दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

पंतप्रधानांचे “आत्मनिर्भर भारताचे” स्वप्न साकार करण्याचे रवीशंकर प्रसाद यांचे भारतीय टपाल विभागाला आवाहन


भारतीय टपाल विभागाकडून देशभरात 2000 टन औषधे आणि वैद्यकीय सामग्रीचे वितरण

“आधार”च्या माध्यमातून होणाऱ्या पेमेंट प्रणालीचा वापर करून 1500 कोटी रुपयांचे घरपोच वितरण

Posted On: 22 MAY 2020 10:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 मे 2020


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने काम करावे अशी सूचना केंद्रीय दळणवळण, कायदा आणि न्याय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी आज भारतीय टपाल विभागाचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली. कोविड-19 च्या आपत्तीच्या काळात टपाल विभागाने केलेल्या कामांचा आणि प्रयत्नांचा केंद्रीय मंत्र्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आढावा घेतला. दळणवळण राज्यमंत्री संजय धोत्रे, टपाल विभागाचे सचिव पी. के. बिसोई, टपाल सेवा विभागाच्या महासंचालक अरुंधती घोष आणि इतर वरिष्ठ अधिकारी मुख्यालयातील या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते. सर्व पोस्टमास्टर जनरल संबंधित परिमंडळाच्या मुख्यालयातून या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.

सी-डॉटने विकसित केलेल्या पहिल्या “ मेक इन इंडिया” व्हीसी सोल्युशन प्रणालीवर या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे आयोजन करण्यात आले होते.

भारतीय टपाल विभागाच्या कोविड आपत्ती काळातील प्रयत्नांची ठळक वैशिष्ट्ये:

  • देशभरातील गरजू व्यक्ती आणि रुग्णालयांसाठी 2000 टनापेक्षा जास्त औषधे आणि वैदयकीय सामग्रीची नोंदणी आणि पुरवठा करण्यात आला. 
  • पुरवठा साखळी बळकट करण्यासाठी दररोज 25000 किमी प्रवास करणारे आणि 75 टनापेक्षा जास्त टपाल, पार्सल यांची वाहतूक करणारे रस्ते वाहतूक जाळे सुरू करण्यात आले.
  • “आधार”च्या माध्यमातून होणाऱ्या पेमेंट प्रणालीचा वापर करून इंडिया पोस्ट पेमेट्स बँकच्या सुमारे 85 लाख लाभार्थ्यांना सुमारे 1500 कोटी रुपयांचे घरपोच वितरण करण्यात आले.
  • आर्थिक समावेशनाच्या 760 कोटी रुपयांच्या विविध योजनांतर्गत 75 लाख इलेक्ट्रॉनिक मनी ऑर्डरद्वारे पैसे देण्यात आले.
  • डीबीटी अर्थात थेट लाभ हस्तांतरण योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात 1100 कोटी रुपये जमा करण्यात आले.
  • स्वयं- योगदाना आणि स्वयंसेवी संस्थांनी मदत म्हणून दिलेल्या अन्न आणि शिधासामग्रीच्या सुमारे सहा लाख पाकिटांचे वितरण करण्यात आले.

मुख्य पोस्ट मास्टर जनरलनी टपाल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी समर्पित संघभावनेने केलेल्या कामांची माहिती यावेळी दिली. विविध परिमंडळांनी विविध कामांमध्ये पुढीलप्रमाणे प्रावीण्य दाखवले.

  • गुजरात आणि उत्तर प्रदेश यांनी फार्मास्युटिकल आणि  औषध कंपन्यांशी संपर्क राखण्यात आणि त्यांना माल वाहतूक शास्त्रविषयक पाठबळ देण्यात पुढाकार घेतला.
  • बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि तेलंगण आर्थिक समावेशनात आघाडीवर राहिले आहेत.
  • उत्तर, ईशान्य आणि दक्षिणेकडच्या राज्यांसाठी एक प्रवेशद्वार म्हणून काम करण्यात दिल्ली, प. बंगाल आणि महाराष्ट्र परिमंडळांनी उत्तम कामगिरी केली.
  • जनतेकडून सेवेची मागणी नोंदवता यावी आणि ती पूर्ण करण्यासाठी हरयाणा, कर्नाटक, केरळ यांनी त्यांच्या मागण्यांना अनुरुप ऍप्स विकसित केले.

