आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून गुजरात आणि महाराष्ट्रातील कोविड-19 व्यवस्थापनासाठी केलेल्या उपाययोजनांचा आणि सज्जतेचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा


राज्यांना सर्व प्रकारच्या पाठबळाचे आश्वासन

“कोविड-19 वर वेळेत उपचार करण्यासाठी आणि होणाऱ्या मृत्यूदरात कपात करण्यासाठी आपण योग्य वेळी देखरेख आणि संपर्कांचा मार्ग काढण्यावर भर देऊया”

Posted On: 06 MAY 2020 9:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6  मे 2020

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे आणि गुजरातचे आरोग्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नीतीनभाई पटेल यांच्याशी आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे आणि केंद्र आणि राज्य स्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दोन्ही राज्यांमधील परिस्थितीचा, कोविड-19च्या व्यवस्थापनासाठीच्या सज्जतेचा आणि केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी, उच्च स्तरीय बैठक घेतली. कोविड-19 च्या रुग्णांची दोन्ही राज्यातील स्थिती आणि व्यवस्थापन या संदर्भात एक संक्षिप्त सादरीकरण झाल्यावर त्यांनी या राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये असलेल्या उच्च मृत्यूदराबाबत चिंता व्यक्त केली. राज्यांनी उच्च मृत्यूदर कमी करण्यासाठी देखरेख अधिक प्रभावी करण्यावर, संपर्काचा काढण्यावर आणि वेळेवर रोगनिदान करण्यावर  भर देण्याची गरज आहे, असे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.

सारी अर्थात सिव्हिअर ऍक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम / इली अर्थात इन्फ्लुएंझा लाईक इलनेस रुग्णांसंदर्भात वेळीच दखल घेणे, तपासणी करणे आणि चाचण्या करून हा संसर्ग इतर भागात पसरणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. मृत्यूदरात घट करण्यासाठी राज्यांनी प्रभावी प्रतिबंधात्मक धोरणाची अंमलबजावणी करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

रुग्णांच्या संख्येत नव्याने भर पडू नये यासाठी प्रतिबंधात्मक, सर्वसमावेशक आणि पूर्वतयारीनिशी नियोजनबद्ध पद्धतीने आणि केंद्राने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे, काही प्रकरणांमध्ये रुग्णांनी त्यांच्या संसर्गाची माहिती लपवल्याचे किंवा रुग्णालयांना उशिरा भेट दिली असल्याचे आढळले असल्याने कोविड-19 या आजाराविषयी लोकांमध्ये एक प्रकारची भीती किंवा हा आजार म्हणजे लांछन असल्याची भावना असल्याचे हे निदर्शक आहे. त्यामुळे राज्यांनी लोकांमध्ये या आजाराविषयी असलेली भीती घालवण्यासाठी किंवा लांछनाच्या भावनेतून केला जाणारा सामुदायिक भेदभाव आणि बहिष्काराचे प्रकार थांबवण्यासाठी बीसीसी अर्थात वर्तनातील बदलासाठी संवादावर प्रभावी पद्धतीने भर देण्याचे आवाहन डॉ. हर्षवर्धन यांनी केले. यामुळे लोक या आजाराचे वेळेवर निदान करून घेण्यासाठी आणि उपचार घेण्यासाठी पुढे येतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये देखरेख ठेवणाऱ्या पथकांबरोबरच या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक असलेल्या वारंवार हात धुणे, व्यक्तिगत अंतर राखणे इत्यादी उपाययोजनांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रभाग स्तरावर सामुदायिक स्वयंसेवक देखील तयार करता येतील, अशी सूचना त्यांनी केली.या आजाराविषयी असलेली लांछनाची भावना समाजातून काढून टाकण्यामध्ये देखील हे स्वयंसेवक महत्त्वाची भूमिका बजावू शकतील, असे त्यांनी सांगितले. औरंगाबाद आणि पुणे यांसारख्या काही जिल्ह्यांनी याचा वापर केला आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय राज्यांना पूर्ण पाठबळ देईल आणि राष्ट्रीय आरोग्य मोहीमेच्या माध्यमातून आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी राज्यांना सोबत घेऊन तातडीच्या आणि दीर्घ कालीन उपाययोजनांचा अवलंब करेल, असे हर्षवर्धन म्हणाले. ज्येष्ठ नागरिक आणि मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारखे बिगर सांसर्गिक आजार असलेल्या लोकांची संख्या जास्त असलेले जिल्हे लक्षात घेऊन त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या उपाययोजनांवर भर देण्याच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. 65 वर्षांवरील ज्या नागरिकांना अशा प्रकारचे बिगर सांसर्गिक आजार आहेत त्यांची आयुष्मान भारत आरोग्य आणि वेलनेस सेंटरमध्ये प्राधान्याने तपासणी करून घेण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी राज्यांना केले. केंद्राने यापूर्वीच जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार गर्भवती महिलांसाठी एएनसी, लसीकरण मोहीमा, क्षयरुग्णांचा शोध व उपचार, डायालिसिस रुग्णांना रक्तबदल सुविधा, कर्करोग उपचार इत्यादी उपचार केंद्रांकडे दुर्लक्ष होऊ देता कामा नये, याकडे त्यांनी लक्ष वेधले. विविध आजारांसंदर्भात आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीविषयी राज्यांकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीच्या आधारे जोखीम स्वरुप निश्चित करता येऊ शकेल. केंद्राच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली अतिरिक्त पथके राज्यांच्या विनंतीनुसार तैनात करण्यात येतील, असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.

