गृह मंत्रालय

NCR क्षेत्रातील कोविड-19 च्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक


कोविडचा सामना करण्यासाठी दिल्ली-NCR क्षेत्रात समान धोरण राबवण्यावर अमित शाह यांचा भर

कोविड-19 नियंत्रणासाठी अधिक चाचण्या करण्याची गरज, तसेच कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्ण ओळखणे आणि त्यावर त्वरित उपचार होणे आवश्यक –केंद्रीय गृहमंत्री

Posted On: 18 JUN 2020 8:48PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 जून 2020

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दिल्ली NCR क्षेत्रात कोविड-19 आजाराच्या परिस्थिती आणि तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. कोविडचा सामना करण्यासाठी दिल्ली आणि NCR दोन्ही परीसरात समान धोरण राबवले जावे, यावर त्यांनी भर दिला. NCR क्षेत्रातील दाटीवाटीची शहरी रचना लक्षात घेता, दिल्ली आणि NCR क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांनी या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी एकत्र बसून धोरण आखणे आणि त्याची अंमलबजावणी करणे योग्य ठरेल, असे शाह यावेळी म्हणाले. विषाणू संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी अधिक चाचण्या करणे आवश्यक असून कोविड चे पॉझिटिव्ह रुग्ण शोधून त्यांच्यावर वेळेत उपचार करणे आवश्यक ठरेल, असेही ते म्हणाले. यासाठी मिशन मोडवर काम करण्याची काम करण्याची गरज आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही. के. पॉल यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञ समितीने कोविड-19 च्या चाचणीसाठी 2,400 रुपये शुल्क निश्चित केले आहे आणि जर अशा चाचण्यांसाठी उत्तर प्रदेश आणि हरियाणात जास्त किंमत आकारली जात असेल, तर राज्य सरकारांनी अंतर्गत चर्चेनंतर आपल्या राज्यात चाचण्यांचे शुल्क कमी करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी सूचना शाह यांनी केली. या समितीने कोविड19 च्या रूग्णांसाठीचे बेड्स आणि उपचार याचेही दर निश्चित केले असून हेच दर NCR परिसरातील रुग्णालयांना लागू केले जाऊ शकतात,असेही त्यांनी सांगितले.

 नव्या रॅपिड अँटीजेन पद्धतीनुसार कोविड 19 ची चाचणी केली जावी, या चाचणीला ICMR ने परवानगी दिली आहे, अशीसूचना अमित शाह यांनी केली. या पद्धतीमुळे, चाचण्यांची क्षमता वाढेल, तसेच आजाराचे लवकर निदान झाल्यामुळे उपचारही लवकर सुरु केले जाऊ शकतील, असे ते म्हणाले.  

उत्तरप्रदेश आणि हरियाणा राज्यातील अधिकाऱ्यांनी कोविड-19 साठीचे बेड्स, वेंटीलेटर्स, ऑक्सिजन सिलेंडर, अतिदक्षता आणि रुग्णवाहिका अशा सर्वांची माहिती आणि 15 जुलैपर्यंत ही सर्व संसाधने वाढविण्यासाठी काय योजना आहे, याची सविस्तर माहिती सादर करावी, असे निर्देश गृहमंत्र्यांनी दिले. यामुळे, NCR आणि दिल्ली परिसरात कोरोनाचा सामना करण्यासाठी समान धोरण आखणे सोयीचे होईल, असे गृहमंत्री म्हणाले.

केंद्र सरकारकडून कोविडचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन अमित शाह यांनी NCR मधील अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आणि केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकारी तसेच, दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


 

* * * 

R.Tidke/R.Aghor/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1632428) Visitor Counter : 205