इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक डिजिटल आरोग्य शिखर परिषद 2026 मध्ये भाषिणीच्या वतीने आरोग्यसेवा क्षेत्रासाठी बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाधारीत उपयोजनांचे सादरीकरण


आरोग्यसेवा क्षेत्राला अधिक कार्यक्षम, सुलभ आणि सर्वसमावेशक स्वरुप प्राप्त करून देण्यात भाषा विषयक तंत्रज्ञानाची भूमिका अधोरेखित करण्यासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), जवाहरलाल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था (JIPMER) आणि भारतीय लष्कराचे वैद्यकीय सेवा महासंचालनालयानेही नोंदवला सहभाग

Posted On: 21 NOV 2026 12:45PM by PIB Mumbai



केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारितील डिजिटल इंडिया महामंडळाच्या अंतर्गत कार्यरत असलेला डिजिटल इंडिया भाषिणी विभाग नवी दिल्लीत आयोजित जागतिक डिजिटल आरोग्य शिखर परिषदेत सहभागी झाला आहे. नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे 20 आणि 21 नोव्हेंबर 2026 या कालावधीत ही परिषद होत आहे. या पहिल्या दिवशी म्हणजेच 20 नोव्हेंबर रोजी भाषिणीने एका प्रदर्शनात आपल्या बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिसंस्थेचे सादरीकरण केले. 21 नोव्हेंबर 2026 रोजीही डिजिटल इंडिया भाषिणी विभाग या प्रदर्शनात सहभागी होत आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची अंमलबजावणी – कृतिशील कृत्रिम बुद्धिमत्ता (Implementing Artificial Intelligence – AI in Action) ही या शिखर परिषदेची संकल्पना आहे. या संकल्पनेला अनुसरूनच भाषिणीने आपले सादरीकरण केले. या शिखर परिषदेतील आपल्या प्रदर्शन दालनात भाषिणीच्या वतीने आपल्या भाषा विषयक तंत्रज्ञान क्षमतेचे आणि आरोग्य क्षेत्रात या क्षमतेचा कशा प्रकारे वापर केला जात आहे याबद्दलचे सादरीकरण केले. या प्रदर्शनात भाषिणीसोबत त्यांचे संस्थात्मक भागीदारही सहभागी झाले आहेत. यात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), जवाहरलाल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था (JIPMER) आणि भारतीय लष्कराचे वैद्यकीय सेवा महासंचालनालय यांचा समावेश आहे.

बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ध्वनीवर आधारलेली तंत्रज्ञानाधारीत आरोग्यसेवा या क्षेत्रातील व्यावसायिक तज्ञांना कशी उपयुक्त ठरू शकते, ही बाब या प्रदर्शनातून अधोरेखित करण्यात आली आहे. यासोबतच या तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय दस्तऐवजीकरणाची प्रक्रिया कशा रितीने सुटसुटीत होऊ शकते आणि भारतीय भाषांमधून आरोग्यसेवेबद्दलची माहिती कशा रितीने सुलभरित्या मिळवली जाऊ शकते, याबद्दलची मांडणीही या प्रदर्शनात केली आहे. या प्रदर्शातील थेट प्रात्यक्षिकांअंतर्गत भाषिणीच्या आवाजी आशयाचे लेखी मजकुरात रूपांतर (speech-to-text), लेखी मजकुराचे आवाजी आशयात रूपांतर (text-to-speech), भाषांतर आणि इतर भाषाविषयक तंत्रज्ञान विषयक क्षमतांचे सादरीकरण मांडले आहे. यासोबतच आरोग्यसेवेवर केंद्रित असलेली इतर प्रात्यक्षिकेही इथे मांडलेली आहेत.

