विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कोविड-19 रोगाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने सुरु केला आरोग्य आणि कोरोना रोगाच्या धोक्याविषयी सावध करणारा नवा कार्यक्रम


विषाणू संसर्ग रोखणे आणि त्यासाठी आवश्यक व्यवस्थापन करण्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या सर्वात अधिकृत आणि उत्तम उपायांची माहिती जनतेला देणे सर्वात महत्त्वाचे – विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा.आशुतोष शर्मा यांचे प्रतिपादन

Posted On: 30 APR 2020 10:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 एप्रिल 2020

 

एनसीएसटीसी अर्थात राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संपर्क मंडळ आणि केंद्र सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग यांनी सध्याच्या कोविड-19 विषाणू प्रादुर्भावावर लक्ष केंद्रित करून त्याचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी आरोग्य आणि जोखीम याविषयी संवाद प्रस्थापित करणारा यश अर्थात “विज्ञान आणि आरोग्य याविषयी जाणीव जागृती करणारे वर्ष” हा नवा कार्यक्रम सुरु केला आहे.

विज्ञान आणि आरोग्य याविषयीच्या माहितीचा प्रसार करणारा हा सर्वसमावेशक आणि अत्यंत परिणामकारक उपक्रम आहे. आरोग्यविषयक मुद्द्यांवर सुरु असलेल्या चर्चेला प्रतिसाद देणे आणि अत्यंत तळागाळातील आरोग्यविषयक कामांचे कौतुक करण्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावर लोकांच्या जीवांचे संरक्षण करून  त्यांच्यात आरोग्यविषयक जाणीव निर्माण करणे, विषाणू संसर्गापासून आपण आपला बचाव करू शकतो हा विश्वास त्यांच्यात निर्माण करणे, त्यांच्यात शास्त्रीय दृष्टीकोनाची रुजवात करणे आणि स्वतःच्या आरोग्य रक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन देणे हा या नव्या उपक्रमाचा उद्देश आहे.

जागतिक महामारीच्या या संकटकाळात, समाजात अनेक प्रकारच्या चिंता आणि आव्हाने दिसत आहेत. या परिस्थितीशी सामना करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन आणि निरोगी जीवनासाठी आवश्यक तयारीची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. समाजात पसरलेल्या भय आणि संशयाच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर कोविड-19 विषाणूचा नेमका धोका समजून घेण्यासाठी त्याविषयीची अत्यंत अधिकृत शास्त्रीय माहिती सोप्या भाषेत अनुवादित करून सर्व समुदायांना सोप्या पद्धतीने तिचा वापर करता येणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने हा उपक्रम तयार केला असून त्यात नवे शास्त्रीय शोध, आरोग्य आणि जोखीम यांचे व्यवस्थापन करणारे सॉफ्टवेअर, प्रसिद्धीपत्रके,  दृक्श्राव्य माहिती, डिजिटल मंच, लोककलांचे अविष्कार, प्रशिक्षित संवाद तज्ञ विशेषतः स्थानिक भाषेत सोप्या रीतीने शास्त्रीय माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचवू शकणारे संवाद तज्ञ यांच्या माध्यमातून देशातील विविध भागातल्या प्रत्येकापर्यंत कोरोना संसर्ग, त्याचा आरोग्याला असलेला धोका आणि त्याच्या नियंत्रणाचे उपाय तसेच आरोग्य राखण्याविषयीची माहिती पोहोचविली जाणार आहे.

या कार्यक्रमात, विविध शिक्षणतज्ञ, संशोधक, प्रसारमाध्यमे आणि स्वयंसेवी संस्था यांना सहभागी करून घेऊन कोरोनाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी आवश्यक कार्ये आणि या संकटाशी सामना करण्यासाठीची तयारी याविषयी सामान्य जनतेला माहिती देण्यासाठीच्या धोरणांची आखणी केली आहे. कोरोना संसर्गाचा धोका समजून त्यासाठीच्या आपत्ती व्यवस्थापनाविषयी जनजागृतीसाठी अधिकृत शास्त्रीय आणि आरोग्यविषयक माहितीचे भाषांतर आणि वापर करता यावा यासाठीची योजना आखली आहे.

सद्यस्थितीला आपल्याकडे कोविड-19 विषाणू संसर्ग रोखण्यासाठीची  लस तसेच या रोगावरचे नेमके उपचार  उपलब्ध नसल्यामुळे, या आजाराचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी विषाणूच्या प्रसाराची साखळी तोडणे आणि या रोगाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी योग्य व्यवस्थापन करण्याचे उपाय जनतेपर्यंत पोहोचविणे सर्वात महत्त्वाचे आहे असे मत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव प्रा.आशुतोष शर्मा यांनी व्यक्त केले आहे.
 

(For more details, please contact Dr. Manoj Kumar Patairiya, Adviser & Head, NCSTC, mkp[at]nic[dot]in, Mob: 9868114548)

* * *

M.Jaitly/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1619946) Visitor Counter : 261