पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन "मन की बात 2.0"(11वा भाग) द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (26 एप्रिल 2020)

Posted On: 26 APR 2020 3:02AM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 26 एप्रिल 2020

 

माझ्या प्रिय देशवासियांनो,

नमस्कार. आपण सर्व या लॉकडाऊनमध्ये ही ‘मन की बात’ ऐकत आहात. या ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी येणाऱ्या आपल्या सूचना, फोन कॉल्सची संख्या, सामान्यतः कितीतरी पटींनी जास्त आहे. आपल्या मनातील अनेक विषय, आपल्या मनातील गोष्टी माझ्यापर्यंत पोहचल्या आहेत. मी असा प्रयत्न केला आहे की, यातल्या जास्तीत जास्त वाचू शकेन, ऐकू शकेन. आपल्या चर्चेतून अशा अनेक पैलुंची माहिती मिळाली आहे की ज्यांच्याकडे या धकाधकीमध्ये लक्षच जात नाही. मला वाटतं की युद्धाच्या या परिस्थितीत या ‘मन की बात’ कार्यक्रमात त्या काही पैलूंची माहिती देशवासियांना दिली पाहिजे.

मित्रांनो, भारताची कोरोनाच्या विरोधातील लढाई ही खऱ्या  अर्थाने लोकांच्या नेतृत्वानेच लढली जात आहे. भारतात कोरोनाच्या विरोधातील लढाई जनता लढत आहे, आपण लढत आहात, जनते बरोबरीने एकत्रितपणे शासन, प्रशासन लढत आहे. विकासासाठी प्रयत्नशील असलेला भारतासारखा विशाल देश, गरिबीशी निर्णायक लढा देत आहे. त्याच्याकडे, कोरोनाशी लढण्यासाठी आणि जिंकण्याचा हाच एक मार्ग आहे.  आपण भाग्यवान आहोत की, आज संपूर्ण देश, देशाचा प्रत्येक नागरिक, जन जन, या लढाईचा सैनिक आहे, लढाईचं नेतृत्व करत आहे. आपण कुठेही पाहिलंत तर, आपल्याला याची जाणीव होईल की, भारताची लढाई लोकांनी चालवलेली आहे. जेव्हा पूर्ण विश्व या महामारीच्या संकटाशी मुकाबला करत आहे. भविष्यात जेव्हा याची चर्चा होईल, त्याच्या कार्यपद्धतीविषयी चर्चा होईल, तेव्हा भारताच्या या लोकांनी चालवलेल्या लढाईची चर्चा होणारच, असा मला विश्वास आहे. पूर्ण देशात, गल्ली आणि मोहल्ल्यांमध्ये, जागोजागी, आज लोक एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. गरिबांसाठी जेवणापासून, रेशनची व्यवस्था असेल, लॉकडाऊनचे पालन असेल, रूग्णालयांमध्ये व्यवस्था असेल, वैद्यकीय उपकरणांचं देशातच उत्पादन असेल, आज संपूर्ण देश, एक लक्ष्य, एक दिशा, घेऊन एकत्र वाटचाल करत आहे. टाळ्या, थाळ्या, दिवे, मेणबत्त्या, या साऱ्या वस्तुंनी ज्या भावनांना जन्म दिला, ज्या उत्कटतेनं देशवासियांनी, काही न काही करण्याचा निर्धार केला, प्रत्येकाला या गोष्टींनी प्रेरित केलं आहे. शहर असो की गाव, असं वाटतंय की, जसं देशात एक महायज्ञ सुरू झाल आहे, ज्यात, प्रत्येक जण आपलं योगदान देण्यासाठी आतूर झाला आहे. आपल्या शेतकरी बंधु-भगिनींकडेच पहा-एकीकडे ते या महामारीच्या संकटातच आपापल्या शेतांमध्ये दिवसरात्र मेहनत करत आहेत आणि देशात कुणी उपाशीपोटी झोपू नये, याचीही काळजी करत आहेत. प्रत्येक जण, आपापल्या शक्तिप्रमाणे, ही लढाई लढत आहे. कुणी भाडं माफ करत आहे, तर कुणी आपल्या संपूर्ण निवृत्तीवेतनाची मिळालेली रक्कम पीएम केअर्समध्ये जमा करत आहे. कुणी शेतातला संपूर्ण भाजीपाला दान देत आहे तर कुणी, दररोज शेकड़ो गरिबांना विनामूल्य जेवण पुरवत आहे. कुणी मास्क तयार करत आहे तर कुठं आमचे कामगार बंधु-भगिनी क्वारंटाईनमध्ये रहात असतानाच, ज्या शाळेत रहात आहेत, त्या शाळेची रंगरंगोटी करत आहेत.

