57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

'बिकमिंग' हा प्रत्येक क्षणी सुरु असलेला एक आध्यात्मिक प्रवास: इफ्फी 57 मध्ये दिग्दर्शक लीना यादव यांचे प्रतिपादन


भाषा हे संवादाच्या अनेक साधनांपैकी एक साधन आहे; भावना शब्दांच्या पलीकडे पोहोचतात, असे मत भारतीय पॅनोरमामध्ये सादर झालेल्या पहिल्या नॉन-फिचर चित्रपटाच्या निर्मात्यांनी केले व्यक्त

Posted On: 21 NOV 2026 8:13PMby PIB MumbaiRelease ID: 2339840Views: 14

गोवा, 21 नोव्‍हेंबर 2026

 

भाषा हे संवादाच्या अनेक साधनांपैकी एक साधन आहे, तर मानवी भावना भाषिक सीमा ओलांडून पलीकडे पोहोचतात, असे 'बिकमिंग' या लडाखी नॉन-फिचर चित्रपटाच्या दिग्दर्शक लीना यादव यांनी सांगितले. गोव्यात आयोजित 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) अनुषंगाने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. भारतीय पॅनोरमा 2026 मध्ये पहिल्या नॉन-फिचर चित्रपटाच्या सादरीकरणासाठी निवड झालेला 'बिकमिंग' हा चित्रपट लडाखचे सांस्कृतिक परिदृश्य आणि परंपरा यांच्या माध्यमातून आध्यात्मिक प्रवासाचा शोध घेतो.

स्थानिक, बिगर-व्यावसायिक कलाकारांना दिग्दर्शित करण्याच्या अनुभवावर प्रकाश टाकत लीना यादव म्हणाल्या की त्यांनी या कलाकारांशी मुख्यतः हिंदी भाषेतच संवाद साधला, मात्र त्या कलाकारांपैकी अनेक जण लडाखी भाषेत बोलत होते आणि त्यांना हिंदी भाषेची मर्यादित जाण होती. भाषेचा अडसर असूनही कलाकारांना त्यांची पात्रे समजून घेणे आणि त्यांच्या भाव-भावना व्यक्त करणे शक्य होत होते, असे त्यांनी सांगितले. या अनुभवामुळे ऐकून घेण्याचे, संवेदनशीलतेचे तसेच शब्दांपलीकडे संवाद साधण्याचे महत्त्व अधिक तीव्रतेने जाणवले, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

लीना यादव यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला 'बिकमिंग' हा चित्रपट लडाखमधील अग्याल या किशोरावस्थेतील मुलाची कथा सांगतो. या मुलाचे निसर्गाशी असलेले असामान्य नाते आणि दुसऱ्याच एखाद्या जन्मातून आल्या असाव्यात अशा आठवणी त्याला लीकीर मठाच्या दिशेने घेऊन जातात. जेव्हा तो आदरणीय रीम्पोचे यांच्याशी संबंधित वस्तू ओळखतो, तेव्हा तेथील भिक्षुंना अशी खात्री वाटू लागते की हा मुलगा म्हणजे त्यांच्या गुरूचा पुनर्जन्म असू शकतो. हा चित्रपट पुनर्जन्म, ओळख, दैव तसेच भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्यातील नाते यांसारख्या संकल्पनांचा शोध घेतो.

एक आध्यात्मिक अनुभव असे या चित्रपटाचे वर्णन करत लीना यादव यांनी स्पष्ट केले की 'बिकमिंग' या चित्रपटाची संकल्पना त्यातील मध्यवर्ती पात्रांच्या प्रवासाच्या पलीकडे विस्तारते. हा चित्रपट मानवी जीवनातील परिवर्तनाच्या अशा सातत्यपूर्ण प्रक्रियेचे प्रतिनिधित्व करतो जी कोणत्याही निश्चित शेवटापर्यत पोहोचत नाही. यादव यांनी चित्रपटाच्या कथेवर आणि दृश्य भाषेवर बौद्ध तत्वज्ञानाच्या आणि लडाखच्या वैशिष्ट्यपूर्ण भूप्रदेशांच्या प्रभावाविषयी देखील सांगितले.

