विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

कोविड-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सीएसआयआर-सीएमईआरआय, दुर्गापूर तर्फे निर्जंतुकीकरण प्रवेशद्वार (वॉकवे) आणि रोड सॅनिटायझर युनिट विकसित

Posted On: 10 APR 2020 3:14PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 एप्रिल 2020


जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाव्हायरस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद तथा सीएसआयआर आणखी काही विज्ञान आणि तंत्रज्ञानाधारित उपाययोजना अंमलात आणत आहे. परिषदेच्या दुर्गापूर येथील प्रयोगशाळेत केंद्रीय यांत्रिक अभियांत्रिकी संशोधन संस्थेने या विषाणूविरोधात लढा देणारे तंत्रज्ञान आणि उत्पादने विकसित केली आहेत.

आजच्या परिस्थितीला अनुरूप विकसित तंत्रज्ञान आणि उत्पादनांचे तपशील:

निर्जंतुकीकरण प्रवेशद्वार (वॉकवेज्) : निर्जंतुकीकरण प्रवेशद्वार ही आजघडीला उपलब्ध असलेली सर्वात प्रभावी अशी सर्वसमावेशक जंतुनाशक यंत्रणा आहे, असे म्हणता येईल. या यंत्रणेअंतर्गत, किमान जागेत एखाद्या व्यक्तीचे जास्तीत जास्त निर्जंतुकीकरण करता येते. अलगीकरण किंवा विलगीकरण कक्ष असलेल्या स्थानांसह, मोठ्या जमावाची ये-जा असणाऱ्या ठिकाणची प्रवेशद्वारे, वैद्यकिय केंद्रे आणि मोठ्या प्रमाणावर वर्दळ असणाऱ्य़ा ठिकाणी ही यंत्रणा उपयुक्त ठरेल.

सीएसआयआर-सीएमईआरआयने अशा प्रकारची दोन प्रवेशद्वारे (वॉकवेज्)विकसित केली आहेत :

  1. न्यूमॅटिक प्रकारचे निर्जंतुकीकरण प्रवेशद्वार (वॉकवे) : या प्रकारच्या निर्जंतुकीकरण प्रवेशद्वार यंत्रणेत आवश्यक प्रमाणात बाष्प तयार व्हावे, यासाठी सिक्स बार प्रेशर एअर कंप्रेसर लावण्यात आले आहेत. प्रत्येक व्यक्तीसाठी 20 ते 40 सेकंदाच्या अवधीत ही यंत्रणा सक्रिय राहिल, याची खातरजमा यंत्रणेतील संवेदक करतात. या यंत्रणेची प्रारंभिक किंमत तुलनेने जास्त असली तरी,  त्यात जंतुनाशकाचा प्रभावी वापर केला जात असल्यामुळे त्याचे परिचालन शुल्क फारच कमी आहे.  सीएमईआरआय तसेच परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ही यंत्रणा सध्या कार्यरत असून त्याची उंची 2 मीटर, लांबी 2.1 मीटर तर रूंदी  1  मीटर इतकी आहे.
  2. हायड्रॉलिक (जलआधारित) प्रकारचे निर्जंतुकीकरण प्रवेशद्वार (वॉकवेज्) : या प्रकारच्या निर्जंतुकीकरण प्रवेशद्वार यंत्रणेत तोट्यांमधून आवश्यक प्रमाणात बाष्प तयार व्हावे, यासाठी एक अश्वशक्ती दबाव क्षमतेची मोटार बसविण्यात आली आहे. या यंत्रणेची प्रारंभिक किंमत तुलनेने कमी आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी 20 ते 40 सेकंदाच्या अवधीत ही यंत्रणा सक्रिय राहिल, याची खातरजमा यंत्रणेतील संवेदक करतात. सीएमईआरआय वैद्यकीय केंद्रात ही यंत्रणा सध्या कार्यरत आहे.

दिल्लीतील राष्ट्रीय विज्ञान केंद्र, दुर्गापूर महानगरपालिका आणि दुर्गापूर येथील ईश्वरचंद्र विद्यासागर हायस्कूलने ही निर्जंतुकीकरण प्रवेशद्वार यंत्रणा लावून घेण्यात स्वारस्य असल्याचे कळविले आहे.

Description: F:\New folder (5)\Disinfection Walkway 1.jpg                                   Description: C:\Users\USER\Downloads\Press\DMC\untitled-4-2.jpg

              निर्जंतुकीकरण प्रवेशद्वार                     निर्जंतुकीकरण प्रवेशद्वाराची पाहणी करणारे दुर्गापूर महानगरपालिकेचे प्रतिनिधी

 

रोड सॅनिटायझर युनिट (रस्ते स्वच्छक एकक):

सीएसआयआर-सीएमईआरआयचे रोड सॅनिटायझर युनिट, ही रस्ते स्वच्छ करणारी यंत्रणा ट्रॅक्टरवर बसविण्यात आली आहे. महामार्ग अथवा पथकर नाके, अशा जास्त वाहतुकीच्या अथवा संसर्ग होण्याची जास्त शक्यता असणाऱ्या ठिकाणी हे एकक प्रभावीपणे काम करते. गृह संकुले, कार्यालय संकुले, क्रीडा केंद्र अथवा निवासी इमारत अशा परिसरातही ही यंत्रणा उपयुक्त ठरेल.

स्वच्छता द्रावणाचा योग्य वापर व्हावा, यासाठी ही यंत्रणा 15 ते 35 बार्सच्या सहाय्याने 16 फूट परिघातील क्षेत्रात काम करते. त्यासाठी 12 तोट्यांचा वापर केला जातो. 2000 ते 5000 लिटर क्षमतेची टाकी असून 22 एलएमपी पंपाच्या साहाय्याने एका वेळी 75 किलोमिटर रस्ता स्वच्छ करू शकते.

या यंत्रणेची पाहणी केल्यानंतर आसनसोल महानगरपालिकेने अशा चार एककांची मागणी नोंदवली असून त्यापैकी एक एकक प्रदान करण्यात आले आहे. दुर्गापूर महानगर पालिकेनेही यात स्वारस्य दाखविले असून वाटाघाटी सुरू आहेत. काही सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग एककांबरोबरच काही लहान उद्योग समुहांनीही स्वारस्य दाखवले असून त्याबाबत चर्चा सुरू आहेत.

Description: untitled-7-5.jpg Description: Tractor operated road disinfection Spray System.jpg

ट्रॅक्टर परिचालित यंत्रणेचे प्रात्यक्षिक

 

 

B.Gokhale/ M.Pange/D.Rane
 


(Release ID: 1612908) Visitor Counter : 178