57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

चित्रपटाच्या पडद्यापलीकडे: इफ्फी 2026 मध्ये भारताचा चित्रपटीय वारसा मुद्रित स्वरुपात प्रसारित


केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय सचिवांच्या हस्ते दोन प्रकाशनांचे अनावरण, ही पुस्तके चित्रपटीय विचार, सर्जनशील प्रवास आणि चित्रपट निर्माते अवतार कौल यांचा अधुरा वारसा यांच्यावर आधारित

Posted On: 21 NOV 2026 6:02PMby PIB MumbaiRelease ID: 2339702Views: 8

गोवा, 21 नोव्‍हेंबर 2026

 

चित्रपट पिढ्यानपिढ्यांच्या कल्पनाशक्तीला कवेत घेतो, समाजाचे प्रतिबिंब दाखवतो, आठवणी जतन करतो आणि सांस्कृतिक ओळखीला आकार देतो. पडद्यावरील चालत्या-बोलत्या प्रतिमांच्या पलीकडे, कल्पनांचे, सर्जनशील प्रक्रियांचे तसेच चित्रपटीय परिदृष्याला आकार देणाऱ्या प्रवासांचे दस्तावेजीकरण करण्यात पुस्तके तितकीच महत्त्वाची भूमिका बजावतात. हे महत्त्व लक्षात घेत, प्रकाशन विभागाने 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) 2026 मध्ये दोन पुस्तकांचे अनावरण करून आपल्या देशाच्या चित्रपटीय वारशाचे विविध आयाम साजरे केले.

याप्रसंगी बोलताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय सचिव चंचल कुमार यांनी चित्रपटनिर्मितीच्या मागे असलेल्या सर्जक प्रवासांचे दस्तावेजीकरण करण्याचे तसेच भावी पिढ्यांसाठी भारताच्या समृध्द चित्रपटीय वारशाचे जतन करण्याचे महत्त्व ठळकपणे मांडले. 

चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून समाज, विविध पिढ्यांची भावना तसेच विकसित होत जाणाऱ्या कल्पनांचे प्रतिबिंब आहे असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. “चित्रपट आपल्याला गोष्ट सांगतात. चित्रपटांच्या निर्मितीवर आधारित पुस्तके आपल्याला या कथा जिवंत कशा होतात ते समजून घ्यायला मदत करतात,” ते म्हणाले. ही प्रकाशने आपल्याला कशा प्रकारे चित्रपट निर्मात्यांचे अनुभव, चित्रपट निर्मिती प्रक्रियेतील विविध तंत्रे तसेच भारतीय चित्रपटांना आकार देणाऱ्या कल्पना यांच्याविषयी मूल्यवान अंतर्दृष्टी देतात हे देखील त्यांनी अधोरेखित केले. 

या कार्यक्रमात, राजेंद्र भट्ट यांनी लिहिलेले ‘सिनेमा:विविध आयाम’ आणि विनोद कौल यांनी लिहिलेले ‘अवतार कौल:द (इन)कम्प्लीट स्टोरी’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यातील पहिले पुस्तक चित्रपटांविषयीचे महत्त्वाचे लेख आणि दृष्टीकोन एकत्र करून हिंदी भाषिक वाचकांसाठी ते उपलब्ध करून देते तर दुसरे पुस्तक चित्रपट निर्माते अवतार कौल यांचे जीवन आणि अपूर्ण राहिलेला सर्जनशील वारसा यांचे दस्तावेजीकरण करून देते.

‘सिनेमा:विविध आयाम’ या पुस्तकाविषयी बोलताना चंचल कुमार यांनी चित्रपट निर्माते आणि अभ्यासकांनी लिहिलेल्या आणि गाजलेले चित्रपट, चित्रपट निर्मिती तसेच जागतिक चित्रपटांविषयी महत्त्वाची माहिती देणाऱ्या लेखांच्या संग्रहाची प्रशंसा केली. हे कार्य हिंदी भाषिक वाचकांसाठी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या प्रयत्नांची त्यांनी विशेष प्रशंसा केली. ‘अवतार कौल:द (इन)कम्प्लीट स्टोरी’ या पुस्तकासंदर्भात बोलताना त्यांनी चित्रपट निर्माते अवतार कौल यांच्या वारशाचे स्मरण केले. अवतार कौल यांनी 1974 मध्ये निर्माण केलेला 27 डाऊन हा एकमेव चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील नव्या लहरींच्या काळातील महत्त्वाचा टप्पा ठरला अशी आठवण चंचल कुमार यांनी सांगितली.

