संरक्षण मंत्रालय
सैन्याच्या कमांडरांची व्दैवार्षिक परिषद
Posted On:
29 MAY 2020 9:48PM by PIB Mumbai
सैन्यातल्या कमांडर दर्जाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या वैचारिक व्दैवार्षिक परिषदेचे दि. 27,28 आणि 29 मे, 2020 या दरम्यान आयोजन करण्यात आले होते. नवी दिल्लीतल्या साऊथ ब्लॉक येथे झालेल्या या परिषदेमध्ये वैचारिक स्तरावर विचार विनिमय केल्यानंतर त्या निर्णयांचे धोरणात्मक नियोजन करून प्रत्यक्ष अंमल करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. वास्तविक या परिषदेचे गेल्या महिन्यात म्हणजे, एप्रिल 2020 मध्ये आयोजन करण्यात आले होते. परंतु कोविड-19 चा झालेला उद्रेक लक्षात घेवून ही परिषाद पुढे ढकलण्यात आली होती. या परिषदेचा आज पहिला टप्पा पार पडला.
परिषदेच्या तीन दिवसांमध्ये भारतीय सैन्यामधल्या शिखर नेतृत्वाने सध्याच्या परिस्थितीनुसार सामोरी येत असलेली सुरक्षा आव्हाने आणि त्यांचे विविध पैलू, तसेच त्यासंबंधित येणारे मुद्दे, याबाबींवर सखोल चर्चा केली. या व्यतिरिक्त मनुष्यबळ विकास व्यवस्थापन, दारूगोळा- शस्त्रास्त्र व्यवस्थापन, एकमेकांशी संलग्न असलेल्या आणि एकाच ठिकाणी असलेल्या प्रशिक्षण संस्थांचे विलीनीकरण आणि लष्करी प्रशिक्षण कमांडच्या मुख्यालयामध्ये लष्करी प्रशिक्षण संचालनालयाचे विलीनीकरण याविषयांवर चर्चा करण्यात आली. लष्करी कल्याण गृहनिर्माण संघटनेच्या (एडब्ल्यूएचओ) आणि लष्करी कल्याण शिक्षण संस्था (एडब्ल्यूईएस) यांच्या ‘बोर्ड ऑफ गव्हर्नर’च्या बैठकीचे आयोजनही या काळात करण्यात आले होते.
या परिषदेचे दुसरे सत्र दि.24 ते 27 जून 2020 या काळात आयोजित करण्यात येणार आहे. दुस-या टप्प्यामध्ये डीएमए आणि डीओडी यांच्याबरोबर संवाद साधला जाणार आहे. तसेच कमांड मुख्यालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार चर्चा करण्यात येणार आहे. प्रशासकीय मुद्यांवरही विचार -विनिमय करण्यात येईल. या सत्रामध्ये संरक्षण मंत्री आणि सीडीएस (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) उपस्थित राहून अधिका-यांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.
M.Jaitly/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1627757)
Visitor Counter : 246