मित्रांनो, दुसऱ्याला मदत करण्यासाठी, आपल्या मनात, ह्रदयाच्या एखाद्या कोपऱ्या, ही जी उचंबळून येणारी भावना आहे नं तीच भावना कोरोनाच्या विरूद्ध भारताच्या या लढ्याला ताकद देत आहे. तीच भावना, या लढाईला खऱ्या अर्थाने लोकांनी चालवलेली लढाई बनवत आहे. आम्ही असंही पाहिलं आहे की, गेल्या काही वर्षांत, आमच्या देशात ही जी एक मानसिकता बनली आहे आणि ती निरंतर मजबूत बनत चालली आहे. कोट्यवधी लोकांनी अनुदानित गॅस सिलिंडर सोडून देण्याचा विषय असो, लाखो ज्येष्ठ नागरिकांकडून रेल्वे प्रवासातील सवलत सोडून देण्याचा मुद्दा असो, स्वच्छ भारत अभियानाचं नेतृत्व स्विकारण्याचा विषय असो की शौचालय बनवण्याचा विषय असो, अशा अगणित गोष्टी आहेत. या सर्व गोष्टींवरून एकच समजतं- आपल्या सर्वांना- एक मन, एका मजबूत धाग्यानं गुंफलं आहे. एक होऊन देशासाठी काही तरी करण्याची प्रेरणा दिली आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, मी आज पूर्ण नम्र होऊन, अत्यंत आदरानं, 130 कोटी देशवासियांच्या या भावनेला, नतमस्तक होऊ वंदन करतो. आपल्या भावनांना अनुरूप, देशासाठी आपल्या आवडीनुसार, आपल्या वेळेप्रमाणे, आपल्याला, काही तरी करणं शक्य होईल, यासाठी सरकारनं एक डिजिटल मंचही तयार केला आहे. हा मंच आहे कोविड्स वॉरिअर्स  डॉट गव्ह डॉट इन! मी पुन्हा एकदा सांगतो की,कोविड्स वॉरिअर्स डॉट गव्ह डॉट इन.. सरकारनं या मंचाच्या माध्यमातुन तमाम सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक, नागरी समाजाचे प्रतिनिधी, आणि स्थानिक प्रशासनाला एकमेकांशी जोडलं आहे. अगदी कमी कालावधीत, या पोर्टलशी सव्वाकोटी लोक जोडले गेले आहेत. यात डॉक्टर्स, परिचारिकांपासून ते आपल्या आशा कार्यकर्त्या, आपल्या एनसीसी, एनएसएसचे साथी, वेगवेगळ्या क्षेत्रांतले सर्व व्यावसायिक, त्यांनी, या मंचाला, आपला मंच बनवून टाकला आहे. हे लोक स्थानिक स्तरावर संकट व्यवस्थापन योजना बनवणाऱ्याना तसंच त्यांची पूर्तता करण्यात खूप मदत करत आहेत. आपणही कोविड्स वॉरिअर्स डॉट गव्ह डॉट इन शी जोडून, देशाची सेवा करू शकता, कोविड योद्धा बनू शकता.

मित्रांनो, प्रत्येक बिकट परिस्थिती, प्रत्येक लढाई, काही न काही धडा शिकवत असते, काही न काही शिकवून जाते, शिकवण देते. काही शक्यतांचा मार्ग तयार करते आणि काही नव्या लक्ष्यांची दिशाही दाखवत असते. या परिस्थितीत आपण सर्व देशवासियांनी जी संकल्प शक्ति दाखवली आहे, त्यानं, भारतात एका परिवर्तनाची सुरूवात झाली आहे. आपले व्यवसाय, आपले कार्यालये, आपले वैद्यकीय क्षेत्र, प्रत्येकजण, वेगानं, नव्या तांत्रिक बदलांना आत्मसात करीत आहे.. तंत्रज्ञानाच्या आघाडीवर तर असं वाटतंय की, देशातला प्रत्येक नाविन्यपूर्ण संशोधक नव्या परिस्थितीनुसार काही न काही निर्माण करत आहे.

