उपराष्ट्रपती कार्यालय

वैशाखी, विशू, पुथंडू, मासादि, वैशाखडी आणि बहाग बिहू या सणांच्या निमित्ताने, उपराष्ट्रपतींनी देशवासियांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 13 APR 2020 1:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 एप्रिल, 2020

 

देशाच्या विविध भागात आज आणि उद्या साजऱ्या होत असलेल्या वैशाखी, विशू, पुथंडू, मासादि, वैशाखडी आणि बहाग बिहू या सणांच्या निमित्ताने उपराष्ट्रपती एम.वेंकैय्या नायडू यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
“देशभर साजऱ्या होत असलेल्या वैशाखी, विशू, पुथंडू, मासादि, वैशाखडी आणि बहाग बिहू सणांच्या आनंदी पर्वाच्या निमित्ताने मी देशवासियांचे अभिनंदन करून शुभेच्छा देत आहे.
नववर्षाच्या आगमनानिमित्त साजरे केले जाणारे हे सण नव्या पर्वाची आणि नव्या आशांची भेट घेऊन येतात. पिकांच्या सुगीसोबत हे सण निसर्गाचे सौंदर्य आणि विपुलतेचा उत्सव साजरा करतात.
देशाच्या विविध भागांतील जनता नॉवेल कोरोना विषाणूच्या संकटाशी लढत असताना आलेले हे सण आपल्या मनाला नव्याने उभारी घ्यायची ताकद देतात आणि जीवनाची नवी दिशा दाखवतात. 

आगामी वर्ष आपणा सर्वांसाठी समृद्धता घेऊन येईल आणि आपल्यावर निसर्गाची मुक्तहस्ते उधळण होईल अशी आशा मी या निमित्ताने व्यक्त करतो. येणारे वर्ष आपल्यामध्ये निस्वार्थी वृत्ती, दयाळूपणा, करुणाशीलता आणि संवेदनशीलता या गुणांची रुजवात करो आणि आपल्या  जीवनात शांतता, एकांतता, समृद्धी आणि आनंदाची भेट घेऊन येवो, अशी प्रार्थना मी करतो.
हे नववर्ष आपण सगळ्यांनी आपापल्या घरात आपल्या प्रियजनांसोबत राहून साजरे करूया आणि ते करताना मोठे उत्सव आयोजित करणे  किंवा खूप लोकांचे एकत्र येणे टाळण्याचा निग्रह पाळूया. 
घरात राहा, सुरक्षित राहा.” अशा शब्दात उपराष्ट्रपतींनी पाठविलेल्या संदेशात त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

 

 

U.Ujgare/S.Chitnis/D.Rane


(Release ID: 1613875) Visitor Counter : 80