गोवा, 22 नोव्हेंबर 2026
समजा एका लहान मुलीने ठरवले की काही परंपरांचे केवळ पालन करण्यापेक्षा त्या नृत्यासह साजऱ्या करायला हव्या, तर?जेथे वाघाचे पट्टे पारंपारिकरीत्या पुरुषांच्या अंगावर काढले जातात अशा जगात शिरुन तिने प्रश्न विचारला, “मी असे का नको करू?” तर?
ओदिशामधील दूरस्थ खेड्यात राहणाऱ्या आणि बाघा नाच म्हणजेच वाघनृत्य कलाकार बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या, मिनी नावाच्या एका 11 वर्षीय लहान मुलीची ही कथा आहे. दीर्घकाळापासून पुरुषांचे वर्चस्व असलेला हा पारंपरिक वाघ नृत्याचा कलाप्रकार ही तेथील सांस्कृतिक प्रथा आहे आणि मिनीला स्वतःच्या अटींवर हा कलाप्रकार स्वीकारण्याची इच्छा आहे. तिच्यासाठी, केवळ हे नृत्य करणे हीच तिची आकांक्षा नाही तर स्वप्न बघण्याचे, प्रथांना आव्हान देणे आणि स्वतःची आवड जोपासणे यांचे स्वातंत्र्य मिळावे अशी तिची इच्छा आहे.
_20261122181344_8a04a9.jpeg)
सत्य घटनांवर आधारित असलेल्या ‘बाघुनी (वाघासारखे नृत्य)’या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट निर्माते जितेंद्र मिश्रा यांनी केले असून हा चित्रपट खोलवर रुजलेल्या लिंगाधारित पूर्वग्रहांना आव्हान देणाऱ्या लहान मुलीच्या निर्धाराची कहाणी सांगतो.
ओदिशाच्या रंगीबेरंगी लोक परंपरांच्या पार्श्वभूमीवर घडणारा हा चित्रपट लिंगभेदाचे अडथळे, सामाजिक वळण, सांस्कृतिक ओळख आणि प्रस्थापित नियमांवर प्रश्न उपस्थित करण्याचे धैर्य यांचा मागोवा घेतो. गोव्यात सध्या सुरु असलेल्या 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये (इफ्फी) आज, दिनांक 22 नोव्हेंबर 2026 रोजी या चित्रपटाचा दिमाखदार प्रीमियर सादर झाला.
यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थितांना संबोधित करताना, जितेंद्र मिश्रा यांनी चित्रपट सृष्टीतील सुमारे दोन दशकांच्या कारकिर्दीनंतर दिग्दर्शकीय पदार्पण करून देणारा चित्रपट म्हणून, ‘बाघुनी’ या चित्रपटाला अगदी वैयक्तिक स्तरावरील महत्त्वाचा टप्पा संबोधले. गेली अनेक वर्षे इफ्फी आणि भारतीय पॅनोरमा जोडले गेल्याची माहिती देत त्यांनी इफ्फी, एनएफडीसी आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांनी दिलेल्या पाठीम्ब्याबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

'बाघा नाचा’ या पारंपरिक लोकनृत्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटातून स्त्री-पुरुष समानता, धैर्य आणि मानवी जिद्दीचा गौरव करण्यात आला आहे. आपल्या कुटुंबातील सात कर्तृत्ववान महिलांकडून या चित्रपटाची प्रेरणा मिळाल्याचे दिग्दर्शक मिश्रा यांनी सांगितले. मुलींना समान संधी दिल्यास त्या अपेक्षेपलीकडे जाऊन यश संपादन करू शकतात, यावर त्यांनी भर दिला. ओडिशातील बेरहामपूर येथे सखोल संशोधन करून हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. राज्यभरात ऑडिशनद्वारे निवडलेल्या स्थानिक मुलांचाही या चित्रपटात समावेश करण्यात आला असून, अनुभवी अभिनेते सब्यसाची मिश्रा यांच्यासोबत त्यांना अनेक महिने प्रशिक्षण देण्यात आले आहे.
प्रभावी कथाकथन आणि ओडिशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा यांचा अनोखा संगम ‘बाघुनी’ या चित्रपटात पाहायला मिळतो. पारंपरिक वाघनृत्य ‘बाघा नाचा’ आणि वाघिणीला उद्देशून वापरला जाणारा ‘बाघुनी’ हा शब्द यांतील विरोधाभास चित्रपटाच्या कथानकाचा केंद्रबिंदू असून, त्यामुळे कथेला अधिक खोली आणि उत्कंठा प्राप्त झाली आहे, असे प्रसिद्ध ओडिया अभिनेते सब्यसाची मिश्रा यांनी सांगितले.

पारंपरिक ‘बाघा नाचा’ कलाकाराची भूमिका साकारण्यासाठी सब्यसाची मिश्रा यांनी 30 किलोग्रॅम वजन कमी केले. भूमिकेत वास्तवता आणण्यासाठी त्यांनी कठोर शारीरिक मेहनतीबरोबरच आध्यात्मिक तयारीही केली. या लोककलेशी संबंधित कठीण विधी आणि शरीरावर बारकाईने रंगकाम करण्यासाठी लागणारे अनेक तास, यांचाही त्यांनी उल्लेख केला. या लोककलेत कलाकाराला माँ भगबती बुडी ठाकुरानी देवीचे स्वरूप मानून त्यांचा आदर केला जातो. ‘बाघुनी’ चित्रपटाला जागतिक स्तरावरही प्रेक्षकांची पसंती मिळू शकते आणि प्रादेशिक ओडिया चित्रपटसृष्टीसाठी तो नवा मापदंड निर्माण करु शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चित्रपटाचा संदेश जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहनही त्यांनी प्रसारमाध्यमांना केले.
बाघुनी चित्रपटाचा विशेष प्रीमियर आयोजित करून सन्मान केल्याबद्दल आणि ओडिशाचा सांस्कृतिक वारसा आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल निर्माते पार्थ पांडा यांनी इफ्फी, एनएफडीसी आणि भारत सरकारचे आभार मानले.
मिनीच्या प्रवासातून ‘बाघुनी’ हा चित्रपट स्थानिक परंपरेला व्यापक जागतिक चर्चेशी जोडतो. धैर्य, स्वतःची ओळख आणि रूढ संकेतांना आव्हान देण्याचे स्वातंत्र्य या विषयांवर हा चित्रपट भाष्य करतो.
इफ्फी 2026 ची ‘सीमांच्या पलीकडच्या कथा ही संकल्पना या चित्रपटातून अधोरेखित होते. स्थानिक कथा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे आणि जगाच्या एका कोपऱ्यातील कथा दुसऱ्या कोपऱ्यातील लोकांसाठीही अर्थपूर्ण बनवण्याचे सामर्थ्य चित्रपट माध्यमात आहे, हे यातून स्पष्ट होते.
या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन निखिता ए. एस. यांनी केले.
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्पलकट्टी/संजना चिटणीस/राज दळेकर/दर्शना राणे