विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या उन्हाळी संशोधन प्रशिक्षण कार्यक्रमासाठी 16,000 हून अधिक अर्ज प्राप्त
Posted On:
19 JUN 2020 5:08PM by PIB Mumbai
CSIR अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या, ’संशोधन प्रशिक्षणविषयक उन्हाळी कार्यक्रमाला (CSIR-SRTP)’ देशभरातून भरघोस प्रतिसाद मिळत असून निरनिराळ्या भागांतून 16,000 पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. CSIR च्या, NEIST म्हणजेच ईशान्य विज्ञान तंत्रज्ञान संस्था, जोरहाट (आसाम) या संस्थेचे संचालक डॉ. जी.नरहरी शास्त्री यांनी सदर माहिती दिली आहे.
CSIR-SRTP (2020) या संशोधन कार्यक्रमाच्या समन्वयाचे काम ईशान्य विज्ञान तंत्रज्ञान संस्था करीत असून, कार्यक्रमाचे यजमानपदही याच संस्थेकडे आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रारंभिक समारंभात डॉ.शास्त्री बोलत होते. या समारंभाचे उद्घाटन CSIR चे महासंचालक आणि भारत सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाचे सचिव डॉ.शेखर मांडे यांनी ऑनलाईन पद्धतीने केले.
“कोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे संपूर्ण देशातील शैक्षणिक वातावरण अनिश्चित झाले असतानाच या ऑनलाईन संशोधन प्रशिक्षणाच्या उन्हाळी कार्यक्रमाच्या संकल्पनेने मूळ धरले.” असे डॉ.शास्त्री यांनी सांगितले. “कोरोनाच्या साथीमुळे देशातील शिक्षणक्षेत्राला आलेली मरगळ झटकून विद्यार्थिवर्गातील रचनात्मक ऊर्जेला कार्यान्वित करण्याच्या उद्देशाने डॉ.शेखर मांडे यांनी CSIR-NEIST ला प्रस्तुत कार्यक्रम आखण्याच्या सूचना दिल्या” असे सांगून, अशाप्रकारचा कार्यक्रम, देशाच्या शैक्षणिक इतिहासात प्रथमच घडून येत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्ज पाठविण्याची मुदत 5 जूनवरून वाढवून 8 जून पर्यंत देण्यात आली होती. प्रचंड संख्येने प्राप्त झालेल्या अर्जांवरील प्रक्रिया, युद्धपातळीवर काम करून केवळ दोन दिवसांत पूर्ण करत, निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या नावांची सूची 10 जून 2020 रोजी प्रसिद्ध केल्याबद्दल डॉ.शास्त्री यांनी CSIR-NEIST च्या संबंधित विशेष पथकाचे कौतुक केले.
“आजवर युद्धे, रोगांच्या साथी, व नैसर्गिक आपत्तीकाळातच विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट प्रतीच्या अभिनव संकल्पना व नवोन्मेष यांचा जन्म झाला आहे. त्याचप्रकारे कोरोनाच्या साथीनेही आपल्यासमोर एक आव्हान उभे करीत, त्यातूनच विज्ञान-तंत्रज्ञानाला काहीतरी उत्तम करून दाखविण्याची संधीही दिली", असे सांगत डॉ.शास्त्री यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
****
B.Gokhale/J.Waishampayan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1632623)
Visitor Counter : 269