रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेच्या कोविड बोगींच्या वापरास सुरुवात
उत्तर प्रदेशच्या वाराणसी विभागातील मऊ स्थानकामध्ये कोरोनाचे 59 संशयित रूग्ण भर्ती करण्यात आले व 8 जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले
कोविड-19 महामारीशी सामना करण्यासाठी भारतीय रेल्वे सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध
भारतीय रेल्वेच्यावतीने पाच राज्यांमध्ये 960 कोविड दक्षता बोगी तयार
उत्तर प्रदेशमध्ये विविध 23 ठिकाणी एकूण 372 कोविड दक्षता बोगी तयार
दिल्लीमध्ये नऊ ठिकाणी 503 बोगी तयार
भारतीय रेल्वेच्यावतीने राष्ट्रीय अभियानामध्ये योगदान देऊन रेल्वे बोगींचे कोविड दक्षता केंद्रांमध्ये केले रूपांतर
आरोग्य मंत्रालयाने 6 मे रोजी जारी केलेल्या मानक प्रक्रियेनुसार राज्य सरकार डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करणार
राज्य सरकारच्या अधिकारी वर्गाला मदत करण्यासाठी बोगींच्या स्थानी दोन संपर्क अधिकारी नियुक्त
हवामानाचा विचार करून बोगींच्या आतील तापमान आरामदायक ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू
कोविड रुग्णांच्या देखभालीसाठीही राज्य सरकारांना रेल्वे शक्य असलेली सर्व मदत पुरवणार
Posted On:
22 JUN 2020 6:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जून 2020
संपूर्ण देशभरामध्ये कोविड-19 महामारीचा उद्रेक झाला आहे. अशा संकटाच्या काळामध्ये भारतीय रेल्वेच्या वतीने कोरोना विरोधातल्या लढाईमध्ये सर्वतोपरी मदत केली जात आहे. कोरोना रुग्णांच्या देखभालीसाठी आता रुग्णालयांची संख्या कमी पडत आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांवर उपचार करणे अवघड झाले आहे. ही समस्या लक्षात घेऊन विविध राज्यांमध्ये भारतीय रेल्वेच्या असंख्य बोगींचे रूपांतर कोविड दक्षता केंद्रामध्ये करण्यात आले आहे. या बोगींमध्ये कोरोना रुग्णांना ठेवण्यात येत आहे. दि. 20 जून 2020 रोजी रेल्वेच्या वाराणसी विभागाच्या मऊ स्थानकामध्ये तयार करण्यात आलेल्या कोविड दक्षता बोगींमध्ये कोरोनाचे 42 संशयित रूग्ण दाखल झाले. तर दि. 21 जून रोजी 17 रूग्णांना दाखल करण्यात आले होते. तर 8 जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे.
राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना रूग्णांची काळजी घेतली जात आहे. त्याला भारतीय रेल्वेच्या वतीने सर्वतोपरी मदत केली जात आहे. भारतीय रेल्वेने विविध राज्यांमध्ये आपल्या 5,231 बोगींचे रूपांतर कोविड दक्षता केंद्रांमध्ये करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. क्षेत्रीय रेल्वे कार्यालयाच्या वतीने बोगींच्या रुपांतराचे काम करण्यात येत आहे. या बोगींमध्ये कोरोनाची प्रारंभिक लक्षण आढळून आलेल्या, परंतु गंभीर परिस्थिती नसलेल्या रूग्णांवर उपचार करण्याची सुविधा आहे.
आत्तापर्यंत भारतीय रेल्वेने दिल्ली, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेश या पाच राज्यात 960 कोविड दक्षता बोगींमध्ये रुग्णांवर उपचार करण्यास प्रारंभ केला आहे. एकूण 960 कोविड दक्षता बोगींपैकी दिल्लीमध्ये 503 दक्षता बोगी आहेत; तर आंध्र प्रदेशमध्ये 20, तेलंगणामध्ये 60, उत्तर प्रदेशमध्ये 372 आणि मध्य प्रदेशमध्ये 5 कोविड दक्षता बोगी आहेत.
