्यासाठी करार केला होता. परंतु संपूर्ण जगभर कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे या यू.के.स्थित कंपनीला मे 2020 मध्ये आपले काम पूर्ण करून हेलिकॉप्टर्समध्ये सुधारणा करून देणे शक्य झाले नाही. हे काम सप्टेंबर 2020 पर्यंत पूर्ण होवू शकेल, असे लक्षात आले. मात्र त्याआधीच देशात टोळधाडीच्या हल्ल्याचे मोठेच संकट उभे राहिले. त्यावर मात करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्यावतीने विशेष प्रयत्न करून स्वदेशी हवाई टोळधाड नियंत्रण प्रणाली विकसित केली.

या प्रणालीची चाचणी बेंगळुरूच्या एअरक्राफ्ट अँड सिस्टिम टेस्टिंग एस्टॅब्लिशमेंट संस्थेच्या अभियंता पथकाने घेतली आहे. तसेच एमआय-17 हेलिकॉप्टरमध्ये या विशिष्ट कामासाठी आवश्यक असलेल्या ज्या सुधारणा केल्या आहेत, त्यांच्यामुळे तसेच फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या कीटकनाशकामुळे उड्डाणावर काही परिणाम होतो का, याचीही चाचणी केली.

ही हवाई फवारणी कार्यप्रणाली पूर्णपणे स्वदेशी असल्यामुळे तिची देखभाल आणि गरज पडल्यास भविष्यामध्ये तिच्यामध्ये आणखी काही सुधारणे करणेही शक्य होणार आहे. यामुळे देशाच्या परकीय चलनामध्ये बचत होवू शकणार आहे. तसेच विमानांशी संबंधित तंत्रज्ञानामध्ये भारत स्वावलंबी बनण्यास मदत होणार आहे.

***

S.Thakur/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1635605) Visitor Counter : 298