जवाहरलाल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था आणि वैद्यकीय सेवा महासंचालनालय (लष्कर) या संस्थांमधील आरोग्यसेवेशी संबंधित विविध कामांमध्ये भाषिणीच्या बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता क्षमतांचा कसा वापर केला जातो, याबद्दलचे सादरीकरण या प्रदर्शनात केले आहे. जवाहरलाल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेमध्ये e-Sushrut (ई-सुश्रुत) या रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणालीसोबत (HMIS - Hospital Management Information System) e-BHASHINI (ई-भाषिणीचे) एकात्मिकरण केलेले आहे. यामुळे रुग्णांचा वैद्यकीय इतिहास, आंतररुग्ण विभागाच्या (IPD - Inpatient Department) नोंदी आणि रुग्णालयातून सुट्टी देतानाच्या सूचनांचे आवाजाच्या माध्यमातून दस्तऐवजीकरण करणे शक्य झाले आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमधील प्रात्यक्षिकांमध्ये विविध भाषांमधील डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील संवादात सुलभता आणण्यासाठी भाषिणीच्या आवाजविषयक तंत्रज्ञानाचा कशारितीने वापर केला जातो हे उलगडणारी मांडणी केली आहे. वैद्यकीय सेवा महासंचालनालयाने (लष्कर) Dhanwantri (धन्वंतरी) या प्रणालीमध्ये भाषिणीच्या क्षमतांचा वापराची रुपरेषा मांडली आहे. या सुविधेअंतर्गत डॉक्टरांनी तोंडी सांगितलेल्या वैद्यकीय नोंदींचे टंकलिखित मजकुरात रूपांतर केले जाते आणि त्यामुळे आवाजावर आधारित वैद्यकीय दस्तऐवजीकरणाच्या प्रक्रियेत मदत होऊ लागली आहे. बहुभाषिक आवाज आणि भाषाविषयक तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय कार्यपद्धतींना काशारितीने सोपे स्वरुप येऊ शकते, यामुळे आरोग्यसेवा क्षेत्रातील व्यावसायिक तज्ञांना कशी मदत होऊ शकते तसेच डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवादात कशारितीने सुलभता येऊ शकते याची एकत्रित मांडणी या उपाययोजनांच्या सादरीकरणातून करण्यात आली आहे.

शिखर परिषदेच्या सत्रांमध्ये आवाजी आशयाचे लेखी मजकुरात रूपांतर करणाऱ्या Shrutlekh (श्रुतलेख) या भाषिणीच्या क्षमतेच्या प्रात्यक्षिकाचे सादरीकरणही मांडण्यात आले आहे. या सुविधेच्या माध्यमातून वास्तव वेळेत बहुभाषिक लिप्यंतरण आणि भाषांतराला मदत होते. आरोग्यसेवा आणि इतर क्षेत्रांमधील भाषिक अडथळ्यांवर मात करण्यास उपयुक्त ठरणाऱ्या भाषा विषयक तंत्रज्ञानामुळे संवादांमध्ये कशी सुलभता येऊ शकते ही बाब या प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून अधोरेखित झाली आहे.

या प्रदर्शनात भाषिणीच्या बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिसंस्थेतील अनेक उपाययोजनांचे सादरीकरणही मांडण्यात आले आहे. यात भाषांतर आणि आवाजावर आधारित भाषिणीची क्षमता दाखवून देणाऱ्या, BHASHINI या मोबाईल अॅपचा अंतर्भाव आहे. यासोबतच भारतीय भाषांमधील कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाधारीत प्रणालीला बळकट करण्यासाठी समुदायाच्या सहभागातून दिल्या जाणाऱ्या भाषांविषयक माहितीच्या योगदानाची भूमिका अधोरेखित करणारा डेटा दान (Data Daan) हा उपक्रमही या प्रदर्शनात मांडण्यात आला आहे. समुदायाच्या सहभागातून भाषा विषयक संसाधने निर्माण करण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग म्हणून ग्रंथिका या व्यासपीठाबद्दलचे सादरीकरणही करण्यात आले आहे. लेखी आणि तोंडी स्वरुपातील भाषा विषयक संसाधने संकलित करण्यासाठी आणि त्यांचे डिजिटायझेशन करण्यासाठीचे हे भाषिणीचे मार्गर्शिकेच्या स्वरुपातील व्यासपीठ आहे.

जागतिक डिजिटल आरोग्य शिखर परिषद 2026 मधील आपल्या सहभागातून भाषिणीने आरोग्यसेवा क्षेत्राअंतर्गतची कार्यपद्धती अधिक सुलभ, कार्यक्षम आणि देशाच्या भाषिक विविधतेला प्रतिसाद देणारी बनवण्याच्या प्रक्रियेमधील बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची भूमिका अधोरेखित केली आहे.

मेजर जनरल संदीप भल्ला, अतिरिक्त वैद्यकीय सेवा महासंचालक (माहिती प्रणाली, आरोग्य आणि कर्मचारी सेवा)