टपाल आणि इतर वस्तू पोचवण्यासाठी आणि प्रादेशिक विशेषतांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष नावीन्यपूर्ण मॉडेल्सची देखील यावेळी मुख्य पोस्ट मास्टर जनरलनी पुढीलप्रमाणे माहिती दिली  :

  • जम्मू आणि काश्मीरने माता वैष्णो देवी मंदिराचा प्रसाद आणि काश्मीरमधील केसर देशभरात पुरवण्याची योजना अंतिम केली आहे.
  • टपाल कार्यालये आणि सीएससी यांच्या माध्यमातून देखील  भारतीय औषधांची नोंदणी आणि वितरणाला पंजाब प्रोत्साहन देत आहे.
  • “आपका बँक आपके द्वार” च्या माध्यमातून सुमारे 147 कोटी रुपयांच्या 11.65 लाख ठेवींचे वितरण करण्यात बिहारने आपली कामगिरी उंचावली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने काम करावे अशी सूचना केंद्रीय मंत्र्यांनी मुख्य पोस्ट मास्टर जनरल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आपला दृष्टीकोन मांडताना केली. कोविड पश्चात विभागासमोर असलेल्या प्राधान्यक्रमाच्या क्षेत्रांचा पुढील आराखडा त्यांनी मांडला:

  • आयुर्वेद, युनानी, सिद्ध इत्यादींचा समावेश असलेल्या भारतीय औषधांचा पुरवठा देशभरात करण्यासाठी मालवाहतूक विषयक पाठबळ पुरवावे.
  • “डाकिया” म्हणजेच पोस्टमन हा स्थलांतरित मजूर, त्यांची कौशल्ये, त्यांची खाती उघडणे आणि मनरेगा आणि इतर सरकारी योजना अंतर्गत त्यांचा मेहनताना चुकता करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती गोळा करण्याचा सर्वात पहिला स्रोत असला पाहिजे.
  • भारतीय टपाल विभागाने एक धोरणात्मक योजना तयार केली पाहिजे. या अंतर्गत टेलि मेडिसिन, कृषी उत्पादने. हस्तकला वस्तू, कारागीरांच्या कलाकृती आणि इतर स्थानिक वैशिष्ट्यांचा पुरवठा देशभरात मध्यस्थांना बाजूला सारून उत्पादकांकडून थेट ग्राहकांकडे करणाऱ्या भारतीय पुरवठा साखळीचा अग्रदूत बनण्याचा विचार केला पाहिजे.
  • कोविड-19च्या काळात औषधे आणि अत्यावशक वस्तूंचा पुरवठा करताना मिळालेल्या अनुभवाचा वापर अशा प्रकारचे मॉडेल निर्माण करण्याची संधी म्हणून करण्यावर रवीशंकर प्रसाद यांनी भर दिला.
  • टपाल विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी या आपत्तीच्या काळात कोविड योद्धा म्हणून बजावलेल्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले.

प्रत्येक भारतीयाचे टपाल कार्यालयाच्या प्रचंड मोठ्या जाळ्याच्या आणि तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीयाचे सक्षमीकरण करण्यावर म्हणजेच आर्थिक समावेशनाच्या पाठबळाने डिजिटल समावेशन आणि भक्कम भौतिक व्यवहार यावंर दळणवळण मंत्र्यांनी कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी भर दिला. 


* * *  

B.Gokhale/S.Patil/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1626259) Visitor Counter : 209