या प्रकल्पाच्या प्रारंभाबद्दल सांगताना, निर्माते आणि छायाचित्रकार असीम बजाज म्हणाले की आव्हानात्मक परिस्थितीत कॅमेरा उपकरणांची चाचणी घेण्याच्या संधीतून या चित्रपटाचा जन्म झाला. केवळ उपकरणांची उपयुक्तता प्रमाणित करण्याऐवजी त्यांनी लडाखमध्ये एक लघुपट बनवण्याचा प्रस्ताव मांडला. त्यांनी यादव यांच्यासमोर 'बिकमिंग' हे शीर्षक, बौद्ध धर्माचे विश्व आणि चित्रीकरणाचे ठिकाण म्हणून लडाख, असे तीन प्रमुख मुद्दे ठेवले. जसजसे चित्रपट निर्माते त्या ठिकाणाला आणि तिथे भेटलेल्या लोकांना समजून घेत गेले, तसतसे हे घटक हळूहळू एका कथेत विकसित झाले.

चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल बोलताना निर्मात्यांनी सांगितले की लडाखबाहेरील 19 सदस्यांच्या एका छोट्या चमूने स्थानिक सहकाऱ्यांसोबत मिळून पटकथा विकसित केली, हौशी कलाकारांची निवड केली आणि 15 दिवसांत चित्रीकरण पूर्ण केले. यामध्ये उंचावर असलेल्या ठिकाणच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी लागणारा कालावधीही समाविष्ट होता. या प्रक्रियेत परिस्थितीनुसार लवचिकतेची आवश्यकता होती. चित्रपटाची कथा विकसित करण्यात चित्रिकरणाचा परिसर आणि स्थानिक लोकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे यादव यांनी नमूद केले.

चित्रपटात कोणतेही व्हिज्युअल इफेक्ट्स वापरले नाहीत, त्याऐवजी नैसर्गिक भूदृश्य आणि प्रत्यक्ष चित्रीकरणावर भर देण्यात आला आहे, असे बजाज यांनी स्पष्ट केले. तापमान सुमारे उणे 20 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरल्यामुळे चित्रपटाच्या चमूला मोठ्या शारीरिक आव्हानांचा सामना करावा लागला. अशा वातावरणातही चित्रीकरण उपकरणांनी उत्तम केल्याचे त्यांनी सांगितले. निसर्गाच्या विशालतेपुढे आपण किती खुजे आहोत हे जाणवल्याचे आणि लडाखच्या लोकांनी दाखवलेली आपुलकी, पाहुणचाराने भारावून गेल्याचे दोन्ही चित्रपट निर्मात्यांनी सांगितले.

चित्रपट निर्मात्यांनी पुनर्जन्माशी संबंधित स्थानिक कथा आणि बौद्ध परंपरांवरही भाष्य केले. या कथांमधून चित्रपटाची पार्श्वभूमी असलेल्या श्रद्धा आणि सांस्कृतिक संदर्भ समजून घेण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.

चित्रपटाच्या पोस्टरबद्दल एक मनोरंजक तपशील सांगताना यादव यांनी आठवण करून दिली की पोस्टरवर पाठमोऱ्या दिसणाऱ्या आणि अंगावर लाल वस्त्र घेतलेल्या एका लहान मुलाचे लक्षवेधी छायाचित्र चित्रीकरण दरम्यान घडलेल्या अनियोजित प्रसंगातून साकारली आहे. वस्त्र, सावल्या आणि सभोवतालच्या प्रकाशाच्या संयोगाने हे छायाचित्र तयार झाले. ‘बिकमिंग’ या चित्रपटाचा आत्मा या छायाचित्रातून व्यक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.  

इफ्फी 2026 मधील 'इंडियन पॅनोरमा'चा उद्घाटनाचा कथाबाह्य चित्रपट म्हणून या चित्रपटाची निवड झाल्याबद्दल यादव आणि बजाज यांनी आभार व्यक्त केले. मानवी नातेसंबंध, सांस्कृतिक परंपरा आणि लडाखचे नैसर्गिक सौंदर्य यांच्या प्रभावातून साकारलेल्या या चित्रपटाचा प्रवास प्रेक्षकांना भाषिक आणि भौगोलिक सीमांच्या पलीकडे जाणाऱ्या एका कथानुभावाची संधी देणारा आहे. 

या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन किरण मुरली यांनी केले.

संपूर्ण पत्रकार परिषद येथे पहा:

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

 

* * *

पीआयबी मुंबई | माधुरी पांगे/संजना चिटणीस/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2339840
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026