विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
सक्रिय औषधी आणि औषधनिर्मितीचे अन्य घटक यांबांबतचे देशाचे अवलंबित्व कमी करण्यासाठी सीएसआयआर-आयआयसीटीचा पुढाकार
Posted On:
25 APR 2020 6:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 एप्रिल 2020
कोणत्याही औषधाचा गुणकारी प्रभाव निर्माण करण्यासाठी एपीआय म्हणाजेच ‘अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रिडिएंटस्’ अर्थात सक्रिय औषधी घटक अतिशय महत्वाचे असतात. भारताला अशा एपीआयचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर चीनकडून होतो. म्हणजेच भारत एपीआयसाठी चीनवर अवलंबून आहे. मात्र आता हैद्राबादच्या भारतीय रसायन तंत्रज्ञान संस्था म्हणजेच आयआयसीटीने हैद्राबादस्थित असलेल्या एकीकृत औषधनिर्मिती संस्था, एलएएक्सएआय लाइफ सायन्स यांनी एकत्र येवून एपीआय आणि औषध निर्मिती चे अन्य घटक विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आता औषधांच्या निर्मितीसाठी भारताचे चीनवर असणारे अवलंबित्व कमी होण्यास मदत होवू शकेल.
सीएसआयआर म्हणजेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन मंडळाअंतर्गत एका प्रयोगशाळेत एलएएक्सएआयच्या मदतीने कोरोना विषाणूच्या विरोधात वापरण्यात येणा-या औषधांचे संश्लेषण करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने यूमिफनोव्हिर, रेमेडॅझिव्हिर आणि महत्वाचा मधस्थ एचसीक्यू म्हणजेच हायड्रोक्सी क्लोरोक्विन यांच्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
मलेरियाच्या विरोधात जे औषध वापरले जाते, त्या एचसीक्यूची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करणा-या देशांपैकी भारत एक आहे. याच औषधाचा वापर कोविड-19 महामारीमध्ये होत आहे. त्यामुळे गेल्या काही आठवड्यामध्ये या औषधाची मागणी देशभरातून प्रचंड प्रमाणात वाढली आहे. गेल्या काही आठवड्यात भारताने 50 पेक्षा जास्त देशांना एचसीक्यूचा पुरवठा केला आहे. यामध्ये अमेरिकेलाही हे औषध भारताने दिले आहे. या औषधासाठी आवश्यक असलेल्या एपीआय घटकाची निर्मिती भारतातल्या संस्थांनी संयुक्तपणे केली तर सर्वात महत्वाचे म्हणजे चीनवरील अवलंबित्व कमी तर होणारच आहे. त्याचबरोबर या औषधाची किंमतही कमी होवू शकेल. याआधी रेमडेसिव्हिरचा वापर इबोला विषाणूच्या विरोधात केला होता. त्याचाच वापर कोविड-19 महामारीचा प्रसार रोखण्यासाठी होवू शकेल का, कोरोना विषाणूंचा नायनाट करण्याची क्षमता त्यामध्ये आहे का,यांचा विचार सुरु आहे तसेच त्याच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन करण्यासाठी वैद्यकीय चाचण्या सुरू आहेत.
औषधांची सुरक्षा आणि अत्यावश्यक औषधांचा सातत्याने- विनाखंड पुरवठा करणे हे सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर मुद्दे आहेत. सध्याच्या महामारीच्या काळात औषधांचा पुरवठा सुरळीत ठेवण्याची गरज लक्षात घेवून पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमडळाच्या बैठकीत भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर औषध निर्मितीला प्रोत्साहनासाठी विशेष पॅकेज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औषधासाठी भारताचे चीनवर असलेले अवलंबित्व कमी करण्याचा उद्देशही यामागे आहे.
एलएएक्सएआय लाइफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना 2007 मध्ये झाली आहे. जागतिक औषध निर्मिती कंपन्यांच्या रसायन शास्त्रातल्या शोधांना गती देण्याच्या उद्देशाने ही कंपनी काम करीत आहे. सध्या ही कंपनी एपीआय, औषधांचे फॉर्म्यूले तयार करणे आणि एपीआयचे उत्पादन करणारी एकीकृत कंपनी आहे.
व्यावसायिक ज्ञानाचे सहकार्य मिळाल्यानंतर एलएएक्सएआय लाइफ सायन्स एपीआयचे उत्पादन करणारी भारतातली पहिली कंपनी असेल. या एपीआय आणि औषधी मध्यस्थांच्या उत्पादनाला अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनचे तसेच जीएमपी म्हणजेच गुड मॅन्यूफॅक्चरिंग प्रॅक्टिसकडून प्रकल्पाला मान्यता घेण्यात येणार आहे. एलएएक्सएआयची उपकंपनी थेरपिवा प्रायव्हेट लिमिटेडच्यावतीने हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे.
[अधिक तपशीलासाठी: डॉ. एम. चंद्रशेखरम, सीएसआयआर-
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, हैद्राबाद - 500007, भारत.
ई-मेल - headkim@iict.res.in]
* * *
G.Chippalkatti/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1618217)
Visitor Counter : 421