शिक्षण मंत्रालय

जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांचे केंद्रीय मंत्रालयाने केले सुरक्षित स्थलांतर-केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री

Posted On: 21 MAY 2020 7:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21  मे 2020

 

टाळेबंदीच्या काळात नवोदय विद्यालय समितीने 15 मे 2020 रोजी, देशाच्या विविध भागात असलेल्या 173 जवाहर नवोदय विद्यालयातील 3000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी दिली.

जवाहर नवोदय विद्यालय ही सहशैक्षणिक निवासी शाळा आहे, जी नवोदय विद्यालय समितीच्या वतीने चालविली जाते, जी मानव संसाधन विकास मंत्रालय, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग यांच्या अंतर्गत काम करणारी एक स्वायत्त संस्था आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागातील हुशार मुलांना त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक – आर्थिक स्थितीचा विचार न करता चांगल्या दर्जाचे आधुनिक शिक्षण दिले जाते. ज्यामध्ये संस्कृती शिक्षण देणे, मूल्य रुजविणे, पर्यावरण विषयक जागृती, साहसी उपक्रम व शारीरिक शिक्षण मुलांना देणे, हा नवोदय विद्यालयाचा मुख्य उद्देश आहे. सध्या, विविध राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये साधारण 661 जवाहर नवोदय विद्यालय मंजूर आहेत, ज्यात 2.60 लाखांहून अधिक विद्यार्थी विनामूल्य शिक्षण घेत आहेत.

https://twitter.com/DrRPNishank/status/1263388946618187776?s=19

भारतातील संस्कृतीची आणि लोकांची विविधता विद्यार्थ्यांना समजावी, यासाठी एका ठराविक भाषिक प्रदेशात असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयातून दुसऱ्या भाषिक प्रदेशस्थित असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थ्यांना स्थलांतरित केले जाते. ही स्थलांतरणाची योजना पूर्वीपासून चालू आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण करण्यात मोलाची भूमिका बजावत आहे.

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर, नवोदय विद्यालय समितीने(एनव्हीएस) उन्हाळी सुटीचे नियोजन अलिकडे केले आणि जवाहर नवोदय विद्यालये 21.03.2020 पासून बंद करण्यात आली.

देशभरात टाळेबंदी सुरू होण्यापूर्वी जेएनव्हीचे बहुतेक विद्यार्थी आपापल्या निवासस्थानांवर (जे बहुतेक जिल्हा हद्दीत आहेत) पोहोचले होते, बाहेरगावचे 3169 विद्यार्थी जे 173 जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये स्थलांतरण योजनेअंतर्गत होते, आणि जेईई मुख्य परीक्षेसाठी पुणे येथील 'सेंटर ऑफ एक्सलन्स' येथे शिकत असलेले 12 विद्यार्थी मात्र स्वगृही जाऊ शकलेले नाहीत.

बाहेरगावचे विद्यार्थी आणि 13 – 15 वर्षे वयोगटात असलेले बहुतांश विद्यार्थी मागील सहा महिन्यांपासून कुटुंबियांना भेटलेले नाहीत; त्यामुळे ते अधिक अस्वस्थ होते आणि त्यांना टाळेबंदी अधिक वाढल्यानंतर त्यांना कुटुंबाची आठवण येत होती.

या स्थलांतरित विद्यार्थ्यांना लवकरात लवकर त्यांच्या घरी पाठविण्याच्या संभाव्य पर्यायांवर समितीचा विचार सुरू होता. याबाबतच्या गृहमंत्रालय, राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनांबरोबर तसेच लागणाऱ्या आवश्यक त्या सर्व परवानग्यांबाबत झालेल्या चर्चेच्या विविध फेऱ्यांनंतर, समितीने या विद्यार्थ्यांना टाळेबंदीच्या काळातच बसमधून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याला प्रारंभ केला. विविध जवाहर नवोदय विद्यालयांमधून विद्यार्थ्यांचे स्थलांतरण 9 मे 2020 पर्यंत सुरू होते. झाबुआ येथे विद्यार्थी त्यांच्या गन्तव्य स्थानी पोहोचल्यानंतर 15 मे 2020 रोजी या प्रक्रियेचा समारोप झाला.

ही सर्व प्रक्रिया नवोदय विद्यालय समितीने अतिशय सावधपणे आखली आणि तिला पूर्ण रूप देखील दिले. गाड्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते, मास्क पुरविण्यात आले होते, सॅनिटायझर तसेच अन्न आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या गोष्टी व सोबत शिक्षकांची देखील सोय करण्यात आली होती. प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांना कोणतेही बाहेरचे अन्नपदार्थ खाण्यासाठी दिले गेले नाहीत. विद्यार्थ्यांचा प्रवास सुरू होण्यापूर्वी आणि संबंधित जिल्ह्यात गन्तव्य स्थानी प्रवास संपताना जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली.

जवाहर नवोदय विद्यालयापासून प्रवासाच्या अंतरानुसार सर्वाधिक मोठा प्रवास या काळात विद्यार्थ्यांनी 3060 किलोमीटर अंतर असलेला प्रवास कर्नाल (हरियाणा) आणि जेएनव्ही, तिरुअनंतपुरम (केरळ) दरम्यान (तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगण, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांमधून प्रवास करीत) प्रवास केला. तर जवाहर नवोदय विद्यालयापासून बोलंगेर (ओडोशा) आणि जेएनव्ही, अन्नूपूर (मध्यप्रदेश) हा 420 किलोमीटर अंतर असलेला कमी अंतराचा प्रवास यात झाला.

जेएनव्ही, नैनीताल (उत्तराखंड) मधील विद्यार्थी जेएनव्ही, वायनाड (केरळ) येथे उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक मार्गे पोहोचले. तर जेएनव्ही, सेनापती (मणिपूर) येथून नागालँड, आसाम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तरप्रदेश येथील अवघड भूप्रदेशाचा प्रवास करून जेएनव्ही, झांबुआ (मध्यप्रदेश) येथे 15 मे 2020 रोजी सुरक्षित पोहोचले.

आवश्यक परवानग्या मिळविण्यात विलंब झाल्यामुळे, प्रवासालाही विलंब झाला आणि जेएनव्ही, अमेठी (उत्तर प्रदेश) ते जेएनव्ही अलीप्पी (केरळ) या प्रवासासाठी सर्वाधिक लागलेला काळ हा पाच दिवस आणि 15 तासांचा होता तर प्रवासाचा सर्वात कमी काळ हा (नऊ तास आणि 30 मिनिटांचा) जेएनव्ही बोलंगीर ते जेएनव्ही, अन्नुपूर दरम्यानचा होता.

या प्रवासा दरम्यानच्या विद्यार्थ्यांच्या हालचालींवर एनव्हीएस आणि एमएचआरडी कडून दैनंदिन देखरेख ठेवली जात होती, तसेच त्याबाबत प्रगती अहवाल देखील ठेवला जात होता. 173 शाळांमधील सर्व 3169 विद्यार्थी 4.1 दशलक्ष किलोमीटरचा प्रवास करून आपापल्या ठिकाणी विनाअडथळा स्वगृही सुरक्षित पोहोचले आहेत. नवोदय विद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी केलेल शिस्तबद्ध नियोजन हे विद्यार्थ्यांच्या वर्तनातून दिसून आलेच तसेच राज्य / जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांचा उत्साह त्यांची कामाप्रतिची वचनबद्धता आणि अथक प्रयत्नांसाठी कौतुकास्पद आहे.

S.Pophale/S.Shaikh/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1625865) Visitor Counter : 259