शिक्षण मंत्रालय

आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी अल्प खर्चात यांत्रिक व्हेंटीलेटर ‘रुहदार’ केले विकसित

पुलवामा इथल्या IUST च्या ‘डिझाईन इनोव्हेशन केंद्रात’  या व्हेंटीलेटरचे डिझाईन विकसित

Posted On: 26 APR 2020 2:05PM by PIB Mumbai

 

मुंबई/पुलवामा, 26 एप्रिल 2020

 

कोविड-19 च्या प्रसाराची गती सांगणारी वक्ररेषा आता सरळ व्हायला सुरुवात झाली असून या संसर्गाचा उद्रेक नियंत्रणात येत आहे, असे सरकारने म्हंटले आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, ज्यांना या आजाराचा संसर्ग झाला आहे, त्यापैकी 80 टक्के रुग्णांमध्ये अत्यंत सौम्य लक्षणे आहेत तर 15 टक्के रुग्णांना ऑक्सिजन ची गरज असते. तर उरलेल्या पाच टक्के रुग्णांसाठी व्हेंटीलेटरची सुविधा आवश्यक आहे. त्यामुळेच, कोविड-19 च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्हेंटीलेटर हे महत्वाचे वैद्यकीय उपकरण आहे, गंभीर रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

हे लक्षात घेऊन, सरकार दोन बाजूंनी त्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे देशांतर्गत निर्मिती क्षमता वाढणे आणि जगातून त्याची आयात करण्याचा प्रयत्न करत आहे. मंत्रिगटाच्या 25 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या माहितीनुसार, देशात व्हेंटीलेटर्सचे उत्पादन सुरु झाले असून नऊ कंपन्यांना 59,000 पेक्षा जास्त व्हेंटीलेटर्स तयार करण्याची ऑर्डर देण्यात आली आहे.

याच अनुषंगाने, या संकटकाळात भारतीय संशोधक आणि शास्त्रज्ञ यांनी अनेक अभिनव पध्दतीने कोविडचा मुकाबला करण्यासाठी संशोधन सुरु केले आहे. CSIR आणि तिच्या 30पेक्षा जास्त प्रयोगशाळा, आयआयटी सारख्या संस्था, आणि खाजगी क्षेत्र मिळून या समस्यांवर उपाय शोधण्याचे काम करत आहेत.

आयआयटी मुंबई, एनआयटी श्रीनगर आणि जम्मू-कश्मीरच्या पुलवामा येथील इस्लामिक युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी यांच्या चमूनी मिळून व्हेंटीलेटर्सचा प्रश्न सोडवण्यासाठी अभिनव संशोधन केले आहे. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करत त्यांनी कमी खर्चात व्हेंटीलेटर्स विकसित केले आहेत.

या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या व्हेंटीलेटर ला ‘रूहदार’ असे नाव दिले आहे. या प्रकल्पाचे प्रमुख झुल्कारनैन, इंडस्ट्रीयल डिजाईन सेंटर, आयआयटी मुंबईच्या पहिल्या वर्षीचे विद्यार्थी, कश्मीरमधल्या आपल्या घरी गेले होते, त्याचवेळी लॉकडाऊन मुळे त्यांची संस्था बंद करण्यात आली. जेव्हा या आजाराचा प्रादुर्भाव वाढू लागला तेव्हा त्यांना लक्षात आले की काश्मीरमध्ये केवळ 97 व्हेंटीलेटर्स आहेत, त्यामुळे रुग्णसंख्या वाढल्यास व्हेंटीलेटरचा तुटवडा भासू शकतो.

त्यामुळे झुल्कारनैन यांनी IUST मधल्या आपल्या सहकाऱ्यांसोबत आणि NIT श्रीनगरच्या सहकाऱ्यांशी संपर्क साधला. IUST च्या डिजाईन इनोव्हेशन सेंटरची मदत घेऊन त्यांनी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करत कमी खर्चात व्हेंटीलेटर्स बनवले. आधी त्यांचा विचार सध्या असलेल्या व्हेंटीलेटर्ससारखेच डिजाईन बनवण्याचा होता, मात्र, त्यावर काम करता करता त्यांनी स्वतःचे वेगळे डिझाईन विकसित केले.

या व्हेंटीलेटर साठी त्याना सुमारे 10,000 रुपये खर्च येतो, आणि जर अधिक प्रमाणात उत्पादन केले तर हा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोठ्या रुग्णालयात उत्तम प्रतीच्या व्हेंटीलेटर्ससाठी लाखो रुपये खर्च येतो, मात्र “रूहदार’ व्हेंटीलेटर्स कोविड-19 च्या रूग्णांना आवश्यक त्या सर्व सुविधा देऊ शकते, यामुळे त्या रूग्णाचा जीव वाचवता येऊ शकतोअसे झुल्कारनैन यांनी सांगितले.

या व्हेंटीलेटर्सची वैद्यकीय चाचणी झाल्यावर, त्याला मान्यता मिळाली की त्याचे व्यापक स्तरावर उत्पादन सुरु करता येईल, असे झुल्कारनैन यांनी सांगितले. आम्ही या डिजाईनसाठी रॉयल्टी घेणार नाही, असेही ते म्हणाले.

IUST च्या डिजाईन इनोव्हेशन सेंटरचे समन्वयक डॉ शकार अहमद नाह्वी यांनी सांगितले की सध्याच्या संकटकाळात समाजाला मदत करण्यासाठी या चमूने झपाटून काम केले. इंजिनीयारिंगच्या निकषावर हे व्हेंटीलेटर उत्तम काम करत आहेत, मात्र त्यांना वैद्यकीय क्षेत्राकडून मान्याता मिळणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

IUST च्या मॅकेनिकल इंजिनीयारिंग विभागाचे प्राध्यापक डॉ माजीद कौल यांनी सांगितले की डिजाईन इनोव्हेशन सेंटर मध्ये उपलब्ध असलेल्या साधनातूनच हे अल्पखर्चिक व्हेंटीलेटर्स विकसित करण्यात आले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत डिजाईन इनोव्हेशन सेंटर सुरु करण्यात आले आहे.

 

***

PIB Mumbai (DJM – based on inputs from IIT Bombay)

 

S.Tupe/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1618415) Visitor Counter : 94