57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

चित्रपटाची भाषा समजून घेणे : इफ्फी 2026 च्या पार्श्वभूमीवर पी आय बी - एफ टी आय आय चित्रपट रसास्वाद अभ्यासक्रमाच्या माध्यमातून चित्रपट निर्माण कला, कौशल्य आणि व्याकरण यांचा घेतला वेध

Posted On: 19 NOV 2026 7:57PMby PIB MumbaiRelease ID: 2338846Views: 5

गोवा, 19 नोव्‍हेंबर 2026

 

पत्र सूचना कार्यालयाने (पी आय बी) भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेच्या (एफ टी आय आय) सहकार्याने, 57 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) 2026 च्या पूर्वसंध्येला, अधिस्वीकृती प्राप्त माध्यम प्रतिनिधी आणि जनसंवाद क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी चित्रपट रसास्वाद अभ्यासक्रम आयोजित केला होता. या अभ्यासक्रमाचा उद्देश सहभागींना चित्रपट या कलाप्रकाराची सखोल समज करून देणे तसेच त्यांना चित्रपटाची भाषा, सौंदर्यशास्त्र आणि सर्जनशील प्रक्रियांची ओळख करून देणे हा होता, जेणेकरून ते महोत्सवातील चित्रपटांशी अधिक सजगपणे जोडले जाऊ शकतील.

चित्रपटाकडे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून न पाहता, त्याचे व्याकरण, तत्त्वज्ञान आणि दृश्य भाषा समजून घेण्याचे महत्त्व उद्घाटन सत्रात बोलताना, पी आय बी च्या महासंचालक, स्मिता वत्स शर्मा यांनी अधोरेखित केले. महेश कुमार यांनी चित्रपटाचा उल्लेख अवकाश-काल आणि तंत्रज्ञान-औद्योगिक कलाप्रकार असा केला. चित्रपटाचा सांस्कृतिक आणि सामाजिक प्रभाव घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या चित्रपट निर्मितीमधील दृश्य तंत्रे, तंत्रज्ञान आणि सर्जनशील प्रक्रिया यांच्या परस्परसंबंधांवर त्यांनी प्रकाश टाकला.

चित्रपटविषयक माध्यम वार्तांकनात अधिक सखोलता आणि गुणवत्तेची गरज असल्याचे स्मिता वत्स शर्मा यांनी नमूद केले. माध्यम व्यावसायिकांना केवळ बातम्यांच्या संख्येवर लक्ष केंद्रित न करता, चित्रपट निर्मितीच्या कलात्मक आणि तांत्रिक पैलूंचा सखोल अभ्यास करण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात जनसंवाद क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या सहभागाचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले आणि सहभागींना या सत्रांचा, चित्रपट प्रदर्शनांचा तसेच चित्रपट निर्माते आणि इतर तज्ज्ञांशी संवाद साधण्याच्या संधींचा पुरेपूर लाभ घेण्यास प्रोत्साहित केले.

एफ टी आय आय च्या चित्रपट पडद्याचा अभ्यास आणि संशोधन विभागाचे प्राध्यापक डॉ. इंद्रनील भट्टाचार्य आणि चित्रपट दिग्दर्शन विभागाचे सहाध्यायी प्राध्यापक वैभव अबनावे यांनी या अभ्यासक्रमाला मार्गदर्शन केले. व्याख्याने, चित्रपट प्रदर्शन, चर्चा आणि विश्लेषणात्मक उपक्रमांचा या सत्रांमध्ये समावेश होता, ज्याद्वारे सहभागींना चित्रपटाचे स्वरूप, इतिहास आणि जागतिक चित्रपट निर्मितीचे सौंदर्यशास्त्र समजून घेण्यास मदत झाली. यामध्ये 'चित्रपटातील काळ आणि अवकाश', 'ॲनिमेटेड डॉक्युमेंटरीज' आणि 'संरचनात्मक विश्लेषण' यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी चित्रपट समीक्षणावर एक सत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्‍ये  सहभागींनी लाइफलाइन या चित्रपटाचे विश्लेषण केले. यासाठी त्यांनी अभ्यासक्रमादरम्यान शिकलेल्या विविध संकल्पना आणि चिकित्सक दृष्टिकोनांचा वापर केला.

एफ टी आय आय च्या प्राध्यापकांच्या योगदानाबद्दल, गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतिबिंब असणाऱ्या विशेष कलाकृती देऊन त्यांना  सन्मानित करण्यात आले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रभात कुमार; एफ टी आय आय चे कुलगुरू आणि एन एफ डी सी चे व्यवस्थापकीय संचालक धीरज सिंग; तसेच पीआयबी च्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांच्या हस्ते सहभागी माध्यम प्रतिनिधींना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

चित्रपटांकडे पाहण्याचा शैक्षणिक दृष्टिकोन आणि प्रत्यक्ष अनुभव यांची सांगड घालून, या अभ्यासक्रमाद्वारे सहभागी व्यक्तींची चित्रपट समजून घेण्याची आणि त्यांचे आकलन करण्याची क्षमता अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे 57 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनाशी एक माहितीपूर्ण आणि सजग परिमाण संलग्न झाले.

 

* * *

पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/संदेश नाईक/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2338846
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026