गोवा, 21 नोव्हेंबर 2026
1926 हे वर्ष भारतीय चित्रपटसृष्टीसाठी असाधारण ठरले, कारण देशभरातील विविध कुटुंबांमध्ये आणि सांस्कृतिक परंपरांमध्ये सात उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वे जन्माला आली, ज्या प्रत्येकाने रुपेरी पडद्यावर एक चिरस्थायी वारसा सोडला. ते आहेत उत्तम कुमार, बंगाली चित्रपटसृष्टीचे महान महाननायक, शक्ती सामंत, हिंदी चित्रपटसृष्टीतील काही अत्यंत गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक; ओ.पी. नय्यर, संगीतकार ज्यांच्या अजरामर सुरावटी पिढ्यानपिढ्या लोकांना मंत्रमुग्ध करत आहेत; पद्मश्री पुरस्कार विजेते सूर्यकांत मांढरे, ज्यांच्या अविस्मरणीय भूमिकांनी ग्रामीण, ऐतिहासिक आणि पौराणिक कथांमधून मराठी चित्रपटसृष्टीला समृद्ध केले; प्रेम नझीर, मल्याळम चित्रपटसृष्टीतील सदाबहार रोमँटिक नायक; राज कुमार, ज्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने आणि अतुलनीय अभिनयाने त्यांना बॉलिवूडमध्ये एक खास ओळख मिळवून दिली; आणि रवी (बॉम्बे रवी), चौदहवीं का चांद, गुमराह, वक्त आणि हमराज यांसारख्या अजरामर संगीत रचनांचे प्रतिभावान संगीतकार.
शंभर वर्षांनंतर, 57 वा इफ्फी महोत्सव हिंदी, बंगाली, मल्याळम आणि मराठी या चार भाषांमधील पाच पुनर्स्थापित चित्रपटांच्या मंचनाद्वारे त्यांची जयंती साजरी करत आहे. हे चित्रपट या शतायुषी कलाकारांच्या अत्यंत गाजलेल्या कलाकृती आहेत. या सर्व चित्रपटांचे पुनरुज्जीवन राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने एनएफडीसीने राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानांतर्गत केले आहे. हे अभियान भारताच्या समृद्ध चित्रपट वारशाचे जतन, संवर्धन, डिजिटलीकरण आणि पुनर्स्थापना करण्यासाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाचा एक प्रमुख उपक्रम आहे.
चौरंगीमधील उत्तम कुमार
1965 सालच्या ‘चौरंगी’ या बंगाली क्लासिक चित्रपटाने बंगाली चित्रपटसृष्टीतील एका महान सांघिक अभिनयाला जगासमोर आणले. बंगाली चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध स्टार उत्तम कुमार यांनी, जेव्हा ते लोकप्रियतेच्या शिखरावर होते, तेव्हा या चित्रपटात सत्यसुंदर साता बोस यांची भूमिका स्वीकारली. उत्तम कुमार यांनी 1948 साली एक अभिनेता म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि तेव्हापासून तीन दशकांत 200 हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला, तसेच ‘सप्तपदी’, ‘हरानो सूर’, ‘नायक’, ‘चिरियाखाना’, ‘अमानुष’ यांसारखे अनेक क्लासिक चित्रपट दिले. त्यांनी बंगाली चित्रपट अभिनयाला रंगमंचीय हावभावांपासून शहरी प्रणयवादाकडे नेले.

