Posted On:
28 NOV 2026 3:46PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशात वाराणसी इथे आयोजित काशी तमिळ संगममच्या पाचव्या पर्वाचे (KTS 5.0) उद्घाटन झाले. या निमित्ताने उपराष्ट्रपतींच्या हस्ते 10 परदेशी भाषांसह एकूण 50 भाषांमध्ये अनुवादित केलेल्या तिरुक्कुरल ग्रंथाच्या आवृत्त्यांचे प्रकाशनही करण्यात आले.
यावेळी उपराष्ट्रपतींनी उपस्थितांना संबोधितही केले. काशी आणि तामिळनाडू या दोन प्रदेशांमध्ये हजारो वर्षांपासून अधिक खोलवर रुजलेले नागरी संस्कृतीचे तसेच सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नाते आहे असे त्यांनी सांगितले. काशी ही जगाची आध्यात्मिक राजधानी असल्याचे ते म्हणाले. तमिळ जनतेच्या हृदयात या शहराचे एक विशेष स्थान आहे. काशीला भेट देणे आणि बाबा विश्वनाथांचे दर्शन घेण्याबाबत तमिळ लोकांमध्ये तीव्र आध्यात्मिक इच्छा असते असते असे त्यांनी सांगितले.
देशात व्यापक स्वरुपात भाषिक, प्रादेशिक आणि सांस्कृतिक विविधता आहे, मात्र परस्पर सामायिक नागरी संस्कृती आणि आध्यात्मिक मूल्यांनी देशाला कायम एकत्र बांधून ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले. अनंत काळापासूनच्या या बंधांपासूनच प्रेरणा घेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली काशी तमिळ संगमम या उपक्रमाचा प्रारंभ झाल्याचे त्यांनी नमूद केले. आता हा उपक्रम केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम राहिलेला नाही, तर तामिळनाडू आणि काशी या भूप्रदेशांमधील ऐतिहासिक संबंधांना उजाळा देणारी तसेच एक भारत, श्रेष्ठ भारत ही भावना अधिक दृढ करणारी एक महत्त्वाची राष्ट्रीय चळवळ बनली आहे, असे त्यांनी सांगितले.
तिरुक्कुरल पयिल्वोम - तिरुक्कुरल अभ्यास करें ही या उपक्रमांअंतर्गत यंदाच्या पर्वाच्या आयोजनाची संकल्पना आहे. तिरुक्कुरलमधील कालातीत ज्ञान आणि नैतिक मूल्ये विशेषतः विद्यार्थी आणि युवा वर्गापर्यंत पोहोचवणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
त्यांनी नमूद केले की, तिरुक्कुरलचे परकीय भाषांसह 50 भाषांमध्ये भाषांतर होणे हे तामिळ भाषा आणि साहित्याचे मोठे यश असून, तिरुवल्लुवर यांच्या शिकवणीच्या वैश्विक प्रासंगिकतेला दिलेली आदरांजली आहे. पहिल्या काशी तामिळ संगम मध्ये 'तिरुक्कुरल' 13 भाषांत प्रकाशित झाले होते, तर दुसऱ्या आयोजनाच्या वेळी आणखी 16 भाषांमध्ये त्याचे भाषांतर झाले, याची आठवण करून देत त्यांनी सांगितले की, हा उपक्रम पाचव्यांदा आयोजित होत असताना, ते 50 भाषांमध्ये उपलब्ध होणे, हा तामिळ साहित्यिक वारसा अधिक व्यापक स्तरावर पोहोचवण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा आहे.
भाषिक सलोख्याचे महत्त्व अधोरेखित करत उपराष्ट्रपती म्हणाले की, प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगला पाहिजे आणि त्याच वेळी इतरांच्या भाषांचाही आदर केला पाहिजे. ते म्हणाले, "आपल्या स्वतःच्या भाषेबद्दलचे प्रेम हे कधीही दुसऱ्या भाषेबद्दलचा द्वेष बनू नये." ते म्हणाले की, भारताची ताकद त्याच्या अनेक भाषांमध्ये आणि सामायिक आदर्शांमध्ये सामावली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संगम युगातील कवी 'कनियान पुंगुंद्रनार' यांच्या, "यादुम ऊरे, यावरुम केलिर", या प्रसिद्ध शब्दांचा उल्लेख केला होता, त्याची आठवण करून दिली. यामुळे, तामिळ विश्वबंधुत्वाचा आदर्श जागतिक व्यासपीठावर पोहोचला, असे ते म्हणाले.
भारताच्या 2047 साठीच्या आकांक्षांविषयी बोलताना उपराष्ट्रपती म्हणाले की विकसित भारताचा उद्देश केवळ आर्थिक वाढीपुरता मर्यादित नसावा. त्यांनी सांगितले की, भारताने सांस्कृतिक वारसा, मूल्ये आणि मानवतावादाचे जागतिक उदाहरण म्हणूनही उदयाला यावे. संघर्ष, अनिश्चितता आणि विभाजनाचा सामना करत असलेल्या आजच्या जगात, त्यांनी भारताच्या 'वसुधैव कुटुंबकम्' आणि 'सर्वे भवन्तु सुखिनः' या पारंपरिक तत्त्वज्ञानाची समर्पकता अधोरेखित केली.
आपल्या भाषणाचा समारोप करताना, उपराष्ट्रपतींनी देशातील नद्यांना जोडण्याच्या संकल्पनेवर विश्वास व्यक्त केला आणि म्हटले की, असा एक दिवस येईल जेव्हा गंगेचे पाणी कावेरीपर्यंत पोहोचेल.
तामिळनाडूमधील विद्यार्थी, शिक्षक, लेखक, पत्रकार, शेतकरी, कारागीर, महिला आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींसह, समाजाच्या विविध घटकांचे प्रतिनिधित्व करणारे सुमारे 1,400 नागरीक काशी तामिळ संगममच्या या सत्रात सहभागी होत आहेत.
***
राधिका अघोर/तुषार पवार/राजश्री आगाशे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com