पर्यटन मंत्रालय

'स्ट्रँडेड इन इंडिया' संकेतस्थळावर पहिल्या 5 दिवसात769 परदेशी पर्यटकांनी केली नोंद

Posted On: 06 APR 2020 11:59AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 एप्रिल 2020

कोविड-19 ला आळा घालण्यासाठी लॉकडाउन जारी केल्यामुळे देशाच्या निरनिराळ्या भागांत अडकून पडलेले परदेशी पर्यटक शोधून त्यांना मदत करण्यासाठी व सुविधा पुरविण्यासाठी भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने 31 मार्च 2020 रोजी www.strandedinindia.comनावाचे संकेतस्थळ सुरु केले आहे. अशा पर्यटकांनी या संकेतस्थळावर लॉग इन करून, संपर्काविषयी काही प्राथमिक माहिती पुरवणे गरजेचे आहे. तसेच त्यांना काही अडचणी असल्यास तेही सांगायचे आहे. हे संकेतस्थळ सुरु झाल्यापासून पहिल्या 5 दिवसांत देशभरातील 769 परदेशी पर्यटकांनी त्यावर नोंदणी केली आहे.

अशा परदेशी पर्यटकांच्या मदतीसाठी प्रत्येक राज्य सरकार व केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाने एक शीर्ष अधिकारी निश्चित केला/ केली आहे. संकेतस्थळावर आलेल्या विनंती व मागण्यांनुसार पर्यटन मंत्रालयाची 5 प्रादेशिक कार्यालये या शीर्ष अधिकाऱ्यांशी समन्वय साधून काम करत आहेत. तसेच या अडकलेल्या परदेशी व्यक्तींच्या व्हिसाबद्दलचे मुद्दे विचारात घेण्यासाठी सदर प्रादेशिक कार्यालये इमिग्रेशन कार्यालयांशी तसेच FRRO म्हणजेच परदेशी व्यक्तींच्या नोंदणीच्या प्रादेशिक कार्यालयांशीही सातत्याने समन्वय साधत आहेत. देशात / राज्यात प्रवास करण्याबद्दल अथवा मायदेशी परतण्याबद्दलच्या अशा व्यक्तींच्या विनंत्यांविषयीही, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, गृह मंत्रालय आणि संबंधित दूतावास / उच्चायुक्त / वाणिज्य दूतावास यांच्याशी समन्वय साधला जात आहे.

या कार्यक्षम व उपयुक्त संकेतस्थळामुळे त्या परदेशी पर्यटकांशी त्यांच्या गरजांनुसार इ-मेल, दूरध्वनीच्या माध्यमातून अथवा व्यक्तिश: संपर्क साधणे शक्य होत आहे. त्यांच्या त्यांच्या देशांच्या भारतातील कार्यालयांशी त्यांना जोडून देण्याबरोबरच मायदेशी जाणाऱ्या विमानांबद्दलची ताजी माहिती त्यांना दिली जात आहे. गरजेनुसार त्यांना अन्न, औषधे व निवासव्यवस्था पुरविण्यात येत आहे.

लॉकडाउनदरम्यान बिहारच्या सुपौल जिल्ह्यात अडकलेल्या एका अमेरिकन स्त्रीच्या मुलावर दिल्लीत शस्त्रक्रिया सुरु होती. त्यावेळी सदर संकेतस्थळामुळे विविध मंत्रालये व विभागांमध्ये समन्वय साधला जाऊन तिला दिल्लीला जाण्यासाठी प्रवासाची परवानगी मिळून ती सुरक्षितपणे तेथे पोहोचू शकली.

वैद्यकीय पर्यटनाचा भाग म्हणून, एका शस्त्रक्रियेसाठी चेन्नईत आलेल्या २ कोस्टारिकी नागरिकांना शास्त्रक्रियेनंतरही तेथेच अडकून पडावे लागले होते. मात्र राज्य सरकार, दूतावास आणि त्यांच्या निवासाचे हॉटेल यांच्यात उत्तम समन्वय साधला गेल्याने त्यांच्या चिंतांना पूर्णविराम मिळाला असून आता ते स्वस्थ आणि सुरक्षित आहेत.

ऑस्ट्रेलियातून सहकुटुंब आलेल्या एका पर्यटकाला अपस्माराचा त्रास आहे. अहमदाबादमध्ये अडकून पडल्यावर कालांतराने त्याच्या ऑस्ट्रेलियन डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांचा साठा संपला. मात्र संकेतस्थळावरून माहिती मिळाल्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयाने लक्ष घालून त्याला पुरेशी औषधे पुरविण्याबरोबरच खाद्यपदार्थ व स्थानिक वाहतूक सुविधाही देऊ केली. आता ते कुटुंबीय चिंतामुक्त झाले आहेत.

आत्यंतिक निकडीच्या क्षणी या संकेतस्थळाच्या माध्यमातून अनेक परदेशी व्यक्तींना मिळालेल्या मदतीची ही काही मोजकी उदाहरणे आहेत. येत्या काळातही त्याचा असाच उपयोग होत राहणार आहे. आपल्या परदेशी पाहुण्यांना भारतात असताना सर्वतोपरी स्वास्थ्य मिळावे यासाठी सरकार कटिबद्ध आहे. 'अतुल्य भारत'चे पायाभूत सूत्र असणाऱ्या 'अतिथी देवो भव' या मूल्याचाच हा आविष्कार होय.

 

U.Ujgare/J.Waishampayan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1611587) Visitor Counter : 263