Uttam Kumar

दिग्दर्शक शक्ती सामंत आणि संगीत दिग्दर्शक ओ. पी. नय्यर यांचा ‘काश्मीर की कली’
‘काश्मीर की कली’ या चित्रपटाने या दोन्ही दिग्गजांना दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक म्हणून आपापल्या कारकिर्दीच्या शिखरावर पोहोचवले. शक्ती सामंत यांनी काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य पूर्ण रंगात चित्रित करून चित्रपट रसिकांसमोर सादर केले, तर ओ. पी. नय्यर यांनी असे संगीत दिले जे आजही लोकांच्या मनाला भुरळ घालते.
शक्ती सामंत यांनीही आपल्या कारकिर्दीची सुरुवात 1948 मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली आणि 1955 मध्ये 'बहू' या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. त्यांच्या शक्ती फिल्म्स या बॅनरखाली त्यांनी 43 चित्रपटांचे दिग्दर्शन केले, त्यापैकी 37 हिंदीत तर 6 बंगालीत आहेत. या महान चित्रपट निर्मात्याने 'हावडा ब्रिज', 'चायना टाऊन', 'ॲन इव्हनिंग इन पॅरिस', 'आराधना', 'कटी पतंग', 'अमर प्रेम' आणि 'अनुराग' यांसारखे अजरामर चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीला दिले.
ओंकार प्रसाद नय्यर यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 'आसमान' (1952) या चित्रपटाने केली आणि पुढे 'आर पार', 'मिस्टर अँड मिसेस 55', 'सीआयडी', 'नया दौर' आणि 'हावडा ब्रिज' यांसारख्या चित्रपटांना संगीत दिले. गायक मोहम्मद रफी, आशा भोसले आणि गीता दत्त यांच्यासोबतच्या त्यांच्या सहकार्यातून हिंदी चित्रपट संगीतातील काही सर्वकालीन लोकप्रिय गाणी निर्माण झाली. त्यांच्या घोड्याच्या टापांच्या तालाने आणि ढोलकीच्या ठेक्याने संगीताचा एक असा वैशिष्ट्यपूर्ण नमुना तयार केला, ज्याची प्रेक्षकांनी खूप प्रशंसा केली.

Shakti Samanta O.P.Nayyar

साधी माणसं या चित्रपटातील सुर्यकांत मांढरे
सुर्यकांत मांढरे यांना त्यांचे गुरु भालजी पेंढारकर यांनी लहानपणीच शोधून काढले आणि बालकलाकार म्हणून मांढरे चित्रपट कारकीर्द सुरु झाली. पन्नास वर्षांची कारकीर्द आणि सांगत्ये ऐका, कन्यादान, मोहित्यांची मंजुळा आणि मल्हारी मार्तंड यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांसह एकूण शंभराहून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केलेल्या सुर्यकांत यांना मराठी चित्रपटांमध्ये ग्रामीण बाजाच्या, ऐतिहासिक तसेच पौराणिक नायक अशा विविध प्रकारांतील काही सशक्त पात्रे साकारण्याची संधी मिळाली.
वर्ष 1965 मध्ये आलेल्या 'साधी माणसं' या अभिजात चित्रपटात त्यांनी शंकर या लोहाराची भूमिका केली. शंकर हा कोणताही अहंकार नसलेल्या कणखर पुरुषाचे, कामाच्या प्रतिष्ठेचे आणि गैरसमजाच्या वेदनेचे प्रतीक आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत जयश्री गडकर आहेत.या दोघांनी एकत्र बऱ्याच चित्रपटांत काम केले आहे. या चित्रपटाविषयी आणखी एक रंजक बाब म्हणजे दिग्गज गायिका लता मंगेशकर यांनी ‘आनंदघन’ या टोपणनावाने या चित्रपटाला संगीत दिले, मराठी चित्रपटांतील आपल्या संगीत दिग्दर्शन विषयक कामासाठी त्या बरेचदा या टोपणनावाचा वापर करत असत.

Suryakant Mandhare

'तुलाभारम' या चित्रपटातील प्रेम नाझीर
ज्यांचे चित्रपट त्यातील गाणी आणि उज्ज्वल, सजीव कथांसाठी सुप्रसिध्द आहेत असे मल्याळी चित्रपटसृष्टीतील सदाबहार रोमँटिक नायक प्रेम नाझीर यांनी या चित्रपटात फॅक्टरी कामगार तसेच कामगार संघटनेचा कार्यकर्ता राम याची भूमिका केली. रोमँटिक नायकाच्या भूमिकांसाठी प्रख्यात असलेल्या या सुप्रसिध्द अभिनेत्याने या चित्रपटात लक्षणीयरीत्या संयमित अभिनय करण्यासाठी स्वतःची चंदेरी पडद्यावरील ग्लॅमरस प्रतिमा झटकून टाकली आणि ही त्यांच्या कारकिर्दीतील एक अत्यंत उत्तम भूमिका ठरली.
इरुतिन्ते आत्मावू, मुराप्पेन्णु आणि नाधि ते कल्लीचेल्लम्मा, विदा परयुम मुन्पे आणि पदायोत्तम यांसारख्या असंख्य चित्रपटांद्वारे प्रेम नाझीर यांच्या पात्रांनी रोमँटिक नायकाच्या भूमिकेकडून, पौराणिक नायक ते समाज सुधारक असा प्रवास केला. सुमारे 700 हून अधिक चित्रपटांमध्ये मुख्य पात्र रंगवणे आणि 130 चित्रपटांमध्ये शीला या एकाच अभिनेत्रीसह अभिनय असे दोन गिनेस जागतिक विक्रम प्रेम नाझीर यांच्या नावावर आहेत तसेच त्यांना 1983 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले.

