गोवा, 26 नोव्हेंबर 2026
श्रीहरी हरिदास दिग्दर्शित ‘अजयंते मरणम : ओरु केस स्टडी’ हा मल्याळम चित्रपट आज गोव्यातील 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) ‘इंडियन पॅनोरमा – न्यू होरायझन्स’ या विभागात प्रदर्शित करण्यात आला.
पत्र सूचना कार्यालयाने (पीआयबी – प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना हरिदास यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, महोत्सवात इतक्या मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा नव्हती, असेही त्यांनी प्रांजळपणे सांगितले.

अजयन या पात्राभोवती केंद्रित असलेला हा चित्रपट म्हणजे एक 'कॅरेक्टर स्टडी' (व्यक्तिरेखांचा अभ्यास) असल्याचे सांगत हरिदास म्हणाले की, या चित्रपटासाठी ‘मॉक्युमेंटरी’ (काल्पनिक माहितीपट) या कथनशैलीचा वापर करण्यात आला आहे. मल्याळम चित्रपटसृष्टीत ही शैली तुलनेने कमी वापरली गेली आहे. त्यामुळे चित्रपटाचे चित्रीकरण आणि निर्मिती करताना काही वेगळी आव्हाने उभी राहिली, असेही त्यांनी नमूद केले.
कथानकाविषयी माहिती देताना हरिदास म्हणाले की, अजयनची कथा आर्यन नावाच्या एका नवोदित चित्रपट निर्मात्याच्या दृष्टिकोनातून उलगडते. आर्यन हा अजयनच्या जीवनाचा आणि त्याच्या मृत्यूमागील परिस्थितीचा शोध घेतो. आर्यनची व्यक्तिरेखा साकारताना आपण स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातील काही पैलूंचा आधार घेतल्याचे हरिदास यांनी सांगितले. तसेच, स्वतःमध्ये आणि अजयनमध्येही काही साम्य असल्याचे त्यांनी मान्य केले. “आर्यनमध्ये माझी झलक दिसते आणि माझ्यामध्येही अजयनचे काही गुण आहेत,” असे ते म्हणाले.
पटकथेविषयी बोलताना हरिदास यांनी सांगितले की, पटकथेचा पहिला मसुदा त्यांनी एका आठवड्यात पूर्ण केला. त्यानंतर अंतिम पटकथा तयार करण्यासाठी जवळपास एक महिना काम केले. इतर व्यक्तींचे अनुभव मांडण्यासाठी एका मध्यवर्ती पात्राच्या माध्यमातून कथा उलगडण्याची पद्धत आपण वारंवार वापरतो, असे त्यांनी स्पष्ट केले. पात्रे आणि कथनाची रचना वेगवेगळी असली, तरी व्यक्तींभोवती कथा गुंफून त्यांचा प्रवास मांडणे आपल्याला आवडते, असेही ते म्हणाले.

हरिदास यांनी ‘अजयंते मरणम : ओरु केस स्टडी’ या चित्रपटाचे वर्णन ‘उथराम’ (Utharam) या मल्याळम चित्रपटाला वाहिलेली आदरांजली असे केले. तसेच, आपल्या या दिग्दर्शकीय प्रयत्नावर ‘उथराम’चा प्रभाव असल्याचेही त्यांनी मान्य केले.
चित्रपटाचा लक्ष्यित प्रेक्षकवर्ग आणि प्रदर्शनाच्या योजनांविषयी विचारले असता हरिदास म्हणाले की, हा चित्रपट प्रामुख्याने चित्रपट महोत्सवांमधील प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून तयार करण्यात आला आहे. सध्या पारंपरिक पद्धतीने चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यापेक्षा, अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी चित्रपट महोत्सव हे प्रभावी व्यासपीठ ठरू शकते, असा आमच्या चमुचा दृष्टिकोन आहे.
या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन गोपिका यांनी केले.
संपूर्ण पत्रकार परिषद पहा :
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/आशुतोष सावे/दर्शना राणे