मित्रांनो, देश जेव्हा एक टीम होऊन काम करतो, तेव्हा काय काय होऊ शकत याचा आम्ही अनुभव घेत आहोत. आज केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्यांचा प्रत्येक विभाग आणि संस्था बचावकार्यासाठी एकत्र येऊन पूर्ण वेगानं काम करत आहेत. आपल्या नागरी उड्डाण विभागात काम करणारे लोक असतील, रेल्वे कर्मचारी असतील, हे दिवसरात्र मेहनत करत आहेत, ज्यामुळे देशवासियांना कमीत कमी अडचणींचा सामना करावा लागेल. आपल्यातील बहुतेकांना हे ठाऊक असेल की, देशातल्या प्रत्येक भागात औषधे पोहचवण्यासाठी ‘लाईफलाईन उडाण’ नावाची एक विशेष मोहिम राबवली जात आहे. आपल्या या साथीदारांनी, इतक्या कमी कालावधीत, देशातल्या देशातच, तीन लाख किलोमीटर अंतराचं हवाई उड्डाण केलं आहे आणि 500 टनापेक्षाही जास्त वैद्यकीय साहित्य, देशाच्या प्रत्येक कानाकोपर्यात आपल्यापर्यंत पोहचवलं आहे. याच प्रकारे, रेल्वेचे साथी, लॉकडाऊनमध्येही निरंतर मेहनत करत आहेत, ज्यामुळे देशातल्या सामान्यजनांना, अत्यावश्यक वस्तुंची कमतरता भासणार नाही. या कामासाठी भारतीय रेल्वेनं जवळजवळ 60 पेक्षा जास्त रेल्वेमार्गांवर 100 हून जास्त पार्सल ट्रेन्स सुरू केल्या आहेत. याच प्रकारे, औषधांचा पुरवठा करण्यात, आपल्या टपाल खात्याचे लोक, अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत. आपले हे सर्व साथीदार, ऱ्या अर्थानं, कोरोनाचे योद्धेच तर आहेत.

मित्रांनो, प्रधानमंत्री गरिब कल्याण योजनेंतर्गत, गरिबांच्या खात्यांमध्ये, पैसे थेट जमा केले जात आहेत. वृद्धावस्था पेन्शन जारी केली गेली आहे. गरिबांना तीन महिने विनामूल्य गॅस सिलिंडर, रेशनसारख्या सुविधा प्रदान केल्या जात आहेत. या सर्व कामांमध्ये, सरकारच्या वेगवेगळ्या विभागांचे लोक, बँकिंग क्षेत्रातले लोक, एका टीमप्रमाणे दिवसरात्र काम करत आहेत. आणि मी, आपल्या  देशातल्या राज्य सरकारांचीही प्रशंसा करतो की, ते या महामारीचा सामना करण्यात अत्यंत सक्रिय भूमिका बजावत आहेत. स्थानिक प्रशासन, राज्य सरकारं ज्या जबाबदारीचं पालन करत आहेत, त्यांची, कोरोनाच्याविरोधातल्या लढ्यात खूप मोठी भूमिका आहे. त्यांचे हे परिश्रम अत्यंत प्रशंसनीय आहेत.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो,

देशभरातल्या आरोग्य सेवेशी संबंधित लोकांनीअगदी अलिकडेच जो अध्यादेश आणला आहे, त्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. या अध्यादेशात, कोरोना योद्ध्यांबरोबर जे हिंसा, छळ किंवा कोणत्याही प्रकारे त्यांना दुखापत करण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्याविरोधात अत्यंत कडक शिक्षेची तरतूद केली आहे. आपले डॉक्टर, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी, समूह आरोग्य सेवक आणि असे सर्व लोक, जे देशाला कोरोना मुक्त करण्याच्या कामात दिवसरात्र गुंतले आहेत, त्यांचं संरक्षण करण्यासाठी हे पाऊल अत्यंत आवश्यक होतं.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो,