"प्रशासक, डॉक्टर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे रुग्ण हेच आमचे प्राथमिक भागधारक आहेत. या रुग्णांमध्ये कर्तव्यावर असलेले जवान, सेवानिवृत्त माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचाही समावेश आहे. आम्ही एक बहु वांशिक आणि बहुभाषिक संघटना आहोत. आमच्याकडे देशाच्या विविध भागांतून येणारे आणि विविध भाषा बोलणारे रुग्ण असतात. आमच्या व्यवस्थेला बहुभाषिक सुविधेची जोड असण्याची गरज ओळखून आम्ही भाषिणीशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला आवाजी आशयाचे लेखी मजकुरात रूपांतर करण्याचे तंत्रज्ञान वापरण्यासाठी मोठे सहकार्य केले. यामुळे डॉक्टरांचा मौल्यवान वेळ तर वाचेलच, शिवाय रुग्णांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत संवाद साधता येणार असल्याने त्यांनाही ही सुविधा अधिक सोयीची ठरणार आहे. यामुळे डॉक्टरांना रुग्णांच्या समस्या समजून घेता येतील आणि रुग्णांना समजू शकेल अशा भाषेत औषधांची चिठ्ठी आणि वैद्यकीय सल्ला देता येईल. आम्ही भाषिणीसोबत विश्वासार्ह पाऊल टाकले आहे. भविष्यात एकत्र पुढे जाण्याचा, सहकार्य करण्याचा, परस्परांना पाठबळ देण्याचा आणि या उपाययोजनांमध्ये सातत्याने सुधारणा करत राहण्याबद्दल आम्हाला विश्वास वाटतो. भाषिणीने दिलेल्या पाठबळाबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो."

अमिताभ नाग, मुख्य कार्यकारी अधिकारी, डिजिटल इंडिया भाषिणी विभाग

ज्यावेळी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची आखणी आणि मांडणी आरोग्यसेवा देणाऱ्या आणि घेणाऱ्या लोकांच्या वास्तविक गरजांनुसार केली जाते, त्यावेळी हे तंत्रज्ञान आरोग्यसेवेत अर्थपूर्ण बदल घडवून आण शकते. अत्यावश्यक सेवांच्या पुरवठ्यामध्ये भाषा हा अडथळा ठरू नये, यावर भाषिणीचा विश्वास आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, जवाहरलाल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था आणि वैद्यकीय सेवा महासंचालनालय (लष्कर) यांसारख्या संस्थांसोबत मिळून आम्ही केलेल्या कामांमधून, रुग्णांच्या दस्तऐवजीकरणापासून ते औषधांच्या चिठ्ठीपर्यंत वैद्यकीय कार्यपद्धतींमध्ये बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आणि आवाजावर आधारित तंत्रज्ञानाचे एकात्मिकरण कशा रितीने  केले जाऊ शकते ही बाब आम्ही सिद्ध करून दाखवली आहे. आरोग्यसेवेअंतर्गतच्या प्रक्रिया अधिक कार्यक्षम, सुलभ आणि सर्वसमावेशक बनवण्याच्या प्रक्रियेत कामी आलेली देशाच्या स्वदेशी भाषाविषयक तंत्रज्ञान परिसंस्थेची क्षमता या उपाययोजनांमधून दिसून येते. भाषिणीच्या माध्यमातून आम्ही तंत्रज्ञान केवळ प्रसारित होणारी माहितीच नाही, तर ते ज्या लोकांना सेवा देत आहे त्यांची भाषिक विविधतादेखील समजून घेऊ शकणारी असेल अशा भविष्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत.

प्राध्यापक डॉक्टर विवेक टंडन, प्रभारी प्राध्यापक, संगणक सुविधा, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था

नवी दिल्ली इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने भाषिणीच्या आवाजी आशयाचे लेखी मजकुरात रूपांतर करण्याच्या सुविधेचे राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या (NIC - National Informatics Centre) ई-हॉस्पिटल औषधोपचार विभागासोबत एकात्मिकरण केले आहे. यामुळे डॉक्टरांना प्रचंड गर्दी असलेल्या बाह्यरुग्ण विभागांमध्ये सेवा देतांना, तोंडी सांगून औषधांची चिठ्ठी तयार करता येते, यामुळे त्यांच्या मौल्यवान वेळेची बचतही होते. मज्जातंतूशास्त्र आणि मज्जातंतू शस्त्रक्रिया विभागात याबद्दलचा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्पही राबवण्यात आला. त्याबाबत डॉक्टरांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. एकंदरीत हे व्यासपीठ वैद्यकीय क्षेत्रातील कार्यपद्धतींना साहाय्य करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरले आहे. या अनुभवाच्या आधारे आता ही उपाययोजना संपूर्ण संस्थेत लागू केल्या जात आहे."

