पंतप्रधान कार्यालय

कोविड -19 च्या युगातील आयुष्य

Posted On: 19 APR 2020 9:48PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 एप्रिल 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिंक्डइनवर काही विचार व्यक्त केले आहेत ज्यात तरुणांना आणि व्यावसायिकांना रस असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिंक्डइनवर व्यक्त केलेल्या विचारांचा मुख्यांश पुढीलप्रमाणे -

"या शतकाच्या तिसऱ्या दशकाची अनपेक्षित सुरुवात झाली  आहे. कोविड -19 ने आपल्याबरोबर अनेक अडचणी आणल्या आहेत. कोरोना विषाणूने व्यावसायिक जीवनाचा आकृतिबंध लक्षणीयरित्या बदलला आहे. सध्याच्या दिवसांमध्ये घर हे नवीन कार्यालय आहे. इंटरनेट ही बैठकीची नवी जागा बनली आहे. सध्या, सहकाऱ्यांबरोबर कार्यालयीन ब्रेक हा इतिहास झाला आहे.
मी देखील या बदलांशी जुळवून घेत आहे. अनेक बैठका, मग त्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांबरोबर असतील, अधिकारी आणि जागतिक नेत्यांबरोबर असतील, या सर्व बैठका आता  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होतात. विविध हितधारकांकडून वास्तविक अभिप्राय मिळवण्यासाठी, समाजातील अनेक घटकांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्स बैठका घेण्यात आल्या आहेत. स्वयंसेवी संस्था, नागरी समाज गट आणि समुदाय संघटना यांच्याशी व्यापक संवाद झाला आहे. रेडिओ जॉकींशीही संवाद झाला.
याव्यतिरिक्त, मी समाजातील विविध घटकांकडून दररोज दूरध्वनीच्या माध्यमातून  प्रतिसाद जाणून घेत असतो. 
या काळात लोक ज्या  पद्धतीने आपली कामे सुरु ठेवत आहेत ते पाहण्यासारखे आहे. आपले चित्रपट कलाकार  काही सर्जनशील ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून  घरी राहण्याचा संदेश देत आहेत. आपल्या गायकांनी एक ऑनलाइन मैफिल केली. बुद्धिबळपटू डिजिटल बुद्धिबळ खेळले आणि त्या माध्यमातून कोविड-19 विरूद्ध लढ्यात योगदान दिले. खूपच अभिनव उपक्रम!
कामाचे ठिकाण सर्वात आधी डिजिटल होत आहे, आणि का नाही?
एकूणच, तंत्रज्ञानाचा सर्वात परिवर्तनात्मक परिणाम अनेकदा गरीबांच्या जीवनात होतो. हे तंत्रज्ञानाने नोकरशाहीचा  पदानुक्रम नाहीसा केला, मध्यस्थांना दूर केले आणि कल्याणकारी उपायांना गती दिले. 
मी तुम्हाला एक उदाहरण देतो. 2014 मध्ये जेव्हा आम्हाला सेवा करायची संधी मिळाली, तेव्हा आम्ही भारतीयांना विशेषत: गरीबांना त्यांचे जनधन खाते, आधार आणि मोबाईल क्रमांकाशी जोडायला सुरवात केली.
या नुसत्या जोडणीने  केवळ भ्रष्टाचार आणि कमीशन मागणे जे अनेक दशके चालू होते तेवढेच थांबवले नाही तर सरकारला एका बटणाची कळ दाबून पैसे हस्तांतरित करायला देखील सक्षम बनवले. एका बटणाची कळ दाबल्यामुळे फाइल विविध पदांवरील व्यक्तींकडे जाणे बंद झाले आणि त्यामुळे अनेक आठवड्यांचा विलंब देखील टळला.
जगभरात बहुधा भारतातच अशा प्रकारची सर्वात मोठी पायाभूत सुविधा आहे. कोविड-19 च्या परिस्थितीत या पायाभूत सुविधेमुळे गरीब आणि गरजूना पैसे त्वरित हस्तांतरित  करण्यात मोठी मदत झाली असून कोट्यवधी कुटुंबांना याचा लाभ झाला आहे. 
आणखी एक बाब म्हणजे शिक्षण क्षेत्र. या क्षेत्रात अनेक उत्तम व्यावसायिक आधीपासूनच अभिनव उपक्रम राबवत आहेत. या क्षेत्रातील उत्साहवर्धक तंत्रज्ञानाचे स्वतःचे फायदे आहेत. शिक्षकांना मदत करण्यासाठी आणि ई-शिक्षणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने दीक्षा (DIKSHA ) पोर्टलसारखे प्रयत्नही केले आहेत. सुगम्य, समानता आणि शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याचा स्वयंचा उद्देश आहे. ई-पाठशाळा, जी अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामुळे  विविध ई-पुस्तके आणि शिक्षण सामग्री सहज उपलब्ध होत आहे. 
आज, जग नवीन व्यवसाय मॉडेलच्या शोधात आहे.
भारत एक तरुण देश म्हणून नाविन्यपूर्ण उत्साहासाठी परिचित असून नवीन कार्य संस्कृती प्रदान करण्यात पुढाकार घेऊ शकेल.

