पर्यटन मंत्रालय
आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पर्यटन मंत्रालयाच्यावतीने ‘देखो अपना देश’ वेबमालिकेत ‘‘इंडिया ॲज ए योग डेस्टिनेशन’’ विशेष कार्यक्रमाचे प्रसारण
प्रविष्टि तिथि:
22 JUN 2020 8:36PM by PIB Mumbai
प्राचीन आरोग्य विज्ञानाचा महत्वपूर्ण भाग म्हणून देशात योगाला मान्यता आहे. योगाचा पर्यटन वाढविण्याचे उत्पादन म्हणून उपयोग केल्यास अनेक संभावना उपलब्ध होतील. योग पर्यटनासाठी विविध स्थाने आहेत, त्यावर प्रकाश टाकणारा विशेष कार्यक्रम आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त पर्यटन मंत्रालयाच्यावतीने ‘देखो अपना देश’ या वेबमालिकेअंतर्गत सादर करण्यात आला. ‘‘एक भारत श्रेष्ठ भारत’’ या अंतर्गत भारताचा समृद्ध वारसा आणि परंपरांमध्ये असणारे वैविध्य सादर करण्यात आले.
‘देखो अपना देश’ वेबमालिकेचे 35 वे सत्र दि.21 जून, 2020 रोजी प्रसारण करण्यात आले. पर्यटन मंत्रालयाच्या अतिरिक्त महा संचालिका रुपिंदर ब्रार यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले तर ग्रीनवे कंपनीचे मुख्यकार्यकारी अधिकारी आणि मध्य प्रदेशातल्या पर्यावरण स्नेही महुआ वन रिसॉर्टचे संस्थापक अचल मेहरा यांनी हा कार्यक्रम सादर केला. अचल मेहरा हे योग प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघ (यू.के.) आणि पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये योग प्रशिक्षणाचे वर्ग घेतले आहेत. तसेच त्यांच्या पेंच इथल्या ‘योग रिट्रीट’ या संस्थेत नियमित योग प्रशिक्षणाचे वर्ग सुरू असतात.
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघामध्ये केलेल्या भाषणानंतर सन 2015 पासून 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला आणि त्याला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे, हे कौतुकास्पद असल्याचे मत अचल मेहरा यांनी यावेळी वेबिनारच्या प्रारंभी सांगितले. दि. 21 जून हा वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो. त्याला उत्तर गोलार्धामध्ये आणि इतर काही भागातही अतिशय महत्व आहे. यंदा संपूर्ण जगभर कोविड-19 महामारीचा उद्रेक लक्षात घेवून आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी ‘‘योग अॅट होम, योग विथ फॅमिली’ या संकल्पनेनुसार कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अचल मेहरा यांनी यावेळी सांगितले की, योग म्हणजे केवळ शारीरिक कसरत नाही, तर आरोग्य आणि कल्याण याकडे पाहण्याचा समग्र दृष्टीकोन आहे. यामुळे शारीरिक, मानसिक, भावनिक आणि अध्यात्मिक अशा चारही स्तरावर सकारात्मक परिणाम दिसून येतात. योग हा अतिशय सौम्य व्यायामाचा प्रकार असल्यामुळे योगासने करून वजन घटत नाही, असे गैरसमज लोकांमध्ये असल्याचे अचल मेहरा यांनी सांगितले. वास्तविक योग केल्यामुळे शरीराचे बळ वाढते, समतोल साधला जातो आणि अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने जर सूर्य नमस्काराचे एक तासाचे सत्र पूर्ण केले तर प्रत्येकवेळी 300 ग्रॅम वजन कमी होवू शकते. कोणत्याही शारीरिक कसरतीचा उद्देश हा प्रत्येक अवयवांच्या ऊर्जेमध्ये, क्षमतेमध्ये वाढ करणे हा असतो. उदाहरणार्थ अनुलोम-विलोम केल्यामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते.
