गोवा, 25 नोव्हेंबर 2026
प्रेक्षकांना हसवणे हे एक आव्हानात्मक सर्जनशील कार्य आहे, असे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त चित्रपटनिर्माते अनिल रविपुडी यांनी सांगितले. माना शंकरा वरा प्रसाद गारू या त्यांच्या चित्रपटानिमित्त गोवा येथे सुरु असलेल्या 57 व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. तेलगु भाषेतील या चित्रपटाचा कालावधी 164 मिनिटांचा असून इंडियन पॅनोरमा विभागा अंतर्गत मुख्य चित्रपट विभागात प्रदर्शित केल्या जाणाऱ्या पाच चित्रपटांमध्ये त्याचा समावेश आहे. दिग्दर्शकासोबत निर्माते साहू गरापती आणि के. सुष्मिता आणि अभिनेत्री थरीन ट्रेसा उपस्थित होत्या.
विनोदी चित्रपट हे नेहमीच गांभीर्याने करण्याचे कार्य आहे असे सांगताना रविपुडी यांनी विनोदी लेखन करताना कौटुंबिक भावभावना आणि चिरंजीवी यांच्यासारख्या सुपरस्टार कडून असलेल्या अपेक्षा यांचे संतुलन राखण्यातील आव्हानांबाबत सांगितले. प्रेक्षकांकडून कोणत्या विनोदाला प्रतिसाद मिळेल, याचा अंदाज लावणे अवघड असते, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. आपल्या लेखकांच्या टीमला याचे श्रेय देताना दिग्दर्शक म्हणाले की सर्व वयोगटातील प्रेक्षकांना कथानक आवडेल अशा प्रकारे ते निवडण्याचा आमचा प्रयत्न असतो.

अनिल रविपुडी लिखित आणि दिग्दर्शित माना शंकरा वरा प्रसाद गारू हा चित्रपट एका राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्याच्या जीवनावर असून आपल्या कामाप्रती असलेल्या निष्ठेमुळे तो आपली पत्नी आणि मुलांपासून दुरावतो. सहा वर्षांनंतर तो त्यांच्याच शाळेत पद स्वीकारून त्यांच्याशी पुन्हा नाते जोडण्याचा प्रयत्न करतो. कौटुंबिक भावनिकतेची विनोद आणि अॅक्शन यांच्याशी सांगड घालुन हा चित्रपट व्यावसायिक कर्तव्य आणि वैयक्तिक नातेसंबंध यांच्यातील ताण तसेच सलोख्याच्या शक्यतेचा शोध घेतो.
चिरंजीवी यांना दिग्दर्शन करण्याच्या आपल्या अनुभवाविषयी बोलताना त्यांनी या विख्यात अभिनेत्याचे चित्रपट बघतच आपण मोठे झालो असे सांगितले. चिरंजीवी यांनी आपल्या कारकिर्दीत केलेल्या वैविध्यपूर्ण भूमिकांचा आलेख माहित असल्याने आपल्याला एक साधी, कौटुंबिक कथा तयार करण्यास मदत झाली. या कथेतून चिरंजीवी यांची खास अभिनयशैली आणि त्यांची वैशिष्ट्यपूर्ण ताकद प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर मांडता आली, असे ते म्हणाले.
संक्रांतीच्या सुमारास चित्रपट प्रदर्शित करण्यामागील कारण स्पष्ट करताना दिग्दर्शक म्हणाले की, सणासुदीचा काळ हा कौटुंबिक मनोरंजनपर चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी अनुकूल असतो. या काळात कुटुंबातील सदस्य एकत्र येतात आणि चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात जातात. दैनंदिन जीवनातील ताणतणावांपासून चित्रपट प्रेक्षकांना आवश्यक असलेला विरंगुळा देतात, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे, हीच असे चित्रपट बनवत राहण्याची आपल्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा असल्याचेही त्यांनी सांगितले.

चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या कॅथरीन ट्रेसा हिने ज्येष्ठ अभिनेत्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप काही शिकवणारा ठरल्याचे सांगितले. गंभीर भूमिकांनंतर हलक्याफुलक्या भूमिका साकारण्याबद्दल बोलताना तिने अभिनयातील बारकावे आणि दिग्दर्शकाचा दृष्टिकोन समजून घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. व्यावसायिक मनोरंजनपर चित्रपटाच्या माध्यमातून अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची आपली इच्छा होती. त्यामुळे या चित्रपटाची इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाल्याचा आनंद असल्याचेही तिने सांगितले.
चित्रपट महोत्सवांमध्ये मुख्य प्रवाहातील चित्रपटांनाही मान्यता मिळत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना रविपुडी यांनी विविध प्रकारच्या चित्रपटांना स्थान देण्याच्या परीक्षक मंडळाच्या (ज्युरी) प्रयत्नांचे कौतुक केले. चित्रपट महोत्सवांमध्ये कलात्मक आणि तांत्रिक उत्कृष्टतेचा गौरव करण्याबरोबरच, मोठ्या प्रेक्षकवर्गाला आकर्षित करणाऱ्या आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरलेल्या चित्रपटांचीही दखल घेतली जाऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.
इफ्फीमध्ये या चित्रपटाचा समावेश झाल्यामुळे वैविध्यपूर्ण चित्रपट परंपरां सोबतच लोकप्रिय चित्रपटांनाही महोत्सवात महत्त्वाचे स्थान असल्याचे अधोरेखित होते. विनोद, भावना आणि सामायिक अनुभवांच्या माध्यमातून कुटुंबांना एकत्र आणणाऱ्या कथांचाही या महोत्सवात सन्मान होतो, असे ही ते म्हणाले.
या सत्राचे सूत्रसंचालन स्वाती अग्रवाल यांनी केले.
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्पलकट्टी/भक्ती सोनटक्के/आशुतोष सावे/दर्शना राणे