शिक्षण मंत्रालय

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठा(IGNOU)च्या हिंदी भाषेतील ऑनलाईन पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे मनुष्यबळमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन

Posted On: 20 MAY 2020 8:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20  मे 2020

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री, रमेश पोखरीयाल निःशंक यांच्या हस्ते आज फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून IGNOU म्हणजेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या ऑनलाईन पदव्युत्तर हिंदी अभ्यासक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. या अभ्यासक्रमामुळे मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘पढे इंडिया ऑनलाईन’ उपक्रमाला अधिक बळकटी मिळाली असल्याचे सांगत ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या इग्नूच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.  हिंदी भाषेला केवळ भारतातच नव्हे, तर मौरीशस, फिजी, सुरीनाम अशा देशांमध्येही महत्वाचे स्थान आहे, असे पोखरियाल यावेळी म्हणाले.

राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी, स्वयं, स्वयंप्रभा, दीक्षा अशा अनेक ऑनलाईन डिजिटल माध्यमातून आज लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, आणि इग्नूचा हा अभ्यासक्रम त्याच दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल आहे, असेही ते म्हणाले.  दूरस्थ भागातल्या विद्यार्थ्यांना माफक दरात शिक्षण मिळावे, यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे पोखरीयाल यांनी सांगितले.

यावेळी, इग्नूचे कुलगुरु प्रा नागेश्वर राव यांनी संस्थेमधल्या इतर ऑनलाईन अभ्यासक्रमांची माहिती दिली. तसेच उच्चशिक्षण क्षेत्रात ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी इग्नू करत असलेल्या प्रयत्नांबद्दलही सांगितले. एमए हिंदीचा ऑनलाईन अभ्यासक्रम मंत्र्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि प्रोत्साहनामुळेच सुरु झाला, असे प्र-कुलगुरू प्रा सत्यकाम यावेळी म्हणाले. आपले शिक्षणमंत्री हिंदी  भाषा आणि साहित्यातील विद्वान आहेत, याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

एम ए हिंदी शिवाय, विद्यापीठाने एम ए गांधी विचार आणि शांतता अभ्यास, बी ए-पर्यटन, अरेबिक भाषेतील प्रमाणपत्र अभ्यासक्रम, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम, लायब्ररी आणि माहिती विज्ञान क्षेत्रातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम असे विविध ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु केले आहेत.

हे सगळे अभ्यासक्रम इग्नूच्या www.iop.ignouonline.ac.in.पोर्टलवर उपलब्ध असतील.

 

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1625722) Visitor Counter : 207