मी ही नवीन व्यवसाय आणि कार्य संस्कृती व्याकरणातील स्वरांच्या आधारे पुन्हा परिभाषित  करतो.
मी त्यांना म्हणतो- नवीन सामान्यांचा स्वर - कारण इंग्रजी भाषेतील एक
ए,ई,आय,ओ,यु या स्वरांप्रमाणे, कोव्हिडनंतरच्या जगात कोणत्याही व्यवसाय मॉडेलचे हे आवश्यक घटक बनतील.

जुळवून घेण्याची क्षमता 
सहजपणे जुळवून घेता येतील अशा व्यवसाय आणि जीवनशैलीच्या मॉडेल्सचा विचार करणे ही काळाची गरज आहे. 

असे करण्याचा अर्थ असा आहे की संकटाच्या काळातसुद्धा आपली कार्यालये, व्यवसाय आणि व्यापार जलद गतीने वाढू शकतात आणि जीवितहानी होणार नाही हे देखील सुनिश्चित करता येते.
डिजिटल पेमेंट्स स्वेच्छेने स्वीकारणे हे  जुळवून घेण्याचे प्रमुख उदाहरण आहे. मोठ्या आणि लहान दुकानांच्या मालकांनी डिजिटल उपकरणांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे जे विशेषत: संकटाच्या काळात व्यापाराला जोडून ठेवतील. भारतात डिजिटल व्यवहारात उत्साहवर्धक वाढ झालेली पाहायला मिळत आहे. 
दुसरं उदाहरण म्हणजे टेलीमेडिसिन. आपण अनेक वैद्यकीय सल्लागार पाहत आहोत जे प्रत्यक्ष दवाखान्यात किंवा रुग्णालयात न जाता वैद्यकीय सल्ला देत आहेत. पुन्हा, हे एक सकारात्मक चिन्ह आहे. जगभरातील टेलिमेडिसिनला अधिक मदत करण्यासाठी आपण व्यवसाय मॉडेल्सचा विचार करू शकतो का ?

 

कार्यक्षमता:
कदाचित, हीच  वेळ आहे ज्याला आपण कार्यक्षम म्हणून संबोधतो त्याचा पुन्हा विचार करण्याची. कार्यालयात किती वेळ घालवला यातच  केवळ कार्यक्षमता असू शकत नाही. 

आपण कदाचित अशा मॉडेल्सचा विचार केला पाहिजे जिथे दिसणाऱ्या प्रयत्नांपेक्षा उत्पादनक्षमता आणि कार्यक्षमतेला अधिक महत्त्व असेल. ठराविक मुदतीत एखादे काम पूर्ण करण्यावर भर दिला पाहिजे.
 

सर्वसमावेशकता:

गरीब, सर्वात असुरक्षित , तसेच आपल्या पृथ्वीची काळजी घेण्याला प्राधान्य असणारे व्यवसाय घेऊन आपण मॉडेल  विकसित करूया.
आपण हवामान बदलाचा सामना करण्यात मोठी प्रगती केली आहे. जेव्हा मानवी क्रिया मंद गतीने सुरु असताना ती किती लवकर फुलू शकते हे आपल्याला निसर्गाने दाखवून दिले आहे.पृथ्वीवरील आपला प्रभाव कमी करणारे  तंत्रज्ञान आणि पद्धती विकसित करण्यात  भविष्यात खूप वाव आहे. कमी करून अधिक करा.
कोविड-19 ने आपल्याला कमी किमतीत आणि मोठ्या प्रमाणात आरोग्य उपायांवर काम करण्याची गरज लक्षात आणून दिली आहे. आपण मानवतेचे आरोग्य आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी जागतिक प्रयत्नांसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ होऊ शकतो.
कोणत्याही परिस्थितीत आपल्या नागरिकांना आवश्यक वस्तू सहज उपलब्ध व्हाव्यात आणि आपल्या शेतकर्‍यांना माहिती, यंत्रसामुग्री आणि बाजारपेठांमध्ये सहज प्रवेश मिळू शकेल यासाठी आपण नाविन्यपूर्ण कल्पनांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे.

 

संधी:

प्रत्येक संकट त्याच्याबरोबर संधी घेऊन येते. कोविड-19 देखील वेगळा नाही. आता कोणत्या नवीन संधी / वाढीची क्षेत्रे उदयाला येतील याचे आपण मूल्यांकन करूया.
कोविडनंतरच्या जगात भारत पुढे असायला हवा. आपली माणसे, आपले कौशल्य संच ,आपली मूलभूत क्षमता या कामी  कशा प्रकारे वापरली जाऊ शकते याबद्दल आपण विचार करूया.

 

सार्वत्रिकता 
कोविड-19 प्रहार करण्यापूर्वी वंश, धर्म, रंग, जात, पंथ, भाषा किंवा सीमा पाहत नाही. त्यानंतरचा आपला प्रतिसाद आणि आचरण एकता आणि बंधुत्व यांना प्राधान्य देणारे असायला हवे. आपण यात एकत्र आहोत.
इतिहासाच्या पूर्वीच्या क्षणी जेव्हा देश किंवा समाज एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकले होते, आज आपण एकत्रितपणे एका समान आव्हानाला सामोरे जात आहोत. एकजूट आणि लवचिकपणा हेच भविष्य असेल. 
भारताकडून आगामी मोठ्या कल्पनांमध्ये जागतिक प्रासंगिकता आणि उपयोजजितता याला स्थान असायला हवे. केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता त्यांच्यात असली पाहिजे.
वाहतुकीकडे पूर्वी केवळ रस्ते, गोदामे, बंदर यासारख्या भौतिक पायाभूत सुविधांच्या लोलकातून पाहिले जायचे. परंतु लॉजिस्टिक तज्ञ सध्या त्यांच्या स्वत: च्या घरांमधून आरामात जागतिक पुरवठा साखळी नियंत्रित करू शकतात.
कोविड-19 नंतरच्या जगात भौतिक आणि आभासी यांच्या योग्य मिलाफासह  जटिल आधुनिक बहुराष्ट्रीय पुरवठा साखळींचे जागतिक मुख्य केंद्र म्हणून भारत उदयाला येऊ शकतो. त्या प्रसंगासाठी सज्ज होऊया आणि ही संधी साधूया. 
मी तुम्हा सर्वांना याबद्दल विचार करण्याचे आणि यात योगदान देण्याचे आवाहन करतो.
BYOD पासून WFH हा बदल कार्यालयीन आणि वैयक्तिक संतुलन राखण्यात नवीन आव्हाने निर्माण करत आहे. काहीही झाले तरी तंदुरुस्ती  आणि व्यायामासाठी वेळ द्या. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्याचे एक साधन म्हणून योगाचा प्रयत्न करून पाहा.
भारताची पारंपारिक औषध प्रणाली शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी मदत करणारी म्हणून ओळखली जाते. आयुष मंत्रालय एक प्रोटोकॉल घेऊन आले हे जो निरोगी राहण्यास मदत करेल. त्याकडेही लक्ष द्या.
शेवटचे आणि महत्त्वाचे म्हणजे कृपया आरोग्य सेतू मोबाइल अ‍ॅप डाउनलोड करा. कोविड-19 चा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणारे हे भविष्यकालीन  अॅप आहे. जितके जास्त डाउनलोड, तेवढे जास्त परिणामकारक.
तुम्हा सर्वांकडून प्रतिसादाची प्रतीक्षा करतो. ”

 

 

G.Chippalkatti/S.Kane/D.Rane


(Release ID: 1616223) Visitor Counter : 474