संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मॉस्को येथे माध्यमांसमोरील निवेदन

Posted On: 23 JUN 2020 11:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 जून 2020


संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 23 जून, 2020 रोजी मॉस्को येथे माध्यमांना दिलेल्या निवेदनाचा मजकूर खालीलप्रमाणे आहेः

रशियन संरक्षण मंत्रालयाच्या निमंत्रणानुसार विजय दिन संचलनाच्या 75व्या वर्धापन दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मी मॉस्को येथे आलो असून, रशिया आणि संपूर्ण जगासाठी हा एक अतिशय शुभ प्रसंग आहे. दुसऱ्या महायुद्धात विजय मिळवण्यासाठी रशियन लोकांच्या असीम बलिदानाचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहतो. लाखो भारतीय सैनिक या युद्धात सहभागी झाले होते व त्यावेळी मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. त्यापैकी बरेच जण सोव्हिएत सैन्याला मदत पुरवण्याच्या युद्धाच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होते. म्हणूनच, भारतीय लष्कराची तुकडी उद्या रेड स्क्वेअरमध्ये संचलन करणार असून हा मोठा सन्मान आहे. आपल्या दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमधील कायमस्वरुपी मैत्रीचे हे प्रतीक आहे.

माझा हा मॉस्को दौरा कोविड महामारीनंतर भारतातून कुठल्याही अधिकृत प्रतिनिधीमंडळाने केलेला पहिला परराष्ट्र दौरा आहे. हे आपल्या खास मैत्रीचे प्रतीक आहे. महामारीच्या सर्व प्रकारच्या अडचणी असूनही, आपले द्विपक्षीय संबंध विविध स्तरावर उत्तम  संपर्क ठेवत आहेत. आम्ही या वर्षाच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणानुसार रशियन महासंघाचे महामहिम अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्याची प्रतीक्षा करत आहोत.

भारत-रशिया संबंध एक विशेष व विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारी आहे. आपले  संरक्षण संबंध हा त्यातील महत्वाचा स्तंभ आहे. उप-पंतप्रधान युरी बोरिसोव यांच्याबरोबर आमच्या संरक्षण संबंधांचा आढावा घेण्याची संधी मला मिळाली, तसेच महामारीचे निर्बंध असूनही, या हॉटेलमध्ये मला भेटायला आल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आमची चर्चा खूप सकारात्मक व परिणामकारक झाली. मला असे आश्वासन देण्यात आले आहे की, सध्या सुरु असलेली कंत्राटे कायम ठेवली जातील व बऱ्याच प्रकरणांमध्ये कमी वेळेत पुढे नेली जातील. आमच्या सर्व प्रस्तावांना रशियाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. मी या चर्चेने पूर्णपणे समाधानी आहे. आज सकाळी संरक्षण सचिव अजय कुमार यांनी रशियाचे उप संरक्षणमंत्री फोमिन यांच्याशी चर्चा केली. भारत आणि रशिया यांच्यातील पारंपारिक मैत्री मजबूत राहील असा मला विश्वास आहे. आमचे परस्पर हितसंबंध भक्कम आहेत व आम्ही आमच्या विशेष मैत्रीच्या भावनेतून भविष्यातील सहकार्याची अपेक्षा करतो. 

मी उद्या 75व्या विजय दिन संचलनात सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे. रशियाच्या मित्रवत  लोकांना, विशेषत: दिग्गजांना, ज्यांनी आपल्या सामायिक सुरक्षेत उल्लेखनीय योगदान दिले आहे अशा सर्वांना मी शुभेच्छा देतो.


* * *

S.Pophale/S.Kane/D.Rane



(Release ID: 1633848) Visitor Counter : 189