डॉक्टर आनंद ए, उप प्रभारी अधिकारी, माहिती तंत्रज्ञान विभाग आणि वैद्यकीय सेवा संचालक, जवाहरलाल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था

जागतिक डिजिटल आरोग्य शिखर परिषद 2026 मध्ये सहभागी होेणे ही जवाहरलाल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे. या परिषदेत आम्ही ई-सुश्रुत या आमच्या रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणालीसोबत ई भाषिणीचे अभिनव पद्धतीने घडवून आणलेल्या एकात्मिकरणाचे सादरीकरण केले आहे. या उपक्रमाअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारताच्या बहुभाषिक डिजिटल क्षमतांचा वापर करण्यात आला आहे. यामुळे डॉक्टरांना बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांचा वैद्यकीय इतिहास, आंतररुग्ण विभागातील फेऱ्या आणि रुग्णालयातून सुट्टी देतानाच्या सूचना लिहिताना इंग्रजी तसेच या सुविधेअंतर्गत वापरता येणाऱ्या भारतीय भाषांमध्ये आवाजाद्वारे वैद्यकीय माहितीची नोंद करता येते. आरोग्यसेवेतील भाषिक अडथळे दूर करून, वैद्यकीय कार्यपद्धती अधिक कार्यक्षम करणे आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील व्यावसायिक तज्ञांवरील दस्तऐवजीकरणाचा भार कमी करणे हे जवाहरलाल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेचे उद्दिष्ट आहे. गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्याच्या कामात भाषा कधीही अडथळा ठरू नयेत हाच आमचा स्पष्ट दृष्टीकोन आहे. स्वदेशी डिजिटल तंत्रज्ञानामुळे सार्वजनिक आरोग्यसेवेचे अधिक सर्वसमावेशक, सुलभ आणि रुग्ण केंद्रित अनुभव देणाऱ्या व्यवस्थेत कशारितीने रूपांतर घडवून आणले जाऊ शकते, हे या उपक्रमाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न जवाहरलाल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेने केला आहे.

डिजिटल इंडिया भाषिणी विभागाविषयी
डिजिटल इंडिया भाषिणी हा विभाग इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या डिजिटल इंडिया महामंडळाच्या अंतर्गत कार्यरत आहे. या विभागाच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित बहुभाषिक डिजिटल समावेशनासाठी एक राष्ट्रीय परिसंस्था तयार करण्याचे काम केले जात आहे. भाषिणी या सुविधेअंतर्गत 36 भारतीय लिखित भाषा, 23 भारतीय ध्वनी भाषा आणि 35 आंतरराष्ट्रीय भाषांचा वापर करता येतो. यासोबतच या सुविधेमुळे सरकारी आणि सार्वजनिक डिजिटल सेवांमध्ये भाषाविषयक कृत्रिम बुद्धिमत्ता क्षमतांचे एकात्मिकरण करणे शक्य झाले आहे. भाषिणी परिसंस्थेअंतर्गत आजमितीला 11 अब्जापेक्षा जास्त प्रक्रियांची नोंद केली गेली असून, दररोज अंदाजे 24 दशलक्ष प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. यातून या सुविधेच्या बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वाढत्या अवलंबाची प्रचिती येते. या परिसंस्थेअंतर्गत भाषांतर, आवाजातील भाषेची ओळख, आवाजातील भाषा आणि आशयाचे विश्लेषण, लिप्यंतरण आणि इतर भाषाविषयक सेवांसाठीच्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे. देशाच्या भाषिक विविधतेला डिजिटल माहिती आणि सेवा विषयक सुविधा अधिक सुलभरितीने उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरू लागला आहे.

जागतिक डिजिटल आरोग्य शिखर परिषद 2026 विषयी
नवी दिल्ली येथील भारत मंडपम इथे 20 आणि 21 नोव्हेंबर 2026 या दरम्यान जागतिक डिजिटल आरोग्य शिखर परिषद 2026 चे आयोजन केले गेले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची  अंमलबजावणी – कृतिशील कृत्रिम बुद्धिमत्ता (Implementing Artificial Intelligence – AI in Action) ही या शिखर परिषदेची संकल्पना आहे. या परिषदेच्या निमित्ताने आरोग्यसेवा क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या व्यावहारिक अंमलबजावणीच्या शक्यता तपसण्याकरता सरकार, आरोग्यसेवा क्षेत्र, संबंधित उद्योग क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्रातील भागधारक एकत्र आले आहेत. या परिषदेत तंत्रज्ञान विषयक प्रदर्शने, प्रात्यक्षिके आणि वैज्ञानिक चर्चांचा समावेश आहे. यासोबतच आरोग्य विषयक  डिजिटल उपाययोजनांना नवी दिशा देणे आणि आरोग्यसेवा विषयक प्रणालींमध्ये त्यांचा अवलंब करण्यावर भर असलेल्या संवाद सत्रांचे आयोजनही या परिषदेच्या निमित्ताने करण्यात आले आहे.

***

आशिष सांगळे / तुषार पवार/परशुराम कोर 

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2339662) अभ्यागत कक्ष : 14