महामारीच्या विरोधातल्या या लढाईच्या दरम्यान, आपल्याला आयुष्य, समाज, आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांकडे एक नव्या ताज्या दृष्टिनं पहाण्याची संधीही मिळाली आहे, याचा आम्ही सर्वच अनुभव घेत आहोत. समाजाच्या दृष्टिकोनातही एक व्यापक परिवर्तन आलं आहे. आज आपल्या आयुष्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तिच्या महत्वाची आपल्याला जाणीव होत आहे. आपल्या घरात काम करणारे लोक असतील, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी काम करणारे सामान्य कामगार असतील, शेजारच्या दुकानांमध्ये काम करणारे लोक असतील, या सर्वांची किती मोठी भूमिका आहे, याचा आपल्याला अनुभव येत आहे. याचप्रकारे, अत्यावश्यक सेवाचं वितरण करणारे लोक, बाजारांमध्ये काम करणारे आमचे मजूर बंधु-भगिनी, आपल्या आसपासचे ऑटो चालक, रिक्षा चालक  या सर्वांच्या शिवाय आमल आयुष्य किती अवघड होऊ शकतं, याचा आम्ही अनुभव घेत आहोत.

आजकाल सोशल मिडियामध्ये आम्ही सातत्यानं पहात आहोत कीलॉकडाऊनच्या काळात, लोक आपल्या या सर्व साथीदारांची केवळ आठवणच करत नाहीत तर त्यांच्या आवश्यकतांकडे लक्ष देत आहेत. उलट त्यांच्या बाबतीत आदरानं लिहितही आहेत. आज, देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून लोक स्वच्छता कामगारांवर पुष्पवर्षाव करत असल्याची छायाचित्रं येत आहेत. याअगोदर, कदाचित आपण त्यांच्या कामाची दखलही घेत नव्हतो. डॉक्टर असो, स्वच्छता कामगार असो, इतर सेवा बजावणारे लोक असोत- इतकंच नाही, आपल्या पोलिस व्यवस्थेबद्दलही सामान्य लोकांच्या मानसिकतेत मोठं परिवर्तन  घडलं आहे. याअगोदर, पोलिसांच्या बाबतीत, विचार करताना नकारात्मकतेशिवाय आम्हाला काही दिसतच नव्हतं. आमचे पोलिस आज गरिब, गरजवंतांना जेवण देत आहेत, औषधं पोहचवत आहेत. ज्या प्रकारे प्रत्येक बाबतीत मदत करण्यासाठी पोलिस पुढं येत आहेतत्यामुळे पोलिसांची मानवीय आणि संवेदनशील बाजू आपल्या समोर आली आहे, तिनं आपल्या मनाला हलवून सोडलं आहे, आपल्या ह्रदयाला स्पर्श करून गेली आहे. एक असा काळ आहे की ज्यात सामान्य जन आणि पोलिस भावनात्मकरित्या एकमेकांशी जोडले जात आहेत. आपल्या पोलिसांनी, याला जनतेच्या सेवेसाठी मिळालेली संधी म्हणून मानलं आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे कीया घटनांमुळे, येणार्या काळात, खर्या अर्थानं, खूपच सकारात्मक बदल होऊ शकतो. आपल्याला सर्वांनाच या सकारात्मकतेला कधीही नकारात्मकतेच्या रंगात रंगवायचं नाहीये.

मित्रांनो, आपण नेहमीच ऐकत आलो की प्रकृती, विकृती आणि संस्कृती, या शब्दांना एकत्रित अभ्यासाव आणि यामागे असलेल्या भावाकडे पाहिलं तर आपल्याला जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी एक नवीन दार उघडतांना दिसेल. जर, मानवी प्रकृतीची चर्चा करायची तर हे माझं आहे, मी याचा उपयोग करतो, याला आणि या भावनेला अत्यंत स्वाभाविक मानलं जातं. कुणाला यात काही गैर वाटत नाही. याला आम्ही प्रकृती म्हणू शकतो. पण जे माझं नाहीये, ज्यावर माझा हक्क नाहीये, आणि ते मी दुसऱ्याकडून हिसकावून घेऊन त्याचा उपयोग करतो, तेव्हा त्याला आम्ही विकृती म्हणू शकतो. या दोन्हीच्या पलीकडे जाऊन, प्रकृती आणि विकृतीपेक्षाही, जेव्हा एखादं संस्कारित मन विचार करतं किंवा व्यवहार करत असतं तेव्हा त्यात आपल्याला संस्कृती दिसते. जेव्हा कुणी आपल्या हक्काची वस्तु, आपल्या मेहनतीनं कमावलेली वस्तु, आपल्यासाठी आवश्यक असलेली वस्तु, कमी किंवा जास्त, याची पर्वा न करता, दुसऱ्या एखाद्या व्यक्तिची गरज पाहून, स्वतःची चिंता सोडून, आपला वाटा दुसऱ्याला देऊन त्याची गरज भागवतो, तीच तर संस्कृती आहे. मित्रांनो, जेव्हा कसोटीचा काळ असतो, तेव्हाच या गुणांची परिक्षा केली जाते.