प्रकाशन विभाग, राजेंद्र भट्ट, विनोद कौल आणि प्रकाशनाशी संबंधित सर्वांचे सचिवांनी अभिनंदन केले. ही पुस्तके विद्यार्थ्यांना, चित्रपट निर्मात्यांना आणि चित्रपट प्रेमींना भारताच्या चित्रपटसृष्टीचा वारसा अधिक सखोल शोध घेण्यासाठी प्रेरणादायी ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रकाशन विभागाच्या  महासंचालक कांचन प्रसाद यांनी प्रकाशन विभाग आणि चित्रपट यांच्या दीर्घकालीन संबंधांवर प्रकाश टाकला आणि भारताची संस्कृति आणि सर्जक वारशाचे दस्तऐवजीकरण करण्यातील त्याची भूमिका विषद केली. चित्रपट क्षण टिपतो तर, पुस्तके तो क्षण जतन करतात, जपतात असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. त्यांनी विभागाच्या सर्जनशील प्रवासांचे दस्तऐवजीकरण, कथा जतन करण्यासाठी आणि भारताच्या सांस्कृतिक ओळखीला आकार देणाऱ्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल भाष्य केले.

राजेंद्र भट्ट यांनी ‘सिनेमा : विविध आयाम’ या, पुस्तकाच्या संपादकीय प्रवासाबाबतची माहिती सांगितली. चित्रपटविषयीचे महत्वपूर्ण लेख हिन्दी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रकाशन विभागाने हाती घेतलेल्या उपक्रमाबद्दल सविस्तर सांगितले.

या सत्राचे संचालन, पत्र सूचना कार्यालयाच्या (पी आय बी) महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांनी केले. या सत्राला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालायचे अतिरिक्त सचिव प्रभात आणि मंत्रालायचे संयुक्त सचिव डॉ. के. के. निराला उपस्थित होते.

पुस्तकांविषयी

अवतार कौल : द (इन)कम्प्लीट स्टोरी

विनोद कौल यांनी इंग्रजीत लिहिलेल्या या पुस्तकाच्या माध्यमातून  चित्रपट दिग्दर्शक अवतार कौल यांचे जीवन, त्यांचा अपूर्ण राहिलेला वारसा, त्यांच्या पत्रे, छायाचित्रे, आठवणी आणि संवादातून उलगडला आहे. त्यांचा एकमेव चित्रपट ‘२७ डाउन’ (१९७४) हा भारतीय नवप्रवाह चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले. मात्र, ज्या दिवशी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली, त्याच दिवशी, मुंबईत,  मित्राला वाचवण्याच्या प्रयत्नात, वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

सिनेमा : विविध आयाम

राजेंद्र भट्ट यांनी हिंदीत संकलित केलेल्या या लेखसंग्रहात, ‘भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या अर्थात एफटीआयआयच्या ‘लेन्साइट’ या नियतकालिकातील रूपांतरित लेख आणि संवादांचा समावेश आहे. यात,  चित्रपटांचा इतिहास, छायाचित्रण, जागतिक चित्रपटसृष्टी तसेच चित्रपट निर्मितीमागील सर्जनशील प्रक्रिया यांविषयीची माहिती देण्यात आली असून, सिनेमाकडे पाहण्याचे विविध दृष्टिकोन हिंदी भाषिक वाचकांपर्यंत व्यापकपणे  पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

 

* * *

पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्‍पलकट्टी/संजना चिटणीस/सविता म्हसकर/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2339702
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026