युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘फिट इंडिया संडेज ऑन सायकल’च्या 29 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या 100 व्या आवृत्तीच्या आयोजनासाठी भारत सज्ज


केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया पुण्यातून करणार या ऐतिहासिक सोहळ्याचे नेतृत्व, 50,000 सायकलपटू होणार सहभागी

माय भारतच्या सहकार्याने देशभरातील 100 महत्त्वाच्या ठिकाणी 100 भारतीय ऑलिम्पिक खेळाडू या आयोजनात होणार सहभागी

Posted On: 27 NOV 2026 4:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2026

भारताला अधिक सुदृढ आणि आरोग्यसंपन्न राष्ट्र बनवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या आवाहनानंतर डिसेंबर 2024 मध्ये फिट इंडिया संडेज ऑन सायकल या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला होता. हा उपक्रम म्हणजे सायकलिंगच्या माध्यमातून शारीरिक सुदृढतेचा प्रसार करण्यासाठी समाजातील सर्व स्तरांतील लोकांना एकत्र आणणारी मोहीम ठरली आहे, आणि आज ही मोहीम देशव्यापी चळवळ बनली आहे.

नवी दिल्लीत केवळ 250 ठिकाणे आणि 500 सहभागींसह या उपक्रमाचा प्रारंभ झाला होता. त्यानंतरच्या दोन वर्षांत संडेज ऑन सायकलने एका लोकचळवळीचे स्वरूप धारण केले आहे. या मोहिमेच्या संविधान दिनाच्या संकल्पनेवर आधारित 99 व्या पर्वामध्ये देशभरातील 26,000 पेक्षा जास्त ठिकाणी लाखो नागरिक सहभागी झाले होते.

आता ही चळवळ संडेज ऑन सायकल या आयोजनाचे 100 वे पर्व साजरे करण्यासाठी सज्ज झाली आहे. या निमित्ताने या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे. हे ऐतिहासिक पर्व #IndiaReadyForOlympics या संकल्पनेअंतर्गत आयोजित केले जाणार आहे. हे आयोजन देशभरातील ऑलिम्पिक चळवळीचा गौरव करण्यासाठी समर्पित असणार आहे.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया हे पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड इथून 100 व्या संडेज ऑन सायकल सोहळ्याचे नेतृत्व करतील. या ठिकाणी सुमारे 50,000 सायकलपटू या चळवळीत सहभागी होणार आहेत.

मेरा युवा भारत (MY Bharat - Mera Yuva Bharat) च्या सहकार्याने देशभरातील प्रत्येक जिल्ह्यातील युवा प्रतिनिधी संडेज ऑन सायकल उपक्रमाच्या 100 व्या आयोजनाचे पर्व साजरे करणार आहेत.

यासोबतच, देशभरातील 100 प्रमुख महत्त्वाच्या ठिकाणी या सोहळ्याचे आयोजन केले जाईल. भारताला अधिक सुदृढ राष्ट्र बनवण्याच्या उद्देशाने 100 भारतीय ऑलिम्पिक खेळाडू देखील ऐतिहासिक सोहळ्यात सायकल चालवण्यासाठी सहभागी होणार आहेत.

या आयोजनातून नैतिमूल्याधारित, खेळाडूंची अभिव्यक्ती तसेच महिला आणि पॅरा ॲथलीट्ससह सर्वांना समान संधी या तत्त्वांच्या आधारे आपले क्रीडा भविष्य घडवण्याच्या देशााच्या वचनबद्धतेचे दर्शन घडणार आहे. या सोबतच देशातील युवांनी खेळ आणि शारीरिक सुदृढतेला आपल्या जीवनशैलीचा भाग बनवावे, यासाठी त्यांना प्रेरणा देणे हा देखील या उपक्रमाचा उद्देश आहे.

याअंतर्गत दररोज किमान अर्धा तास शारीरिक सुदृढतेसाठी समर्पित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उद्दिष्टासोबतच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिटनेस का डोस, आधा घंटा रोज असे केलेले आवाहन देखील या चळवळीमागची एक प्रेरणा ठरले आहे.

लठ्ठपणाविरुद्धचा लढा, नशामुक्त भारत, प्रदूषणावरील उपाययोजना यांसारख्या संकल्पनांवर आधारित विशेष पर्वांच्या आयोजनाच्या माध्यमातून संडेज ऑन सायकल उपक्रमाद्वारे नागरिकांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासोबतच, पंतप्रधानांनी मांडलेल्या फिट इंडिया आणि विकसित भारत या संकल्पांच्या पूर्ततेसाठी योगदान देण्याकरता नागरिकांना प्रेरित करण्याचे उद्दिष्टही या उपक्रमाच्या आयोजनातून साध्य केले जात आहे.

सुवर्णा बेडेकर/तुषार पवार/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2342617) अभ्यागत कक्ष : 9