दिल्लीमध्ये एकूण 9 ठिकाणी 503 कोविड दक्षता बोगी तयार करण्यात आल्या आहेत. यापैकी शकूरबस्तीमध्ये 50, आनंद विहारमध्ये 267, सफदरजंगमध्ये 21, दिल्ली सराय रोहिल्लामध्ये 50, दिल्ली कँटमध्ये 33, आदर्श नगरमध्ये 30, शाहदरामध्ये 13, तुगलकाबादमध्ये 13 आणि पटेल नगरमध्ये 26 कोविड दक्षता बोगी तैनात करण्यात आल्या आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये एकूण 372 कोविड दक्षता बोगी तयार करण्यात आल्या असून वेगवेगळ्या 23 ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. यामध्ये दीनदयाळ उपाध्याय स्थानक, लखनऊ, वाराणसी, भदोही, फैजाबाद, सहारनपूर, मिर्जापूर, सुबेदारगंज, कानपूर, झांसी, झांसी वर्कशॉप, आग्रा, नकहा जंगल, गोंडा, नौतनवा, बहराईच, वाराणसी-सिटी, मंडुआडीह, मऊ, भटणी, बरेली-सिटी, फर्रुखाबाद आणि कासगंज या रेल्वे स्थानकांवर कोविड दक्षता बोगी तयार करण्यात आल्या आहेत.
मध्य प्रदेशमध्ये ग्वाल्हेर येथे सर्व पाच कोविड दक्षता बोगी तैनात करण्यात आल्या आहेत. आंध्र प्रदेशमध्ये विजयवाडा येथे एकूण 20 कोविड दक्षता बोगी तयार करण्यात आल्या आहेत. तर तेलंगणामध्ये एकूण 60 कोविड दक्षता बोगी तीन वेगवेगळ्या स्थानी तैनात आहेत. यामध्ये सिकंदराबाद, काचीगुडा आणि आदिलाबाद येथे या बोगी आहेत.
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (एमओएचएफडब्ल्य) दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे, तसेच त्या त्या राज्यांच्या व केंद्रशासित सरकारच्या वतीने भारतीय रेल्वेकडे केलेल्या मागणी पत्रानुसार बोगींचे रूपांतर करण्यासाठी देण्यात आल्या आहेत.
भारतीय रेल्वेच्या वतीने कोविडविरोधातल्या लढ्यामध्ये योगदान देण्यासाठी बोगींच्या रूपांतरणाचे काम राष्ट्रीय अभियान म्हणून केले जात आहे. रेल्वेकडून केली जाणारे हे काम उल्लेखनीय आहे. या बोगींमध्ये कोविड रूग्णांवर उपचार करण्यासाठी त्या त्या राज्य सरकारांना डॉक्टर व निमवैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत. बोगींच्या रूपांतरणाचे काम केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दि. 6 मे, 2020 रोजी जारी केलेल्या मानकांप्रमाणे केले जात आहे.
कोविड दक्षता बोगी केंद्रामध्ये राज्य सरकारच्या मदतीसाठी रेल्वेचे दोन संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. तसेच हवामानाचा विचार करून बोगींच्या आतले तापमान रुग्णांना आरामदायक रहावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोविड रूग्णांच्या देखभालीसाठी रेल्वेच्यावतीने राज्य सरकारांना सर्वतोपरी मदत केली जाणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या बोगींचा उपयोग कोरोनाची प्रारंभिक लक्षणे दिसल्यानंतर व तुलनेने कमी त्रास असलेल्या रूग्णांसाठी केला जाणार आहे. ज्या भागामध्ये वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे आणि कोरोनाचा संशयित रूग्ण आढळला, तर त्याच्या विलगीकरणासाठी, तसेच त्याची आजाराशी सामना करण्याची क्षमता वाढविण्यासाठी दक्षता बोगी केंद्रामध्ये ठेवण्यात येणार आहे. आरोग्य मंत्रालया आणि नीति आयोगाने विकसित केलेल्या एकीकृत कोविड उपाय योजनेचा एक भाग म्हणून कोविड दक्षता बोगी केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.
S.Pophale/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1633563)
Visitor Counter : 223