 आपण गेल्या काही दिवसांत पाहिलं असेल की, भारतानं आपल्या संस्कारांच्या अनुरूप, आपल्या विचारांच्या अनुसार, आपल्या संस्कृतीच्या अनुसार काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. संकटाच्या या घडीला, जगासाठीही, समृद्ध देशांसाठीही, औषधांचं संकट खूप जास्त गंभीर राहिलं आहे. हा एक असा काळ आहे की, भारतानं जगाला औषधं पुरवली नसती तरीही कुणीही भारताला दोष दिला नसता. प्रत्येक देशाचे प्रथम प्राधान्य आपल्या नागरिकांचा जीव वाचवणं हे समजून आहे. परंतु मित्रांनो, भारतानं प्रकृती आणि विकृतीपेक्षा वेगळा असा निर्णय घेतला. भारतानं आपल्या संस्कृतीच्या अनुरूप निर्णय घेतला. आम्ही भारताच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी जे करायचं आहे, त्याचे प्रयत्न तर वाढवले आहेतच, परंतु जगभरातनं येत असलेल्या मानवतेच्या रक्षणाच्या हाकेकडेही पूर्णपणे लक्ष दिलं. आम्ही जगातल्या सर्व गरजूंपर्यंत औषधं पोहचवण्याचा विडा उचलला आणि मानवतेचं हे काम करून दाखवलं. आज जेव्हा माझी अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवर चर्चा होते, तेव्हा ते भारताच्या जनतेचे आभार जरूर मानतात. जेव्हा ते लोक म्हणतात थँक यू इंडिया, थँक यू पिपल ऑफ इंडिया, तेव्हा देशाबद्दल अभिमान आणखी वाढतो. अशा प्रकारे भारताच्या आणि योगाच्या महत्वाकडेही लोक मोठ्या विशेष वृत्तीनं पहात आहेत. सोशल मिडियावर पहा, सर्वत्र प्रतिकारशक्ति वाढवण्यासाठी, कशा प्रकारे भारताच्या  आयुर्वेद आणि योगाची चर्चा होत आहे. कोरोनाच्या दृष्टिकोनातनं, आयुष मंत्रालयानं प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जो प्रोटोकॉल  दिला आहे, आपण त्याचं पालन अवश्य़ करत असाल, असा मला विश्वास आहे. गरम पाणी, काढा आणि जे अन्य दिशानिर्देश, आयुष मंत्रालयानं जारी केले आहेत, त्यांचा आपण आपल्या दिनचर्येत समावेश केला तर आपल्याला खूप फायदा होईल.

मित्रांनो, हे खरंतर दुर्भाग्यच आहे की अनेकदा आम्ही आमच्या क्ती आणि समृद्ध परंपरा यांना ओळखायलाच नकार देतो. परंतु, जेव्हा जगातला दुसरा एखादा देश, पुराव्यावर आधारित संशोधनानुसार तीच गोष्ट सांगतो. आमचंच सूत्र आम्हाला शिकवतो तेव्हा आम्ही त्याचा चटकन स्विकार करतो. शक्य आहे की, यामागे एक खूप मोठं कारण असू शकतं. शेकडो वर्षांचा आमचा गुलामीचा कालखंड राहिला आहे.या कारणानं कधी कधी, आपल्याला, आपल्याच शक्तिवर विश्वास उरत नाही. आपला आत्मविश्वास कमी वाटू लागतो. यामुळे, आपल्या देशाच्या चांगल्या गोष्टींना, पारंपरिक सिद्धांतांना, पुराव्यावर आधारित पुढे नेण्याऐवजी सोडून देतो, त्यांना हीन समजू लागतो. भारताच्या युवा पिढीला, आता या आव्हानाचा स्विकार करावा लागेल. जसं की, जगानं योगाचा आनंदानं स्विकार केला आहे, तसंच, हजारो वर्षे जुन्या आयुर्वेदाच्या सिद्धांतांचाही जग अवश्य स्विकार करणार आहे. हा, यासाठी युवा पिढीला संकल्प करावा लागेल आणि जग जी भाषा समजतं त्याच वैज्ञानिक भाषेत समजावून सांगावं लागेल, काही तरी करून दाखवावं लागेल.