कोविड- 19 च्या वैद्यकीय व्यवस्थापनासाठी आणि उपचारांबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयाने नॅशनल टेलिकन्सल्टेशन केंद्रांच्या माध्यमातून दिलेल्या पाठबळाचा लाभ राज्यांना घेता येईल, असे हर्षवर्धन यांनी सुचवले. या केंद्रावर उपलब्ध असलेले एम्सचे डॉक्टर/ तज्ञ यांच्याकडून तात्काळ मार्गदर्शन केले जाते. देशातील कोणत्याही ठिकाणाहून (+91 9115444155)  या एका मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल.

राज्यांनी आरोग्य सेतू ऍप आणि 1921 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन आरोग्य सेतू इंटरॅक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टमची(आयव्हीआरएस) प्रसिद्धी करण्याची गरज डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केली. देशभरात ज्यांच्याकडे लँडलाईन किंवा फीचर फोन आहेत त्यांच्यासाठी आयव्हीआरएस सुविधा पुरवली जात आहे, जर एखाद्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णाच्या बाजूने आपण ये- जा करत असू तर त्याची माहिती देण्याची सुविधा आरोग्य सेतू ऍपमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य मंत्र्यांनी जिल्हाधिकारी/ आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांनी केलेल्या, गुजरातमधील सूरतच्या झोपडपट्टी असलेल्या भागांमध्ये कोरोना योद्धा समिती उभारून तिथल्या लोकांना साबणाचे, मास्कचे वाटप करणे, हात धुण्याची यंत्रे बसवणे, फिवर क्लिनिक  सुरू करणे यांसारख्या उपायांची प्रशंसा केली.

कोविड-19 विरोधात लढा देण्यासाठी एका सामूहिक आणि भक्कम प्रयत्नाची गरज असल्याने अशाच प्रकारच्या उपायांचा अवलंब इतर जिल्ह्यांमध्येही करता येईल, असे ते म्हणाले.

या बैठकीला आरोग्य व कुटुंब कल्याण सचिव प्रीती सुदान, आरोग्य व कुटुंब कल्याण ओएसडी राजेश भूषण, विशेष सचिव संजीवा कुमार, वंदना गुरनानी, डीजीएचएस डॉ. राजीव गर्ग, संयुक्त सचिव डॉ. मनोहर अग्नानी, आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल, एनसीडीसीचे संचालक डॉ. एस के सिंग आणि महाराष्ट्र आणि गुजरातचे प्रधान सचिव, महाराष्ट्र आणि गुजरातमधील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी/ जिल्हा दंडाधिकारी/ महानगरपालिका आयुक्त उपस्थित होते.

 

G.Chippalkatti/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1621612) Visitor Counter : 229