गोवा, 27 नोव्हेंबर 2026
57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) इंडियन पॅनोरमा विभागात प्रदर्शित झालेला ‘पारो: वधू गुलामगिरीची अज्ञात कहाणी’ हा चित्रपट महिलांची वधू म्हणून खरेदी - विक्री करणाऱ्या आणि नेहमीच दुर्लक्षित राहिलेल्या प्रथेवर प्रकाश टाकतो. विशेषतः हरियाणातील मेवातमध्ये ही प्रथा आढळते. या भागात, विवाहासाठी विकत घेतल्या जाणाऱ्या किंवा विकल्या जाणाऱ्या महिलांसाठी ‘पारो’ हे संबोधन वापरले जाते.
एका पत्रकार परिषदेत बोलताना, अभिनेत्री आणि निर्माती तृप्ती भोईर यांनी सांगितले की, हा चित्रपट बनवण्यासाठी त्यांनी तब्बल साडेचार वर्ष संशोधन केले आहे. हा त्यांचा ऑस्करच्या यादीत स्थान मिळवणारा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या एका विलक्षण सर्जनशील प्रवासात, तृप्ती भोईर यांनी निर्माती, पटकथा लेखिका आणि नायिका अशा तिहेरी जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

चित्रपटाच्या निर्मितीस कारणीभूत ठरलेले एक आव्हानात्मक संशोधन
भारतातील वधू-गुलामगिरीच्या प्रथेवर प्रकाश टाकणाऱ्या माहितीपट आणि माध्यमांतील वृत्तांतांच्या संपर्कात आल्यावर तृप्ती भोईर यांना या चित्रपटाची कल्पना सुचली. महिलांचे प्रश्न आणि हक्कांवर आधारित चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या तृप्ती भोईर, या प्रथेशी संबंधित वास्तवामुळे अत्यंत अस्वस्थ झाल्या.
भोईर आणि त्यांच्या आईने एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने, पत्रकारांच्या वेशात या गावांना भेटी दिल्या. तिथे त्यांची भेट महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओडिशा, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि दिल्ली येथील वधू-गुलामगिरीला बळी पडलेल्या सुमारे 62-63 महिलांशी झाली.
वधू खरेदी विक्रीच्या व्यापाराची मुळे लैंगिक असमानता आणि गरिबीमध्ये रुजलेली आहेत, असे भोईर यांनी नमूद केले. ही समस्या केवळ हरियाणापुरती मर्यादित नसून, अनेक राज्यांतील महिला आणि मुली या प्रथेला बळी पडत असल्याने ही एक व्यापक राष्ट्रीय चिंता आहे, असेही त्या म्हणाल्या.
चित्रपटासाठी माहिती गोळा करताना समोर आलेली सर्वात अस्वस्थ करणारी घटना सुमारे 11 ते 13 वर्षे वयोगटातील एका मुलीशी संबंधित होती. अत्यंत कमी रकमेसाठी या मुलीची विक्री झाल्याचे वृत्त होते. या मुलीची कथा चित्रपटातील मुख्य नायिकेची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी प्रेरणादायी ठरली. ही भूमिका स्वतः तृप्ती भोईर यांनी साकारली आहे. या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून, ज्यांच्या व्यथा अनेकदा समाजासमोर येत नाहीत, अशा असंख्य महिलांनी सहन केलेल्या वेदना, असहाय्यता आणि क्रूर शोषणाचे वास्तव पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपट निर्मातीने केला आहे.
_20261127162256_c1d1d9.jpeg)
लढा सिनेमाच्या पलीकडे नेणे
या चित्रपटाचे महत्त्व केवळ कथाकथनापुरते मर्यादित नाही. तृप्ती भोईर यांनी सांगितले की, 'शेल्टर फाउंडेशन' या स्वयंसेवी संस्थेने 'वधू गुलामगिरी'ला (ब्राइड स्लेव्हरी) बळी पडलेल्या सुमारे 2,000 महिलांची माहिती संकलित केली आहे. ही माहिती सुमारे एक वर्ष आणि तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना सादर करण्यात आली होती. त्यानंतर केंद्र सरकारने एक सत्यशोधन समिती स्थापन केली आहे. “या समस्येचे निराकरण करण्यासाठी पावले उचलणाऱ्या सरकारला मी सलाम करते. हा चित्रपट बनवण्यामागे हे देखील एक कारण आहे,” असे त्या म्हणाल्या.
महिलांची तस्करी : जागतिक स्तरावरील गंभीर समस्या
भोईर यांनी असेही नमूद केले की, मुली बेपत्ता होणे आणि त्यांच्यावरील लैंगिक अत्याचार हा जगभरातील चिंतेचा विषय आहे. गेल्या 15 ते 20 वर्षांत मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसायाबाबत जागरूकता लक्षणीयरीत्या वाढली असली, तरी वधूंची खरेदी-विक्री आणि ‘वधू गुलामगिरी’ या प्रथेकडे अजूनही तुलनेने कमी लक्ष दिले जाते. जगभरातील चित्रपट महोत्सव आणि विविध संस्थांमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर झालेल्या चर्चांमुळे या विषयावर आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक जागरूकता निर्माण होण्याची आणि व्यापक चर्चा घडण्याची गरज असल्याची त्यांची धारणा अधिक दृढ झाली आहे.
‘पारो : द अनटोल्ड स्टोरी ऑफ ब्राइड स्लेव्हरी’ या चित्रपटाच्या माध्यमातून एका गंभीर सामाजिक समस्येकडे समाजाचे लक्ष वेधण्याची इच्छाही तृप्ती भोईर यांनी व्यक्त केली. हा विषय केवळ उपेक्षित वर्तुळापुरता मर्यादित न राहता मुख्य प्रवाहातील चर्चेत यावा आणि लैंगिक असमानता, वधू गुलामगिरी तसेच महिलांचे सन्मान आणि हक्क यांवर व्यापक चर्चा व्हावी, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन शुभंकर वशिष्ठ यांनी केले.
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्पलकट्टी/श्रद्धा मुखेडकर/आशुतोष सावे/दर्शना राणे