पर्यटन मंत्रालय

पर्यटन मंत्रालयाच्या ‘देखो अपना देश’ वेबिनार मालिकेच्या 28 व्या सत्रामध्ये "इंडिया- ए गोल्फर्स पॅराडाईस" अंतर्गत भारतामध्ये गोल्फ पर्यटनाला असलेल्या संधींचे प्रदर्शन

Posted On: 05 JUN 2020 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 जून 2020

भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्यावतीने दि. 4 जून,2020 रोजी 'देखो अपना देश' या वेबिनार मालिकेचे 28 सत्र प्रदर्शित करण्यात आले. "इंडिया- ए गोल्फर्स पॅराडाईस" या शीर्षकाअंतर्गत दाखवलेल्या या सत्रामध्ये भारतामध्ये अनेक ठिकाणी गोल्फ खेळण्यासाठी असलेल्या स्थानांचा परिचय करून दिला. तसेच त्या स्थळांचे सौंदर्य, वैशिष्ट्ये दाखवण्यात आली.  आणि देशातल्या तसेच परदेशातल्या गोल्फप्रेमींना भारतामध्ये वर्षातले सर्व म्हणजे 365 दिवस सुट्टीचा आनंद प्रदान करणारी ही गोल्फ स्थाने असल्याचे सांगितले.

या वेबिनारचे संचालन पर्यटन मंत्रालयाचे अतिरिक्त महासंचालिका रूपिंदर ब्रार यांनी केले तर पॅशनल्सचे सह -संस्थापक राजन सेहगल, बिलीस्ट ट्रॅव्हल कंपनीचे संचालक अमिष देसाई, आणि माय गोल्फ टूरचे व्यवस्थापकीय संचालक अरूण अय्यर यांनी या वेबिनारचे सादरीकरण केले. या तीनही वेबिनार सादरकर्तेनां  प्रवास आणि पर्यटन क्षेत्रात काम करण्याचा गेल्या अनेक दशकांचा अनुभव आहे. त्यांनी देशाच्या पर्यटन क्षेत्रामध्ये गोल्फ पर्यटनालाही मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळावे, यासाठी प्रोत्साहन दिले. बाहेरच्या प्रवाशांनी खास गोल्फ खेळण्यासाठी भारतभेटीवर यावे, यासाठी या तीनही मान्यवरांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.

‘देखो अपना देश’ या वेबिनार मालिकेमुळे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अंतर्गत  भारतामधली समृद्ध विविधता दर्शविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच आभासी व्यासपीठाव्दारे ‘अखंड भारत श्रेष्ठ भारत’ या भावनेचा सातत्याने प्रसार केला जात आहे.

या गोल्फविषयीच्या वेबिनारमध्ये प्रारंभी रुपिंदर ब्रार यांनी गोल्फसारख्या आणि इतर कोणत्याही क्रीडा प्रकारासाठी ध्यानधारणा करून एकाग्रता साधणे कसे आवश्यक आहे तसेच गोल्फसारख्या खेळामुळे तणाव कसा दूर करता येईल, हे सांगून सादरीकरणाला सुरुवात केली. एका पाहणीनुसार एक गोल्फपटू सामान्य पर्यटकांपेक्षा 40 ते 45 टक्के जास्त खर्च करतो आणि गोल्फ खेळाडू वर्षभरामध्ये 2-3 सुट्ट्या घेतात असे दिसून आले आहे. बहुतांश देशांच्या तुलनेमध्ये गोल्फ खेळण्यासाठी भारतातल्या हवामानाची परिस्थिती अधिक अनुकूल आहे. त्यामुळे भारतामध्ये गोल्फ पर्यटनाच्या वृद्धीला भरपूर प्रमाणात संधी आहे, असे राजन यांनी यावेळी सांगितले. 

देशाच्या पश्चिम आणि पूर्वेकडील क्षेत्रामध्ये असलेल्या गोल्फ मैदानांची माहिती देण्यासाठी वेबिनारच्या या सत्राची सूत्रे अरूण अय्यर यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यांनी सर्वात प्रथम महाराष्ट्रातल्या बॉम्बे प्रेसिडन्सी गोल्फ कोर्स, दि विलिंग्टन स्पोर्टस क्लब आणि मुंबईतल्या खारघर व्हॅली गोल्फ कोर्स यांची माहिती दिली. ही सर्व गोल्फ मैदाने अगदी शहराच्या मध्यवर्ती भागात आहेत, तरीही शहराच्या गोंगाटापासून, गडबडीपासून मुक्तता देवून खेळाचा आनंद देणारी आहेत, असे नमूद केले. इतर गोल्फ कोर्सपैकी त्यांनी लोणावळ्यानजीकच्या अॅम्बी व्हॅली गोल्फ कोर्सची माहिती दिली. विशेष म्हणजे अॅम्बी व्हॅली गोल्फ कोर्समध्ये रात्रीच्यावेळी गोल्फ खेळण्याची सुविधा आहे. त्यानंतर त्यांनी पुणे गोल्फ कोर्स आणि पुण्याजवळच खो-यामध्ये असलेल्या ऑक्सफर्ड गोल्फ कोर्सची माहिती दिली. या दोन्ही गोल्फ कोर्सची वेगवेगळी वैशिष्टये आहेत, त्यांची अनेकजण प्रशंसा करतात, असेही त्यांनी सांगितले.

यानंतर, या वेबिनारमध्ये अहमदाबादपासून ते कोलकाता आणि मेघालयपर्यंतच्या विविध स्थानी असलेल्या गोल्फ कोर्सची माहिती दिली. वेबिनारच्या अंतिम भागामध्ये देशाच्या दक्षिण भागातल्या गोल्फ स्थानांविषयी अतिशय मनोरंजक माहिती दिली. यामध्ये कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू राज्यांमध्ये असलेल्या प्रत्येक गोल्फ मैदानांचे यथास्थित वर्णन, मनोरंजक तथ्ये सादर केली. गोल्फ पर्यटन हा व्यवसाय केवळ गोल्फ खेळाडूंमुळेच भरभराटीस येणार आहे असे नाही तर सर्वांनी खास ‘गोल्फ सुट्टी’ काढून सर्व परिवारासह त्याचा आनंद आणि अनुभव घेतला पाहिजे, यावर अमिष देसाई यांनी या वेबिनारमध्ये भर दिला. 

पर्यटन मंत्रालयाने दि. 1 एप्रिल, 2020 पासून ‘देखो अपना देश’ या वेबिनार मालिकेला प्रारंभ केला. या मालिकेमध्ये आत्तापर्यंत 28 सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

‘देखो अपना देश’ वेबिनार आयोजनासाठी  इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाच्या नॅशनल ई-गव्हर्नन्स विभाग (एनईजीडी) तंत्रज्ञान सहकार्य देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

या वेबिनारची आत्तापर्यंत झालेली सर्व सत्रे https://www.youtube.com/channel/UCbzIbBmMvtvH7d6Zo_ZEHDA/featuredवर तसेच भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या सर्व समाज माध्यमांवर उपलब्ध आहेत.

या पुढील वेबिनार दि.6 जून, 2020 रोजी आहे. त्यामध्ये ‘‘वाईल्ड वंडर्स ऑफ मध्य प्रदेश’’ या विषयाची माहिती देण्यात येणार आहे. वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी कृपया  https://bit.ly/WildwondersDADया संकेतस्थळावर नोंदणी करावी.

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1629742) Visitor Counter : 158