Posted On:
26 NOV 2026 2:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2026
भारत सरकारच्या वित्त मंत्रालयांतर्गत, सार्वजनिक उपक्रम विभागाच्या, 'नॅशनल लँड मॉनेटायझेशन कॉर्पोरेशन लिमिटेड' (एनएलएमसी), अर्थात राष्ट्रीय भूमी मुद्रीकरण महामंडळाच्या संचालक मंडळाची 22वी बैठक काल नवी दिल्ली येथे पार पडली.
या बैठकीत मालमत्ता मुद्रीकरणाच्या प्रमुख प्रस्तावांवर, स्वतंत्र मूल्यमापन अहवालांवर, सरकार-ते-सरकार (G2G) व्यवहारांवर, एनएलएमसी च्या मालकीच्या मालमत्तांच्या मुद्रीकरणावर, अलीकडे पार पडलेल्या ई-लिलावांच्या निष्कर्षांवर आणि महामंडळाच्या संस्थात्मक बळकटीकरणासाठीच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली.
बोर्ड सदस्यांनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) यांच्याशी संबंधित सुमारे 1,300 कोटी रुपये एकत्रित मूल्याच्या नवीन मालमत्ता मुद्रीकरण आणि मूल्यांकन प्रस्तावांचा विचार केला, या प्रस्तावांवर सरकारी निर्धारित कार्यपद्धतीनुसार पुढील कार्यवाही केली जाईल. हे प्रस्ताव, चालू आर्थिक वर्षात एनएलएमसी द्वारे मालमत्तांचे मुद्रीकरण करून उभारलेल्या 9,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेव्यतिरिक्त आहेत. यामधून महामंडळाच्या मुद्रीकरण उपक्रमांची वाढती गती आणि सार्वजनिक क्षेत्रातील अतिरिक्त किंवा कमी वापरल्या जाणाऱ्या मालमत्तांचे मूल्य अनलॉक करण्यावर असलेला भारत सरकारचा सातत्यपूर्ण प्रयत्न दिसून येतो.
केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि सरकारी संस्थांच्या मालमत्तेचे मुद्रीकरण सुलभ करण्याबरोबरच, एनएलएमसी स्वतःच्या मालमत्ता पोर्टफोलिओही बाजारात आणत आहे. महामंडळाने, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांकडून क्लोजर मार्गाने अधिग्रहित केलेल्या, नवी दिल्ली आणि मुंबईमधील एनएलएमसीच्या मालकीच्या 17 निवासी मालमत्तांचे मूल्यांकन अहवाल विचारात घेतले. एनएलएमसी ने यापूर्वी प्रयागराज आणि चेन्नई येथील आपल्या निवासी मालमत्ता ई-लिलाव प्रक्रियेद्वारे बाजारात आणल्या आहेत. नवी दिल्ली आणि मुंबईतील मालमत्तांचे प्रस्तावित मुद्रीकरण, पारदर्शक आणि स्पर्धात्मक बाजार-आधारित प्रक्रियांद्वारे स्वतःच्या मालमत्ता पोर्टफोलिओमधील मूल्य उघड करण्याच्या प्रयत्नांचा आणखी एक विस्तार दर्शवते.
राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड च्या वतीने एनएलएमसी द्वारे 12 ऑक्टोबर आणि 3 नोव्हेंबर 2026 रोजी विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन ई-लिलावांच्या यशस्वी निकालांबाबतही मंडळाला माहिती देण्यात आली. दोन ई-लिलावांच्या माध्यमातून 264 भूखंडांसाठी एकूण 584.40 कोटी रुपयांची सर्वोच्च बोली (H1 bid value) प्राप्त झाली. एनएलएमसी च्या पहिल्या संपूर्ण ई-लिलाव उपक्रमातील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. संचालक मंडळाने एनएलएमसी चे संस्थात्मक बळकटीकरण आणि संघटनात्मक क्षमतांमध्ये सुधारणा करण्याच्या उपाययोजनांवर देखील चर्चा केली, यामुळे त्याची वाढती कार्यक्षमता आणि वाढत्या मालमत्ता मोनेटायझेशन उपायांना समर्थन मिळेल.
मुद्रीकरण उपक्रमांच्या वाढत्या पोर्टफोलिओसह, एनएलएमसी मजबूत मूल्यांकन चौकट, पारदर्शक आणि स्पर्धात्मक लिलाव, संरचित व्यवहार यंत्रणा आणि प्रभावी आंतर-मंत्रालयीन समन्वयाच्या माध्यमातून भारत सरकारचे मालमत्ता मुद्रीकरण उद्दिष्ट पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
एनएलएमसी सार्वजनिक क्षेत्रातील अतिरिक्त जमीन आणि इमारतींची आर्थिक क्षमता अधिकाधिक खुली करण्यासाठी, त्यांचा उत्पादक वापर सुलभ करण्यासाठी आणि सरकारच्या व्यापक आर्थिक विकास उद्दिष्टांमध्ये योगदान देण्यासाठी वचनबद्ध आहे.
एनएलएमसी विषयी
नॅशनल लँड मोनेटायझेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएलएमसी) ही भारत सरकारची पूर्ण मालकीची संस्था असून, सार्वजनिक उपक्रम विभाग, वित्त मंत्रालयाच्या अधीन आहे. सीपीएसई आणि इतर सरकारी संस्थांच्या अतिरिक्त जमिनी आणि बांधकाम मालमत्तेच्या मुद्रीकरणासाठी तिची स्थापना करण्यात आली.
वेबसाईट: https://nlmc.dpe.gov.in
नितीन फुल्लुके/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai