57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

“गंगेने समृद्ध केलेले हजारो वर्षांचे जिवंत अनुभव”: इफ्फी 2026 मध्ये ‘बनारस’ साठी भरत बाला आणि ए. आर. रहमान पुन्हा एकत्र


संगीत, आठवणी आणि वारशाची भावस्पर्शी अशी वडील आणि मुलीची, गंगेच्या तीरावर घडणारी कथा ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात प्रथमच भारतात प्रदर्शित

नेहमीच्या चौकटीपलीकडे: ‘बनारस’ साठी रहमान यांचा ‘देव गंधर्व’ सारख्या दुर्मिळ रागांचा वापर

Posted On: 22 NOV 2026 7:29PMby PIB MumbaiRelease ID: 2340109Views: 3

गोवा, 22 नोव्‍हेंबर 2026

 

गोवा येथे सुरू असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (इफ्फी - IFFI) 'इंडियन पॅनोरमा' विभागासाठी निवड झालेल्या 'बनारस' या पिता-पुत्रीच्या नाट्यपटासाठी चित्रपट निर्माते भरत बाला आणि संगीतकार ए. आर. रहमान पुन्हा एकत्र आले आहेत. या महोत्सवात या चित्रपटाचा भारतीय प्रीमियर पार पडणार आहे. या चित्रपटात अभिषेक बॅनर्जी, शहाना गोस्वामी, नीरज कबी, छाया कदम, इंदिरा तिवारी आणि अँथनीथासन जेसुथासन यांच्यासह इतर कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

भारतीय शास्त्रीय संगीताच्या सांस्कृतिक आणि सांगीतिक पार्श्वभूमीवर आधारलेला 'बनारस' हा चित्रपट वडील आणि मुलगी यांच्यातील नातेसंबंध, सांगीतिक वारशाचे संक्रमण आणि पिढ्यांमधले बंध यावर आधारित आहे. दिग्दर्शक भरत बाला यांनी ज्याचे वर्णन "गंगेचे चिरंतन चैतन्य" असे केले आहे, त्या पार्श्वभूमीवर ही कथा उलगडत जाते.

संगीतकार ए.आर.रहमान यांनी चित्रपटाच्या संगीताबद्दल माहिती दिली. आपल्या संपूर्ण सांगितिक प्रवासात हिंदुस्तानी आणि कर्नाटक या दोन्ही प्रकारच्या भारतीय शास्त्रीय संगीताने नेहमीच प्रेरणा दिली असल्याचे त्यांनी सांगितले. राग आणि त्यांच्याशी जोडलेल्या भावना आजही आपल्या सांगीतिक अभिव्यक्तीला आकार देत असल्याचे ते म्हणाले.

चित्रपटाच्या पार्श्वसंगीताबद्दल आपली भूमिका अधिक स्पष्ट करताना रहमान यांनी, चित्रपटातील रचनांमध्ये विविध रागांचा समावेश केल्याचे सांगितले. भारताची सांस्कृतिक विविधता आपल्या सांगीतिक शोधप्रवासाला सतत प्रेरणा देत असते, असे ते म्हणाले. "मला प्रत्येक संस्कृतीचा आनंद घेता येतो," असेही त्यांनी आवर्जून सांगितले. पंजाबी भाषेतील ओजस्वीपणापासून ते बंगाली भाषेतील गोडव्यापर्यंत प्रत्येक भाषेची स्वतःची एक वेगळी चव असते, असे त्यांनी सांगितले. आपल्या संगीतात ते अनेकदा विविध भाषा आणि त्यांच्या संस्कृतीचा सुरेख संगम घडवून आणतात.

'मरियन' (Maryan) चित्रपटानंतर प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा पूर्ण लांबीच्या कथापटाकडे (फीचर फिल्म) वळण्याबाबत भरत बाला यांनी आपले विचार मांडले. या मधल्या काळात आपण अनेक लघुपटांवर काम केल्याचे त्यांनी नमूद केले. जेव्हा एखादी गोष्ट लोकांसमोर आणणे गरजेचे आहे असे आपल्याला वाटते, तेव्हा त्यातून साकार होणारा कथापट हा आपल्या सर्जनशील प्रक्रियेचाच एक पुढचा टप्पा असतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.

चित्रपटांमध्ये बनारस शहराचे अनेक प्रकारे चित्रण करण्यात आले असले, तरी या शहरात आजही शोध घेण्यासारखे बरेच काही आहे, असे बाला यांनी सांगितले. "गंगेच्या पाण्याचे पोषण आणि हजारो वर्षांच्या अनुभवातून घडलेले ठिकाण” असे त्यांनी या शहराचे वर्णन केले.

छायाचित्रण दिग्दर्शक मार्क कोनिंक्‍क्स यांनी सांगितले की, प्रकाशयोजना, कॅमेऱ्याचे ऍन्गल, फ्रेमिंग आणि कंपोझिशन यांच्या माध्यमातून कलाकारांच्या चेहऱ्यावरील भाव टिपणे, हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असते. प्रेक्षकांनी चित्रपटाकडे बाहेरून केवळ निरीक्षक म्हणून न पाहता, त्याचा एक भाग असल्याचा अनुभव घ्यावा, असा आपला प्रयत्न असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“कॅमेरा हा संगीतासारखा असतो,” असे सांगत त्यांनी रंग आणि विविध दृश्य घटकांच्या संयोजनातून दृश्यात्मक लय कशी निर्माण केली जाते, हे स्पष्ट केले. “रंगांचा अतिवापर केल्यास त्यांचे सौंदर्य नष्ट होते,” असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. प्रेक्षकांचे लक्ष विशिष्ट दृश्यांकडे वेधण्यासाठी आणि त्यांच्या मनात भावना जागृत करण्यासाठी रंगांचा निवडक वापर करणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. कुंभमेळ्याचे प्रत्यक्ष चित्रीकरण करताना ही पद्धत विशेष महत्त्वाची ठरली, असे त्यांनी सांगितले.

अभिनेते नीरज काबी यांनी आपण साकारलेल्या व्यक्तिरेखांचा आपल्या आयुष्यावर दीर्घकाळ टिकणारा प्रभाव पडत असल्याचे सांगितले. या व्यक्तिरेखा अनेकदा आपल्या खऱ्या आयुष्यातही मिसळून जातात आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनतात, असे ते म्हणाले. ‘बनारस’ चित्रपटातील त्यांची व्यक्तिरेखा स्मृतिभ्रंशाने ग्रस्त आहे. ही भूमिका साकारताना स्वतःच्या बालपणाच्या आठवणी जागृत झाल्याचे त्यांनी सांगितले. त्या अवस्थेत भविष्याचे अस्तित्व नसते आणि वर्तमानही अनुपस्थित असते, असे त्यांनी नमूद केले.

अभिनेते अभिषेक बॅनर्जी यांनी नियंत्रित स्टुडिओ सेटच्या तुलनेत महाकुंभमेळ्यात प्रत्यक्ष गर्दीत चित्रीकरण करताना आलेल्या आव्हानांबद्दल आणि उत्स्फूर्ततेबद्दल सांगितले. मोठ्या जनसमुदायामध्ये अभिनय करताना बरीच अनिश्चिततता असते. त्यामुळे अशा वेळी अभिनेता आणि दिग्दर्शक यांच्यातील परस्पर विश्वास अत्यंत महत्त्वाचा ठरतो, हे त्यांनी स्पष्ट केले. या अनुभवामुळे महाविद्यालयीन जीवनातील पथनाट्यांच्या दिवसांच्या आठवणी ताज्या झाल्याचेही त्यांनी सांगितले. या चित्रीकरणाचे वर्णन ‘स्ट्रीट सिनेमा’ असे करताना, या अनुभवाने अभिनेता म्हणून आणि एक व्यक्ती म्हणूनही आपल्यात परिवर्तन घडवून आणल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या संगीताचा समावेश असलेले ‘बनारस’ आणि ‘रामायण’ हे दोन चित्रपट 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित होत असल्याचा विशेष आनंद होत असल्याचे रहमान यांनी सांगितले. महोत्सवात या चित्रपटांच्या प्रदर्शनातून विविध प्रकारच्या चित्रपट कथनांचा गौरव होत असून, भारताच्या कथाकथन परंपरेत संगीताचे महत्त्वपूर्ण आणि चिरस्थायी योगदानही अधोरेखित होत असल्याचे त्यांनी सांगितले.

या सत्राचे सूत्रसंचालन महेश कुमार यांनी केले.

पत्रकार परिषदेचा व्हिडिओ येथे पाहा :

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48

 

* * *

पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/वैभवी जोशी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2340109
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026