गोवा, 26 नोव्हेंबर 2026
कन्नड चित्रपट निर्माते प्रदीप कुमार शेट्टी के, ज्यांना डॉ. प्रदीप केंचनूरू या नावानेही ओळखले जाते, त्यांनी आज गोव्यात पत्र सूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला संबोधित केले. 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील 'इंडियन पॅनोरमा'च्या नॉन-फीचर चित्रपट विभागात समाविष्ट असलेल्या त्यांच्या 'द हग ऑफ एम्प्टीनेस' या माहितीपटाविषयी त्यांनी यावेळी माहिती दिली. 2025 मध्ये तयार झालेला हा 20 मिनिटांचा माहितीपट स्वतःची मालमत्ता गमावल्यानंतर एका निर्जन जंगलात आपले घर वसवणाऱ्या एका व्यक्तीच्या जीवनातून आनंद, मानवी सन्मान आणि चिवटपणाचा शोध घेतो.
या चित्रपटाला या वर्षाच्या सुरुवातीला 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (मिफ्फ) प्रतिष्ठित 'फिप्रेस्की (FIPRESCI) आंतरराष्ट्रीय समीक्षक पुरस्कार' मिळाला आहे.

हा माहितीपट चंद्रशेखर यांच्या जीवनाचा वेध घेतो. कर्नाटकातील सुल्या सहकारी बँकेकडे गहाण ठेवलेली त्यांची मालमत्ता कर्जाची परतफेड न करू शकल्यामुळे 2003 मध्ये जप्त करण्यात आली होती. या कारवाईला आव्हान देत त्यांनी कायदेशीर लढा सुरू केला, जो दोन दशकांहून अधिक काळ सुरू आहे. दरम्यानच्या काळात त्यांनी जंगलातील एका निर्जन भागालाच आपले घर बनवले आणि तेथे गोळा केलेल्या वेलींपासून टोपल्या विणून व विकून ते आपला उदरनिर्वाह करत आहेत. त्यांची कथा न्याय, विस्थापन, एकाकीपणा आणि मानवी चिवटपणा या प्रश्नांना एकत्र गुंफते.
या विषयाकडे कसे आकर्षित झाले हे स्पष्ट करताना श्री शेट्टी म्हणाले की, केवळ कायदेशीर वादापेक्षा चंद्रशेखर यांच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानाने त्यांना हा माहितीपट बनवण्याची प्रेरणा दिली. घनदाट जंगल, मुसळधार पाऊस आणि वन्यजीव यांच्या सान्निध्यात, तसेच वीज आणि रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांशिवाय राहूनही चंद्रशेखर यांनी दैनंदिन जीवनात एक लय आणि जगण्याचा उद्देश शोधला आहे. आनंदाची रूपे वेगवेगळी असू शकतात आणि त्याची व्याख्या नेहमीच भौतिक सुखसोयींवरून करणे आवश्यक नसते, असे मत दिग्दर्शकांनी व्यक्त केले.
आपल्या चित्रपट निर्मितीच्या दृष्टिकोनाविषयी बोलताना श्री शेट्टी म्हणाले की, त्यांनी कायदेशीर वादाचे पारंपरिक, मुलाखतींवर आधारित सादरीकरण जाणीवपूर्वक टाळले. त्याऐवजी, हा माहितीपट एका दिवसातील घडामोडींचे निरीक्षण करतो, ज्यामुळे चंद्रशेखर यांच्या जीवनाची लय आणि जंगलाशी असलेले त्यांचे नाते पडद्यावर नैसर्गिकरीत्या उलगडत जाते.

चित्रपटाच्या शीर्षकाबाबत बोलताना श्री शेट्टी म्हणाले की, त्यांनी ग्रीक चित्रपट निर्माते योर्गोस लँथिमोस (Yorgos Lanthimos) यांच्या कलाकृतींमधून आणि मानवी अस्तित्वाच्या प्रश्नांशी असलेल्या त्यांच्या नात्यातून तात्त्विक प्रेरणा घेतली. त्यांच्या मते, हे शीर्षक इतरांना रिकाम्या वाटणाऱ्या जीवनातही अर्थ शोधण्याची शक्यता दर्शवते.
व्यवसायाने शिक्षक आणि चित्रपटप्रेमी असलेल्या श्री शेट्टी यांनी 2009 पासून एक प्रेक्षक म्हणून इफ्फीशी असलेल्या आपल्या नात्याच्या आठवणींना उजाळा दिला. स्वतंत्र चित्रपट निर्मितीच्या आव्हानांबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, हा माहितीपट 4 लाख रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला असून, एका जवळच्या मित्राने त्यांना सर्जनशील स्वातंत्र्य देऊन आर्थिक पाठबळ दिले. सामायिक सर्जनशील दृष्टीकोन महत्त्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
अलिशा मेहरोत्रा यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले.
संपूर्ण पत्रकार परिषद येथे पहा:
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्पलकट्टी/शैलेश पाटील/दर्शना राणे