मित्रांनो, तसंतर कोविड 19 मुळे अनेक सकारात्मक बदल, कामाच्या पद्धती, जीवनशैली आणि सवयींमध्येही स्वाभाविक रूपानं आपलं स्थान बनवत आहेत. आपल्या सर्वांनाही याची जाणीव झाली असेल की या संकटात, कसं वेगवेगळ्या विषयांवर, आकलन आणि चेतनाशक्तिला जागृत केलं आहे. जो बदल, आपल्याला आमच्या आसपास पहायला मिळतो आहे, त्यात सर्वात पहिला आहे तो मास्क चढवून आपला चेहरा झाकलेला ठेवणं. कोरोनाच्या कारणानं, बदलत्या परिस्थितीत, मास्कही आपल्या जीवनाचा भाग बनले आहेत.

तसंतर आम्हाला  आपल्या आसपासचे सारे लोक मास्क चढवून पहायची कधीही सवय नव्हती, परंतु आता हेच होत आहे. हां, आता जे मास्क चढवतात, ते सारेच लोक आजारी आहेत, असा याचा अर्थ नाही, आणि जेव्हा मी, मास्कबद्दल बोलतो, तेव्हा मला जुनी गोष्ट आठवते. आपल्याला सर्वाना आठवण असेल. एक काळ होता जेव्हा आपल्या देशात असे अनेक भाग होते, जिथं कुणी नागरिक फळं विकत घेताना दिसला तर आसपासचे शेजारी लोक विचारायचे, घरात कुणी आजारी आहे का? म्हणजे, फळं  खाणं हि भ्रामक कल्पना होती - म्हणजे फळं आजारातच खायची  असतात, ही एक समजूतच बनून गेली होती. परंतु, काळ बदलला आणि ही धारणाही बदलली. तसंच मास्कबद्दलचीही धारणा बदलणार आहे. आपण पहाल, मास्क, आता सभ्य समाजाचं प्रतिक होईल. जर, आजारापासून स्वतःला वाचवायचं असेल, आणि दुसऱ्यानाही वाचवायचं असेल, तर आपल्याला मास्क लावावाच लागेल, आणि माझी तर साधी सूचना अशी आहे की, उपरणं वापरा, पूर्ण चेहरा झाकला पाहिजे.

मित्रांनो, आपल्या समाजात आणखी एक मोठी जागरूकता आली आहे की आता लोक सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यानं कशा प्रकारचे काय नुकसान होऊ शकतं, हे समजू लागले आहेत. इथंतिथं, कुठंही थुंकायचं, हा चुकीच्या सवयींचा भाग बनला होता. स्वच्छता आणि आरोग्याला तो एक मोठं आव्हानही देत होता. तसं एक प्रकारानं पाहिलं तर आपल्याला या समस्येची नेहमीच जाणीव होती, परंतु, ही समस्या नष्ट होण्याचं नावच घेत नव्हती. आता ती वेळ आली आहे की, या वाईट सवयीला कायमचं संपवलं पाहिजे. ‘बेटर लेट दॅन नेव्हर’ अशी म्हणही आहे. तर, उशिर झाला असला तरीही, आता ही थुंकण्याची सवय सोडून दिली पाहिजे. या गोष्टी जिथं प्राथमिक स्वच्छतेचा स्तर वाढवतील, तिथं, कोरोनाचं संक्रमण रोखण्यातही मदत करतील.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो,