Prem Nazir

'वक्त' या चित्रपटात अभिनेते राज कुमार आणि संगीत संयोजक बॉम्बे रवी
ज्यांचा भारदस्त आवाज, प्रभावी संवादफेक आणि असामान्य व्यक्तिमत्त्व यांच्यासह रुपेरी पडदा गाजवणारे सुप्रसिद्ध अभिनेते राज कुमार यश चोप्रा यांच्या मल्टीस्टारर चित्रपटासाठी प्रख्यात संगीत दिग्दर्शक रवी यांच्यासोबत एकत्र आले. वक्त हा चित्रपट राज कुमार यांनी रंगवलेली राजा नामक चोराची भूमिका आणि ‘ए मेरी जोहरा जबीं’ या अत्यंत लोकप्रिय गाण्याला रवी यांनी दिलेली चाल यांच्यामुळे लक्षात राहण्याजोगा झाला आहे.
राज कुमार यांनी 1952 च्या रंगीली या चित्रपटातील भूमिकेसह अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि नौशेरवान-ए-दिल तसेच मदर इंडिया ते दिल एक मंदिर (1963) यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अत्यंत गाजल्या. त्यानंतर त्यांनी वक्त, हीर रांझा, पाकीजा, तिरंगा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये विलक्षण भूमिका केल्या.
मल्याळी चित्रपटसृष्टीमध्ये बॉम्बे रवी या नावाने लोकप्रिय असलेल्या रवी शंकर शर्मा यांनी 1955 मध्ये आलेल्या वचन या हिंदी चित्रपटाद्वारे आपली कारकीर्द सुरु केली. चौदहवीका चांद, गुमराह, वक्त आणि हमराज या चित्रपटांसाठी त्यांनी दिलेल्या संगीतासाठी सुप्रसिद्ध आहेत. परिणयम आणि सुकृथम या चित्रपटांतील संगीत दिग्दर्शनासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.

Raaj Kumar Ravi

या विशेष पद्धतीने संकलित केलेल्या शताब्दी श्रद्धांजलीच्या माध्यमातून 57 वा इफ्फी केवळ सात असामान्य व्यक्तींचा नव्हे तर त्यांनी निर्माण केलेल्या चिरस्थायी सर्जनशील वारशाचा देखील सोहोळा साजरा करेल. त्यांचा वारसा येणाऱ्या पिढ्यांना प्रेरित करत राहील आणि भारतीय चित्रपटांच्या कालातीत समृद्धीला उजळत राहील.
या सात महान व्यक्तींच्या जन्मानंतर एका शतकाचा काळ गेल्यानंतरही ते सर्वजण भारतीय चित्रपटांमध्ये असलेली असामान्य विविधता, सर्जनशील आकांक्षा आणि कलात्मक उत्कृष्टता यांचा पुरावा देत राहतील. या पुनर्संचयित अभिजात कलाकृतींच्या माध्यमातून, 57 वा इफ्फी प्रेक्षकांना केवळ अविस्मरणीय भूमिका, गाण्यांच्या चाली आणि कथाच नव्हे तर त्यांनी घडवलेल्या चित्रपटीय परंपरा तसेच सांस्कृतिक इतिहासांना देखील पुन्हा भेटण्याची संधी देऊ करत आहे.
सात व्यक्तीगत महान वारशांना आदरांजली वाहतानाच हा शतकी सोहोळा भारताचा चित्रपट वारसा जतन करण्याच्या आणि भावी पिढ्यांना तो उपलब्ध करून देण्याच्या महत्त्वाला अधोरेखित करतो.
Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1®=48
* * *
पीआयबी मुंबई | गोपाळ चिप्पलकट्टी/राजेश शिरभाते/संजना चिटणीस/दर्शना राणे