गोवा, 27 नोव्हेंबर 2026
नामवंत चित्रपट निर्माते कार्तिक सुब्बराज यांनी गोव्यातील 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) "व्हॉट इफ द व्हिलन इज राईट?" (What If the Villain Is Right?) या मुलाखतीच्या सत्रात नैतिकतेची गुंतागुंत, खलनायकी वृत्तीची सामाजिक मुळे आणि पूर्वग्रहांना आव्हान देण्याची सिनेमाची क्षमता या पैलूंचा वेध घेतला. चित्रपट समीक्षक सुधीर श्रीनिवासन यांनी सूत्रसंचालन केलेल्या या सत्रात, सुब्बराज यांचे चित्रपट चांगले आणि वाईट यांतील पारंपरिक सीमारेषांना कसे आव्हान देतात याचा आढावा घेण्यात आला.
मानवी वर्तन हे परिस्थिती आणि सामाजिक अनुभवांतून घडते, असे निरीक्षण नोंदवत सुब्बराज म्हणाले, "प्रत्येकाचा मूळ पाया हा ग्रे म्हणजे कोणतीही बाजू नसलेला असतो." व्यक्ती ज्या लोकांच्या संपर्कात येतात आणि ज्या परिस्थितीतून जातात, त्यावरूनच त्या व्यक्ती चांगल्या की वाईट मानल्या जातील हे ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या 'डोरोथी' या चित्रपटाविषयी बोलताना सुब्बराज यांनी जाणीवपूर्वक वाईट कृत्य करणारी पात्रे आणि ज्यांचे हानिकारक वर्तन खोलवर रुजलेल्या सामाजिक संस्कारांमधून येते अशी पात्रे यांतील फरक स्पष्ट केला. 'व्हिसल वीरय्या' हे उघडपणे दुष्ट प्रवृत्तीचे पात्र असले, तरी पराठा दुकानाच्या मालकासारख्या व्यक्ती अधिक धोकादायक ठरू शकतात, कारण त्यांना स्वतःच्या पूर्वग्रहांची आणि चुकीच्या वागण्याची जाणीवच नसते, असे मत त्यांनी मांडले.

‘डोरोथी' या चित्रपटात नायक/नायिकेच्या मृत्यूमागे पुरुषी अहंकार आणि पुरुषसत्ताक वृत्ती या शक्ती असल्याचे दाखवले असून, एखाद्या व्यक्तीऐवजी दडपशाही करणाऱ्या मानसिकतेलाच खरा खलनायक म्हणून उभे केले आहे, असे सुब्बराज यांनी सांगितले. 'मर्क्युरी' चित्रपटाशी समांतर तुलना करताना त्यांनी एका गावाची सामूहिक मानसिकता नकारात्मक रूपात कशी चित्रित केली आहे हे स्पष्ट केले आणि व्यापक सामाजिक दृष्टिकोनातून वैयक्तिक खलनायकी कृत्ये कशी जन्माला येतात हे दाखवून दिले.
अपमान आणि उत्तरदायित्व यांवर भाष्य करताना या चित्रपट निर्मात्याने सांगितले की एखाद्याच्या अक्षमतेची थट्टा करून त्याच्यावर हसणे हे त्याला फटकारण्यापेक्षाही अधिक वेदनादायक ठरू शकते. पश्चात्ताप आणि अपराधीपणाची भावना हे देखील शिक्षेचे एक स्वरूप असू शकते, असे त्यांनी नमूद केले. एखाद्याच्या कृतीचे परिणाम नेहमीच शारीरिक इजा किंवा मृत्यूच्या स्वरूपातच दिसून यायला हवेत, असे नाही, यावरही त्यांनी भर दिला.
सिनेमामध्ये समाजावर प्रभाव टाकण्याची ताकद असते, याविषयी बोलताना सुब्बराज यांनी ‘डोरोथी’ (Dorothy) या चित्रपटाला मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादाची आठवण सांगितली. हा चित्रपट पाहिल्यानंतर काही प्रेक्षकांनी तृतीयपंथी व्यक्तींना आपुलकीने मिठी मारून त्यांच्याप्रति सहानुभूती आणि स्वीकाराची भावना व्यक्त केली. तर काही पुरुषांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत. अशा प्रतिक्रियांमुळे चित्रपट केवळ मनोरंजनाचे साधन नसून, ते सहानुभूतीची भावना वाढवू शकतात आणि सामाजिक बदलाला चालना देऊ शकतात, हा आपला विश्वास अधिक दृढ झाल्याचे ते म्हणाले. कथाकथनाच्या माध्यमातून समाजात बदल घडवून आणण्याच्या याच विचाराने ‘जिगरथंडा’ (Jigarthanda) चित्रपटाच्या निर्मितीमागील आपल्या दृष्टिकोनालाही दिशा दिली होती, असे त्यांनी पुढे सांगितले.
संपूर्ण चर्चेत सुब्बराज यांनी आपल्या चित्रपटांतील व्यक्तिरेखांकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट केला. त्यांच्या मते, कोणतेही पात्र पूर्णपणे चांगले किंवा पूर्णपणे वाईट नसते. त्यामुळे पात्रांच्या चांगल्या-वाईटपणाचा निर्णय ते प्रेक्षकांवर सोपवतात. प्रेक्षकांनी त्या पात्रांकडे आणि त्यांच्या कृतीमागील कारणांकडे स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

या सत्रातून सुब्बराज यांचा चित्रपटनिर्मितीमागील दृष्टिकोन स्पष्ट झाला. त्यांच्या मते, खलनायकत्व केवळ एखाद्या व्यक्तीपुरते मर्यादित नसते, तर त्या व्यक्तीला घडवणाऱ्या सामाजिक विचारसरणी आणि व्यवस्थांमध्येही ते दडलेले असते.
सुब्बराज यांच्या विचारांतून चांगले आणि वाईट यांविषयीच्या पारंपरिक समजुतींच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची सिनेमाची ताकद अधोरेखित झाली. अशा कथा प्रेक्षकांना आपल्या मनातील पूर्वग्रह तपासून पाहण्यास आणि समाजातील गुंतागुंतीच्या वास्तवाचा विचार करण्यास प्रवृत्त करतात. 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) ‘सीमां पलिकडल्या कथा’ या संकल्पनेशी सुब्बराज यांचा कथाकथनाचा दृष्टिकोन सुसंगत आहे. विशिष्ट सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीवर आधारित कथा नैतिकता, सहानुभूती आणि मानवी वर्तन यांविषयीचे सार्वत्रिक प्रश्न कसे उपस्थित करू शकतात, हे त्यांच्या चित्रपटांतून दिसून येते.
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/माधुरी पांगे/शैलेश पाटील/आशुतोष सावे/दर्शना राणे