आज मी आपल्याशी मन की बात करतोयहे अक्षय्य तृतीयेचे पवित्र पर्व आहे, हा एक सुखद योगायोग आहे. मित्रांनो, क्षय याचा अर्थ विनाश असा होतो परंतु जो कधी नष्ट होत नाही, जो कधी समाप्त होत नाही, तो अक्षय आहे. आपल्या घरांमध्ये आपण सर्व दरवर्षी हे पर्व साजरं करतो परंतु यावर्षी आपल्यासाठी याचं विशेष महत्व आहे. आजच्या बिकट काळात हा एक असा दिवस आहे की जो आपला आत्मा, आपल्या भावना अक्षय आहे, याचं स्मरण करून देतो. हा दिवस आपल्याला याची आठवण करून देतो की, कितीही अडचणींनी तुमचा मार्ग रोखू दे, कितीही आपत्ती येऊ दे, कितीही आजारांचा सामना करावा लागू दे, -त्यांच्याशी लढण्यासाठी आणि झुंजण्यासाठी मानवाची भावना अक्षय आहे. असं मानलं जातं की हा तोच दिवस आहे ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि भगवान सूर्यदेव यांच्या आशिर्वादानं पांडवांना अक्षयपात्र मिळालं होतं. ‘अक्षयपात्र’ म्हणजे असं भांडं की ज्यातलं अन्न कधी समाप्त होत नसे. आमचे अन्नदाता शेतकरी प्रत्येक प्रकारच्या परिस्थितीत देशासाठी, आपल्या सर्वांसाठी, याच भावनेनं परिश्रम करत असतात. यांच्याच परिश्रमानं, आज आपल्या सर्वांसाठी, गरिबांसाठी, देशाकडे अक्षय अन्नभांडार आहे.

या अक्षय तृतीयेला आम्हाला आपलं पर्यावरण, वनं, नद्या आणि पूर्ण पर्यावरणीय व्यवस्थेच्या संरक्षणाबद्दल विचार केला पाहिजे, जे, आपल्या जीवनात महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. आपल्याला अक्षय रहायचं असेल तर आपल्याला प्रथम आपली  धरणी अक्षय राहिल, हे सुनिश्चित करावं लागेल.

आपल्याला माहित आहे का की अक्षय तृतियेचं हे पर्व, दानाची क्ती म्हणजे देण्याची क्ती यासाठीही एक संधी असते. ह्रदयापासूनच्या भावनेनं जे काही देतो, त्याचंच वास्तवात मह्त्व असतं. आपण काय देतो आणि किती देतो, हे महत्वाचं नाही. संकटाच्या या काळात आपल  छोटासा प्रयत्न आपल्या आसपासच्या अनेक लोकांसाठी खूप मोठा आधार होऊ शकतो. मित्रांनो, जैन परंपरेतही हा एक खूप पवित्र दिवस  आहे कारण पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांच्या जीवनात हा एक महत्वपूर्ण दिवस राहिला आहे. यामुळे जैन समाजात याला एक पर्व म्हणून साजरं केलं जातं आणि म्हणून या दिवशी लोक कोणतंही शुभ कार्य याच दिवशी सुरू करण्यास लोक पसंती का देतात, हे समजणं सोपं आहे. 

जसं की, आज नवीन काही सुरू करण्याचा दिवस आहे, तर, आपण सर्व मिळून, आपल्या प्रयत्नांनी, आपली धरती अक्षय आणि अविनाशी बनवण्याचा संकल्प करू शकतो का? मित्रांनो, आज भगवान बसवेश्वरजी यांचीही जयंती आहे. मला भगवान बसवेश्वर यांच्या आठवणी आणि त्यांच्या संदेशाशी जोडलं जाण्याची, शिकण्याची संधी मिळाली, हे माझं सौभाग्य राहिलं आहे. देश आणि जगभरातल्या सर्व भगवान बसवेश्वर यांच्या अनुयायांना त्यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभकामना. 

