आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड योद्धा: उत्तर प्रदेशातील कोविड विरुद्धच्या युद्धात अग्रणी आहेत “आशा” सेविका
30.43 लाख स्थलांतरितांचा 1.6 लाख आशा सेविकांकडून शोध
Posted On:
30 JUN 2020 3:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जून 2020
मूळचा बहराइच (हुजूरपूर ब्लॉक, निबुही कला गाव) येथील रहिवासी 20 वर्षीय सुरेश कुमार हा मुंबई शहरातील ज्यूसच्या दुकानात कामाला होता. मे 2020 च्या सुरुवातीला पाच दिवस प्रवास करून तो इतर प्रवासी कामगारांसह ट्रकमधून घरी परतला. सुरेश घरी पोहोचताच स्थानिक आशा सेविका चंद्र प्रभा यांनी त्याची भेट घेऊन त्याचा तपशील नोंदविला. चंद्र प्रभा यांनी बहराइच जिल्ह्याच्या शीघ्र प्रतिसाद पथकाला त्याची माहिती दिली आणि त्यांनी सुरेशला घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला. चंद्र प्रभा यांनी त्याच्या कुटुंबियांचे समुपदेशन करून गृह विलगीकरणात काय काय करायचे हे सविस्तरपणे सांगितले. त्यांनी नियमित पाठपुरावा केला आणि कुटुंबाशी संपर्कात राहिल्या. चंद्र प्रभा यांचा सावधपणा, प्रेरणादायी कौशल्य आणि समर्थन यामुळेच सुरेशला लक्षणे दिसताच, कोविड समर्पित सेवा सुविधा असलेल्या चितौर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. सुरेशचे कुटुंबातील सदस्य आणि त्याचे सहकारी प्रवासी कोविड चाचणीसाठी संदर्भित झाले आहेत याची खात्री देखील चंद्र प्रभा यांनी केली.
उत्तर प्रदेशातील खेड्यांमधील झलक: कोविड -19 च्या युद्धाच्या अग्रभागी “आशा” सेविका
देशातील कोविड-19 च्या रुग्णांमध्ये होणारी वाढ आणि हॉटस्पॉट भागात परप्रांतीय लोकांची संख्या वाढल्याने उत्तर प्रदेश (यूपी) मधील एक प्रमुख आव्हान म्हणजे परत आलेल्या नागरिकांच्या आरोग्यविषयक सेवांची गरज भागवणे आणि ग्रामीण लोकसंख्येतील प्रसार रोखणे. या संकटाच्या वेळी राज्याच्या कोविड -19 व्यवस्थापनास सहाय्य करण्यासाठी आशांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
उत्तर प्रदेशात प्रचंड मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आलेल्या या मोहिमेत दोन टप्प्यांत 30.43 लाख स्थलांतरितांचा 1.6 लाख आशा सेविकांकडून शोध घेण्यात आला, पहिल्या टप्प्यात 11.24 लाख आणि दुसऱ्या टप्प्यात 19.19 लाख स्थलांतरितांचा शोध घेण्यात आला. त्यांनी संपर्कित व्यक्तींचा शोध तसेच समुदाय पातळीवर सर्वेक्षण करण्यात मदत केली आहे. आशांनी लक्षणे आढळणाऱ्या 7,965 व्यक्तींचा शोध घेण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याच्या स्थितीचा नियमित पाठपुरावा केला. त्यांनी 2,232 परतलेल्या स्थलांतरितांकडून नमुना संकलन केले ज्यापैकी 203 संक्रमित असल्याचे आढळले. आणि त्यांना कोविड आरोग्य सेवा केंद्रात पाठविण्यात आले. ग्राम प्रधानाच्या देखरेखीखाली सर्व खेड्यांमध्ये निगराणी समितीची स्थापना केली गेली आहे. समितीचे सदस्य / स्वयंसेवक सामुदायिक गस्त घालताना आशांच्या संपर्कात राहतात आणि त्यांना गावातल्या स्थलांतरितांची माहिती देतात, ज्याद्वारे परप्रांतीयांचा पाठपुरावा करण्यास मदत होते. साबणाने व पाण्याने नियमितपणे हात धुणे, सार्वजनिक ठिकाणी बाहेर असताना मास्क घालण्याचे महत्त्व आणि पुरेसे शारीरिक अंतर राखणे यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांबद्दल समाजाला संवेदनशील बनविण्यामध्ये आशांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या प्रयत्नांच्या परिणामी, आवश्यक आणि अनावश्यक आरोग्य सेवा आणि त्यामध्ये प्रवेश कसा करावा याबद्दल जागरूकता वाढविली आहे. आशांना त्यांची कर्तव्ये पार पाडतांना मास्क आणि साबण / सॅनिटायझर्स सारख्या मूलभूत संरक्षक सुविधा प्रदान केल्या जातात.
अंगणवाडी केंद्रे आणि प्राथमिक शाळा यासारख्या इमारतींमध्ये सामुदायिक विलगीकरण केंद्रांच्या विकासात आशा सेविकांनी पंचायती राज विभागास मदत केली आहे. त्यांनी आरोग्य सेतू अॅपच्या वापराबाबत जनजागृती केली असून सामाजिक स्तरावर आरोग्य सेतू अॅपचा अवलंब करणे सुनिश्चित केले आहे.
कोविड व्यतिरिक्त इतर अत्यावश्यक सेवांमध्ये देखील आशांचे योगदान अनुकरणीय आहे. आयुष्मान भारत - आरोग्य आणि निरोगीपणा केंद्रात, उच्च रक्तदाब, मधुमेह, तीन प्रकारचे कर्करोग (मुखाचा, स्तनाचा आणि गर्भाशयाचा कर्करोग), क्षयरोग आणि कुष्ठरोग यासारख्या दीर्घ आजाराची तपासणी करण्यासाठी जोखीम मूल्यांकन आणि तपासणीसाठी एकत्रित केलेल्या सर्व व्यक्तींची यादी तयार करण्यात, आशा सेविका योगदान देत आहेत. टाळेबंदीच्या उपाययोजनांमुळे आणि शारीरिक अंतर राखण्याच्या अटीमुळे थेट परिणाम झालेल्या नवजात शिशु आणि माता याना आरोग्य (आरएमएनसीएच) सेवा पुरविण्यास त्यांचा हातभार लागला आहे. या सेवांच्या उपलब्धतेबद्दल त्यांनी जागरूकता निर्माण केली आहे आणि लोकांना या सेवांचा लाभ घेण्यात मदत केली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील सुमारे 10 लाख आशांना सहाय्य करते. जवळपास 1/6 (1.67 लाख) आशा या उत्तर प्रदेशमधील आहेत.
* * *
M.Chopade/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1635331)
Visitor Counter : 311