योग केल्यामुळे केवळ ऊर्जेमध्येच वाढ होते असे नाही तर विविध आसनांमुळे मनाची एकाग्रता, शरीराचा तोल साधण्याचा सराव होतो. पतंजलीसारख्या योगसूत्रांवर आधारित आसनांमुळे मन, शरीर यांचा वापर करून शास्त्रीय पद्धतीने मुद्राभ्यास करून मनाला शांत, स्थिर करता येते. शांत मनामुळे शरीरही निरोगी होण्यास मदत मिळते. त्याचबरोबर प्रत्येकाने आपला अहंकार सोडणे आवश्यक आहे, हे काम योगच्या माध्यमामुळे मन चांगल्या पद्धतीने करू शकते. योग हा केवळ शारीरिक मर्यादांचा विषय नाही तर मनाच्या शांततेचा विषय आहे, असेही अचल मेहरा यांनी या कार्यक्रमामध्ये सांगितले.
भारतामध्ये असलेल्या योगविषयक केंद्रांची, पर्यटन स्थानांची माहिती यावेळी देण्यात आली. प्राचीन काळामध्ये भारतात योगशाळा, संस्था होत्या. आपल्या देशात योगविषयामध्ये दोन मुख्य प्रवाह आहेत. यामध्ये अष्टांग योग आणि हठ योग यांचा त्यामध्ये समावेश आहे. ऋषिकेश परिसरामध्ये काही संस्था आहेत, तसेच गोवा येथेही योग धर्मशाळा आहे. दिल्लीमध्ये मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आहे. त्याचबरोबर देशामध्ये अनेक ठिकाणी प्रख्यात योग ज्ञानकेंद्रे आहेत. याबरोबरच आपल्या देशामध्ये योग आणि निरोगी, कल्याणाचा अनुभव देणा-या विविध संस्था कार्यरत आहेत. खजुराहो, पुडुचेरी, राजस्थान आणि सिक्कीम या राज्यांमध्ये निसर्गाच्या सानिध्यात योग प्रशिक्षण देणा-या संस्था आहेत. त्यामुळेच या पर्यटन स्थानांमुळे देशाला लाभ होतो. अशा प्रकारच्या योग संस्थांची आणि कल्याण केंद्रांचा अधिकाधिक विकास करण्याची आवश्यकता आहे.
योग विद्या शिकण्याने आणि तिचा नियमित सराव केल्यामुळे कितीतरी लाभ होतात, हे आता पाश्चिमात्य देशांनाही चांगले समजले आहे. त्यामुळे भारतीय योगसंस्कृतीला महत्व आले आहे. पर्यटनाचा विचार करून आता या क्षेत्राला अधिक संघटित करण्यासाठी प्रयत्न भारत सरकारकडून होत आहेत. सध्याच्या कोविड साथीच्या काळामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने योग संस्था आणि प्रशिक्षकांनी आभासी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र संघानेही दुपारी 3.00 ते 4.00 या वेळेमध्ये आभासी योग सत्राचे आयोजन केले आहे. यावरूनच आपल्या प्राचीन आरोग्यविषयक संपत्तीला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख प्राप्त झाली आहे, हे लक्षात येते. म्हणूनच आपण आता आपल्या या प्राचीन खजिन्याचा उपयोग योगविषयक पर्यटन व्यवसाय वृद्धीसाठी केला पाहिजे. कोविड महामारीनंतर योग आणि कल्याण या क्षेत्रामध्ये पर्यटन व्यवसायात अमुलाग्र बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने विचार केला पाहिजे, असे मनोगत यावेळी व्यक्त करण्यात आले.
इलेक्ट्राॅनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि राष्ट्रीय इ-गव्हर्नन्स विभागाने ‘‘देखो अपना देश’’ वेबिनारच्या आयोजनासाठी महत्वपूर्ण मदत केली आहे. यामुळे कोणत्याही व्यावसायिक संस्थेलाही थेट तांत्रिक मदत केली जात आहे. आत्तापर्यंत आयोजित करण्यात आलेल्या सर्व वेबिनारची सत्रे - https://www.youtube.com/channel/UCbzIbBmMvtvH7d6Zo_ZEHDA/featured या लिंकवर आणि भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या सर्व समाज माध्यम हँडलवर उपलब्ध आहेत.
****
B.Gokhale/ S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1633429)
आगंतुक पटल : 212