संरक्षण मंत्रालय

देशातील संपूर्ण बंदी काळादरम्यान चिकाटीने काम करून अटल बोगद्याचे बांधकाम येत्या सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा सीमा रस्ते संघटनेचा निर्धार

Posted On: 05 MAY 2020 4:12PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 मे 2020

 

हिमाचल प्रदेशातील पीर पांजाल पर्वतराजींमध्ये बांधण्यात येत असलेल्या अटल बोगदयाचे बांधकाम अत्यंत महत्वाच्या टप्प्यात असून हा बोगदा पूर्ण करण्यासाठी सीमा रस्ते संघटनेने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

रस्त्याच्या पृष्ठभागावरचे काम, प्रकाश व्यवस्थेसह इतर विद्युत तसेच यांत्रिक उपकरणे बसविणे, वायू वीजन तसेच स्वयंचलित वाहतूक नियंत्रण व्यवस्था यांची कामे प्रगतीपथावर आहेत. बोगदयाच्या उत्तर दिशेकडील टोकाला चंद्रा नदीवर 100 मीटर लांबीचा पोलादाचा पूल बांधण्याचे काम सुरु आहे. कोविड – 19 महामारीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे दहा दिवसांसाठी हे काम थांबविण्यात आले होते.

सीमा रस्ते संघटनेचे व्यवस्थापकीय संचालक ले.जन. हरपाल सिंग यांनी या समस्येबाबत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार, हिमाचल प्रदेश राज्य सरकारशी समन्वय साधून 5 एप्रिल रोजी बांधकामाच्या ठिकाणी कामगारांना काम सुरु करण्याचे आदेश देण्यात आले. हे काम करणाऱ्या कामगारांच्या बाबतीत कोविड – 10 संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने जारी केलेल्या सर्व आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना केल्या जात आहेत. पूर्व नियोजित वेळेनुसार येत्या सप्टेंबरपर्यंत अटल बोगदयाचे काम पूर्ण करण्यासाठी आता व्यवस्थापनाने कंबर कसली आहे.

हिमाचल प्रदेश राज्यात रोहतांग पास भागात नोव्हेंबर ते मे या कालावधीत जोरदार बर्फवृष्टी होत असल्यामुळे मनाली-सरचू-लेह मार्ग सहा महिन्यांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येतो. नव्याने तयार होत असलेल्या अटल बोगदयामुळे मनाली ते लाहौल खोरे या मार्गावर वर्षभर  वाहतूक सुरु राहू शकेल तसेच या बोगद्यामुळे मनाली-रोहतांग पास-सरचू-लेह मार्गाचे अंतर आधीपेक्षा 46 किलोमीटरने कमी होईल. या बोगद्यामुळे लाहौल परिसरातील नागरिक वर्षभर उर्वरित देशाशी जोडलेले राहतील तसेच अनेक महत्त्वाच्या प्रसंगी संरक्षण दलांच्या जलद मार्गक्रमणाची उत्तम सोय होईल.

 

M.Jaitly/S.Chitnis/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1622071) Visitor Counter : 202