विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

CSIR च्या केंद्रीय यंत्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने विकसित केला देशी बनावटीचा व्हेंटिलेटर

Posted On: 03 JUN 2020 8:45PM by PIB Mumbai

 

कोविड-19 चा प्रसार वाढत असताना दुसरीकडे, दुर्गपूरमधील CMERI म्हणजेच केंद्रीय यंत्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेतील संशोधकांनी पूर्ण देशी बनावटीचा व्हेंटिलेटर विकसित केला आहे. CMERI ही CSIR अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्थेच्या अंतर्गत काम करणारी संस्था आहे. CSIR-CMERI चे संचालक प्रा डॉ हरीश हिरानी यांच्या उपस्थितीत व्हेंटीलेटरचे अनावरण करण्यात आले. दुर्गापूरमधील एका खासगी रुग्णालयाचे अध्यक्षही यावेळी उपस्थित होते.

"या व्हेंटिलेटरची रचना विविध सुटे भाग हे संबंधित वापरकर्त्या क्षेत्राच्या गरजांनुसार मुद्दाम वेगळे तयार केलेले आहेत; तसेच किफायतशीर किमतीचाही विचार यामध्ये प्रामुख्याने करण्यात आलेला आहे.", अशी माहिती डॉ हिरानी यांनी दिली. दुर्गापूरमधील दोन रुग्णालयांच्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांनी दिलेल्या अभिप्राय सूचनांनुसार सदर व्हेंटीलेटरच्या रचनेत तसेच तंत्रपद्धतीत अनेकदा बदल करण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले. या व्हेंटीलेटरची किंमत सुमारे 80 हजार ते 90 हजार रुपये इतकी आहे. अन्य रुग्णांच्या गरजांनुसार यामध्ये पुढेही सुधारणा केल्या जाऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.

'एखाद्या रुग्णास व्हेंटीलेटरचा किती प्रभावी उपयोग होतो, हे त्याची सेवा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याच्या प्रतिसादावरही अवलंबून असते' अशी माहिती देऊन, डॉ. हिरानी यांनी, यापुढे यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे रुग्णाच्या बदलत्या गरजेनुसार आपोआप बदल करण्यावर प्रयत्न केले जातील, असे सांगितले.

CSIR-CMERI ने विकसित केलेल्या या व्हेंटीलेटरमुळे देशाच्या आरोग्यसेवा उत्पादनाच्या क्षेत्रात नवा बदल घडून येईल, तसेच आयातीवरील खर्चही मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकेल, अशी भावना संस्थेतील शास्त्रज्ञांनी व्यक्त केली.

डॉ हिरानी यांनी, या व्हेंटीलेटरच्या रचनेतील वैशिष्ट्यांचे उपयोग विविध दृष्टिकोनातून स्पष्ट केले. या व्हेंटीलेटरचे सुटे भाग निरनिराळ्या उद्योगांमधून स्वतंत्रपणे तयार केले जाऊ शकतात. त्यामुळे याचे प्रचंड उत्पादन हे अनेक उद्योगांना फायदेशीर ठरू शकते, असे त्यांनी सांगितले. यामुळे व्हेंटीलेटरची किंमत लक्षणीय कमी होऊन आर्थिक दुर्बल रुग्णांच्या दृष्टीने तसेच सरकारी अनुदानावरील आरोग्यसेवा योजनांसाठीही ते उपयुक्त ठरणार आहे. आरोग्यसेवा पायाभूत सुविधांचे तृतीयक क्षेत्र अद्ययावत होण्यास यामुळे मदत होणार आहे, अशी माहितीही डॉ हिरानी यांनी दिली. नव्याने विकसित झालेल्या या व्हेंटीलेटरचे, लवकरच व्यापारी स्वरूपात उत्पादन सुरु करण्यासाठी विविध उद्योजकांशी बोलणी सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.

डॉ हिरानी यांनी यावेळी, व्हेंटिलेटर विकसित करणाऱ्या डॉ अनुपम सिन्हा, संजय हंसदा, कल्याण चटर्जी आणि अविनाश यादव यांच्या पथकाचे कौतुक केले.

S.Pophale/J.Waishampayan/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1629345) Visitor Counter : 302