कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
प्रविष्टि तिथि:
03 JUN 2020 11:34PM by PIB Mumbai
केंद्रिय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोविड प्रतिबंधात्मक उपायांबाबात जम्मू आणि काश्मिर महापालिका समित्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली.
आपल्या सुरुवातीच्या वक्तव्यात डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, कोविड साथीच्या आजाराच्या पूर्वीच्या दोन टप्प्यात, देशाच्या वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, हा मुख्य विचार होता; आता नंतरच्या टप्प्यात, मुख्य जबाबदारी म्हणजे देशाच्या विविध भागातून स्वगृही परतणाऱ्या नागरिकांचा सुलभ प्रवास सुनिश्चित करणे. तथापि, सध्याच्या चालू परिस्थितीमध्ये, दोन प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, मुख्य म्हणजे प्रतिबंध आणि जनजागृती, ही दोन उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी, स्थानिक समित्यांची, त्यांच्या प्रतिनिधींची तसेच समाजाची भूमिका यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
दोन तास चाललेल्या या बैठकीदरम्यान, जम्मू महानगरपालिकेचे महापौर चांद्र मोहन गुप्ता यांच्यासह जम्मू महानगरपालिकेच्या उपमहापौर पूर्णिमा शर्मा, श्रीनगर महानगरपालिकेचे महापौर जुनैद अझीम मट्टो व श्रीनगर महानगरपालिकेचे उपमहापौर परवेझ कुरेशी यांनी आपली मते व्यक्त केली. याशिवाय बिल्लावर, बिशोली, हिरानगर, भडेवरा, दोडा, विजयपूर, कुपवाडा, बारामुल्ला, अनंतनाग, चेनानी, रामगड, परोल, बटोट येथील महानगरपालिका समितीच्यांचे अध्यक्ष आणि इतरही या चर्चेत सहभागी झाले होते.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत या घटकेचा महत्त्वाचा मंत्र, ‘चिंता नाही जनजागृती’, पाळण्याची गरज आहे. यासाठी, महापालिका समित्यांवर निवडून आलेले प्रतिनिधी, जे तळागाळापर्यंत पोहोचू शकणारे नेते आहेत त्यांनी, लोकांना घाबरून न जाता खबरदारी घेण्याचे महत्त्व समजावून सांगितले पाहिजे.
आपल्याला लोकांना समजावून सांगायचे आहे की, जरी कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्यांची संख्या अधिक दिसत असली तरीही, हे लक्षात घ्यायला हवे की, मोठ्या प्रमाणावर तपासणी होत असल्यामुळे आणि मोठ्या संख्येने नागरिकांचे तपसाणीसाठी नमुने घेतल्यामुळे हे चित्र दिसत आहे. अन्यथा, साथीच्या व्याप्तीचा टक्का आणि मृत्यूदर हा गेल्या दहा आठवड्यांपासून तसाच राहिला आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी यावेळी सांगितले.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, धूळ स्वच्छता, देखभाल-दुरुस्ती, अन्य स्वच्छता, सुरक्षित अंतर आदी सारख्या महापालिकेच्या उपक्रमांना कोविड साथीच्या आजाराच्या सध्याच्या चालू परिस्थितीमध्ये विशेष महत्त्व असेल; तसेच नियोजन व अंमलबजावणीत महापालिकेच्या समित्यांना सोबत घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
डॉ. जितेंद्र सिंह यांचा व त्यांच्या कार्यालयाचा महापालिका समित्यांशी दैनंदिन असलेला संपर्क तसेच आढावा या गोष्टी बाबत समित्यांच्या प्रमुखांनी कौतुक व्यक्त केले. यावेळी, स्थानिक मंत्र्यांकडून निधी देण्यास उशीर झाल्याचे त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
कोरोना संकटकाळात महानगरपालिका समित्या व नागरिकांनी बजावलेल्या भूमिकेचे डॉ. जितेंद्र सिंह यांनी कौतुक केले; तसेच या सगळ्या परिस्थितीमध्ये ते सगळ्यांशी वैयक्तिक पातळीवर समन्वय साधणार आहेत, याबाबत त्यांनी सर्वांना आश्वासन दिले.
*****
S.Pophale/S.Shaikh/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com