मंत्रिमंडळ

भारत आणि रशिया यांच्यातल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात सहकार्य करण्याच्या सामंजस्य कराराला मंत्री मंडळाची मंजुरी

Posted On: 03 OCT 2018 6:59PM by PIB Mumbai

भारताच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ (एनएसआयसी ) आणि रशियाच्या जेएससी-रशियन लघु आणि मध्यम उद्योग महामंडळ यांच्यातल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्री मंडळाने मान्यता दिली आहे.रशियाच्या अध्यक्षांच्या आगामी भारत भेटीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात येतील.

उभय देशांच्या लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात सहकार्याला प्रोत्साहन देणे हा या कराराचा उद्देश आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात या करारामुळे, ठोस रूपरेखा आणि सक्षम वातावरण निर्माण होणार आहे. या करारामुळे दोन्ही देशातल्या उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढीला लागेल तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात व्यापार भागीदारी, संयुक्त उपक्रम सुरु करण्यासाठी मदत होणार आहे.

भारतीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी यामुळे नवी बाजारपेठ,संयुक्त उपक्रम, उत्तम प्रथा आणि तंत्रज्ञान सहयोग याद्वारे नवे  दालन खुले होणार आहे.

***

BG/NC



(Release ID: 1548523) Visitor Counter : 80