गृह मंत्रालय

एनसीआर प्रदेशात भूकंपाचे धक्के जाणवले : “घाबरून जाण्याची गरज नाही”- राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र प्रमुख


दिल्ली-एनसीआर प्रदेशात नुकत्याच जाणवलेल्या भूकंपासंबंधी बैठकीनंतर सज्जता आणि भूकंपाचा धोका कमी करण्याची गरज एनडीएमएने केली अधोरेखित

Posted On: 11 JUN 2020 10:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 जून 2020


नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (एनसीएस)चे संचालक डॉ. बी के बन्सल यांनी म्हटले आहे की, दिल्ली-एनसीआर प्रदेशात नुकत्याच जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र भूकंपाचा धोका कमी करण्यासाठी सज्जता आणि नुकसान कमी होण्याबाबत उपाययोजना करणे महत्वाचे आहे. 

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) दिल्ली-एनसीआर प्रदेशातील भूकंपाचा धोका कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आणि सज्जतेबाबत चर्चा करण्यासाठी काल बोलावलेल्या बैठकीत डॉ. बन्सल बोलत होते.

एनसीएसच्या संचालकानी माहिती दिली की, दिल्ली आणि त्याच्या आसपासच्या परिसरात भूकंपाचा इतिहास पाहता दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवणे, ही सामान्य बाब आहे. मात्र जगात असे कोणतेही सिद्ध तंत्रज्ञान नाही, ज्यात भूकंपांचे स्थान, वेळ आणि तीव्रतेच्या बाबतीत ठोसपणे अंदाज वर्तवता येईल. 

बैठकीनंतर एनडीएमएने राज्यांना पुढील उपाययोजना करण्याची विनंती केली आहे:

  1. यापुढे बांधकामांमध्ये भूकंपरोधक प्रणालीसाठी इमारत पोटकायद्यांचे पालन आणि असुरक्षित बांधकाम साहित्य टाळण्याचे सुनिश्चित करा.
  2. असुरक्षित प्राधान्य संरचना, विशेषत: लाईफलाइन इमारतीची पुनर्बांधणी करा. खाजगी इमारतींनाही जेथे आवश्यक असेल तेथे टप्प्याटप्प्याने जोखीम कमी करण्यासाठी पुन्हा मजबूत बांधकाम करा.
  3. भविष्यात भूकंपाचा सामना करण्यासाठी नियमितपणे सराव सत्र (मॉक एक्सरसाई) आयोजित करा आणि भूकंपानंतर त्वरित प्रतिसादासाठी मानक परिचालन नियमावली आखा. 
  4. भूकंप झाल्यावर काय करावे आणि काय करु नये, याविषयी जनजागृती कार्यक्रम हाती घ्या.

या बैठकीला एनडीएमए सदस्य, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे महासंचालक आणि दिल्ली, राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेशाच्या एनसीटी सरकारचे वरिष्ठ अधिकारी, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.


* * *

S.Pophale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1631072) Visitor Counter : 198