संरक्षण मंत्रालय

रशियामध्ये मॉस्को येथे झालेल्या विजय दिवस संचलनामध्ये भारतीय लष्कराच्या पथकाचा सहभाग

Posted On: 24 JUN 2020 9:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जून 2020


सन 1941ते 1945 या कालावधीत झालेल्या दुस-या महायुद्धात तत्कालीन रशियन महासंघाने मिळवलेल्या विजयाचा 75 वा वर्धापनदिन आज- दि. 24 जून,  2020 रोजी साजरा केला जात आहे. या विजय दिनानिमित्त मॉस्कोमधल्या लाल चौकात विशेष लष्करी संचलन आयोजित करण्यात आले. या संचलनामध्ये भारतीय सशस्त्र लष्कराच्या तीनही दलांचे मिळून 75 लष्करी अधिका-यांचे पथक सहभागी झाले. या संचलनामध्ये आणखी वेगवेगळ्या 17 देशांच्या लष्करी पथकांचाही समावेश होता. या विशेष कार्यक्रमाला भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह विशेष आमंत्रित म्हणून उपस्थित होते. 

दुस-या महायुद्धाच्या काळामध्ये द ब्रिटिश इंडियन आम्र्ड फोर्सेस ही संयुक्तपणे कार्य करणारी दोस्त राष्ट्रांची सर्वात मोठी फौज होती. त्यावेळी या संयुक्त फौजांचा उत्तर आणि पूर्व अफ्रिकेमध्ये तसेच पश्चिमेकडील वाळवंटी भागातल्या मोहिमेमध्ये सहभाग होता. या मोहिमांमध्ये 87 हजारांपेक्षा जास्त भारतीय जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. तर 34,354 भारतीय जवान जखमी झाले होते. भारतीय लष्कराने फक्त आघाडीवर लढाई केली असे नाही, तर दक्षिण प्रांतामध्ये तसेच इराणच्या युद्ध मार्गावर रसद आणि सामुग्रीचा पुरवठा करण्याचेही काम केले. याबरोबरच शस्त्रास्त्रे, दारूगोळा, इतर आणि लढावू साहित्य त्याचबरोबर उपकरणांचे सुटेभाग, खाद्यान्न यांचा पुरवठा सोविएत महासंघ, इराण आणि इराक यांच्यापर्यंत केला. भारतीय लष्करातल्या जवानांनी आणि अधिका-यांनी केलेल्या या कामाचे कौतुक म्हणून चार हजारांपेक्षा जास्त जवानांना शौर्य पुरस्कार देवून त्यांचा गौरव केला होता. यामध्ये 18 व्हिक्टोरिया आणि जॉर्ज क्रॉस पुरस्कारांचा समावेश होता. याव्यतिरिक्त तत्कालीन सोव्हिएत महासंघाने भारतीय सशस्त्र सैन्याचा गौरव आणि कौतुक करणारा विशेष ‘हुकूमनामा’ दि. 23 मे, 1944 रोजी काढला होता. त्यावर रशियाचे तत्कालीन प्रमुख नेते मिखाईल कालिनिन आणि अलेक्झांडर गॉर्किन यांच्या स्वाक्षरी होत्या. तसेच रॉयल इंडियन आर्मी सर्व्हिस कॉर्प्सचे सुभेदार नारायणराव निकम आणि हवालदार गजेंद्रसिंग चांद यांना विशेष प्रतिष्ठेचा ‘रेड स्टार’ पुरस्कार देण्यात आला होता. 
 


* * *

कर्नल अमन आनंद 
जनसंपर्क अधिकारी (लष्कर)

M.Iyenger/S.Bedekar/D.Rane

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1634099) Visitor Counter : 199