मित्रांनो, रमजानचा पवित्र महिना सुरू झाला आहे. जेव्हा गेल्या वेळेस रमजान साजरा केला गेला तेव्हा कुणी असा विचारही केला नसेल की यावर्षी रमजानमध्ये इतक्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. परंतु, आता जेव्हा की संपूर्ण जगभरात हे संकट आलंच आहे तर या रमजानला संयम, सद्भावना, संवेदनशीलता आणि सेवाभावाचं प्रतिक बनवावं, ही आमच्यासमोर संधी आहे. यावेळेला आम्ही, पूर्वीपेक्षा जास्त प्रार्थना करू की ईद येईपर्यत संपूर्ण जग कोरोनापासून मुक्त होईल आणि आपण पहिल्यासारखेच आशा आणि उत्साहानं ईद साजरी करू शकू. मला विश्वास आहे की रमजानच्या या दिवसांत स्थानिक प्रशासनाच्या दिशानिर्देशांचं पालन करत कोरोनाच्या विरोधातील सुरू असलेली ही लढाई आपण आणखी मजबूत करू. रस्त्यांवर, बाजारांमध्ये, मोहल्ल्यांमध्ये, शारिरिक अंतराचं पालन आता अत्यंत आवश्यक आहे. मी, आज त्या सर्व समाजाच्या नेत्यांचे आभार मानतो की जे दोन फूट अंतर राखण्याबाबत आणि घरातून बाहेर न पडण्याबाबत लोकांमध्ये जागृती करत आहेत. खरोखरच  कोरोनानं यावेळी भारतासहित, जगभरात सण साजरे  करण्याचं स्वरूपच बदलून टाकलं आहे, रंगरूप बदललं आहे. अलिकडे काही दिवसांपूर्वी, आपल्याकडे  बिहू, बैसाखी, पुथंडू, विशू, ओडिया नववर्ष असे अनेक सण आले. आपण पाहिलं की लोकांनी कशा पद्धतीनं घरात राहूनच आणि अगदी साध्या पद्घतीनं आणि समाजाचं शुभचिंतन करत हे सण साजरे केले. सहसा, ते हे सण आपले मित्र आणि परिवारासहित पूर्ण उत्साह आणि आशेनं हा सण साजरा करत होते. घरातनं बाहेर पडून आपला आनंद एकमेकांत वाटून घेत होते. परंतु, यावेळेला, प्रत्येकानं संयम बाळगला. लॉकडाऊनच्या नियमांचं पालंन केलं. आपण पाहिलं आहे की यंदा आमच्या ख्रिश्चन मित्रांनी इस्टरही आपल्या घरीच साजरा केला. आपला समाज, आपल्या देशाप्रति ही जबाबदारी पार पाडणं ही आज खूप मोठी गरज आहे. तेव्हाच आपण कोरोनाचा प्रसार रोखण्यात यशस्वी होऊ. कोरोनासारख्या जागतिक महामारीला पराभूत करू शकू.

 

माझ्या प्रिय देशवासियांनो,

या जागतिक महामारीच्या संकटातच आपल्या परिवारातला एक सदस्य या नात्यानं, आणि आपण सर्व माझ्या परिवारातलेच आहात, तेव्हा काही संकेत देणं, काही सूचना करणं, ही माझी जबाबदारी बनते. माझ्या देशवासियांना मी आग्रह करेन की, आपण अतिआत्मविश्वासात कधीही अडकणार नाही. आपल्या  शहरात, आपल्या  गावात, आपल्या  गल्लीत, कार्यालयात, आतापर्यंत कोरोना पोहचलेला नाही, म्हणून आता पोहचणार नाही, असा विचार कधीही मनात आणू नका. असा चुकीचा समज कधीही मनात बाळगू नका. जगातला अनुभव आम्हाला खूप काही सांगतो आहे. आणि, आपल्याकडे तर असं वारंवार म्हटलं जातं,-सावधानी हटी तो दुर्घटना घटी. लक्षात ठेवा, आपल्या  पूर्वजांनी आम्हाला या सार्या विषयांबाबत खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे. आपल्या  पूर्वजांन म्हटलं आहे

 ‘अग्नि: शेषम् ऋण: शेषम्,

व्याधि: शेषम् तथैवच |

पुनः पुनः प्रवर्धेत,

तस्मात् शेषम् न कारयेत ||

अर्थात, किरकोळ म्हणून सोडून दिलेली आग, कर्ज आणि आजार, संधी मिळताच पुन्हा वाढून धोकादायक बनतात. म्हणून त्यावर पूर्ण पद्धतीचे उपचार अत्यंत आवश्यक असतात. म्हणून, अतिउत्साहात, स्थानिक स्तरावर कोणतीही बेपर्वाई केली जाऊ नये. हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि, मी पुन्हा एकदा म्हणेन, दोन फुट अंतर ठेवा, स्वतःला निरोगी ठेवा, दो गज दूरी, बहुत है जरूरी. आपल्या सर्वांच्या उत्तम आरोग्याची कामना करत, मी माझी ही मन की बात संपवत आहे. पुढली मन की बात च्या वेळेस जेव्हा भेटू, तेव्हा या जागतिक महामारीतनं मुक्तिच्या वार्ता जगभरातनं येतील, मानवजात या संकटातून बाहेर येईल, या प्रार्थनेसह आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद !

****

B.Gokhale/AIR/P.Kor



(Release ID: 1618380) Visitor Counter : 424