Posted On:
19 NOV 2026 7:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2026
आयुष मंत्रालयांतर्गत केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषदेने (सीसीआरएच) आज नवी दिल्ली येथे 'अँटीमायक्रोबियल रेसिस्टन्स'(एएमआर), अर्थात ‘प्रतिजैविक प्रतिरोध’ या विषयावरील राष्ट्रीय मोहिमेचे आयोजन केले होते. अँटीमायक्रोबियल औषधांच्या जबाबदार वापरला प्रोत्साहन देणे, लोकांमध्ये जागरूकता वाढवणे आणि वैज्ञानिक संशोधन तसेच समन्वित कृतीचे महत्त्व अधोरेखित करणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. “एक आरोग्य, एक कृती: एएमआरचा आताच प्रतिबंध करा” या संकल्पनेखाली आणि “एकत्र कृती करा. एएमआरशी लढा. भविष्य सुरक्षित करा.” या टॅगलाइनसह ही मोहीम आयोजित करण्यात आली होती.
उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार), आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नमूद केले की, अँटीबायोटिक्सचा (प्रतिजैविके) बेसुमार वापर करू नये, प्रत्येक आजारासाठी त्याचा वापर आवश्यक नसतो. अँटीबायोटिक्स सामान्य सर्दी आणि फ्लू यासारख्या विषाणूजन्य संसर्गांवर प्रभावी नसतात. मात्र, स्वतःहून औषधे घेणे, उरलेली औषधे वापरणे आणि वैद्यकीय सल्ल्याशिवाय प्रतिजैविके (अँटीबायोटिक्स) सेवन करणे, या गोष्टी 'एएमआर' च्या वाढत्या आव्हानात भर घालत असल्याचे ते म्हणाले.
28 डिसेंबर 2025 रोजी मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या संदेशाचा संदर्भ देत, प्रतापराव जाधव म्हणाले: डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटिक्स घेऊ नका.” औषधांच्या विवेकपूर्ण वापराला प्रोत्साहन देण्यासाठी जनजागृती आणि सामूहिक जबाबदारी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
एएमआर चा सामना करण्यासाठी चार प्रमुख प्राधान्यक्रमांवर प्रकाश टाकताना, जाधव यांनी प्रतिजैविकांचा वापर केवळ वैद्यकीय सल्ल्यानुसारच विवेकीपणे करण्यावर आणि डॉक्टरांनी सुचवलेला कोर्स पूर्ण करण्यावर, तसेच स्वच्छ पिण्याचे पाणी, हाताची स्वच्छता, परिसराची स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि लसीकरणाद्वारे संसर्ग प्रतिबंध मजबूत करणे, संशोधन, प्रयोगशाळा पायाभूत सुविधा आणि देखरेख प्रणाली वाढवणे, आणि वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या प्रशिक्षणामध्ये एएमआर आणि तर्कशुद्ध औषधांचा वापर समाविष्ट करण्यावर त्यांनी भर दिला.
'अँटीमायक्रोबियल रेसिस्टन्स' (एएमआर) विषयावरील या सीसीआरएच ला समर्पित वेबपेजचे उद्घाटन आणि एएमआर जागरूकता विषयक द्वैभाषिक पुस्तिकेचे प्रकाशन, हे या कार्यक्रमाचे एक प्रमुख आकर्षण ठरले. विश्वासार्ह माहिती मिळवण्याची उपलब्धता सुधारणे, लोकांची समज वाढवणे आणि जबाबदार प्रतिजैविक वापराला प्रोत्साहन देणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
या कार्यक्रमात एएमआर प्रतिज्ञा देखील घेण्यात आली, याद्वारे जबाबदार प्रतिजैविक वापराप्रति आणि प्रतिजैविक प्रतिकार प्रतिबंध आणि नियंत्रण करण्याच्या प्रयत्नांप्रति सामूहिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला.
जेव्हा जीवाणू, विषाणू, बुरशी आणि परजीवी यांसह सूक्ष्मजीव, त्यांच्याशी लढण्यासाठी तयार केलेल्या औषधांना प्रतिकार करण्याची क्षमता विकसित करतात, तेव्हा प्रतिजैविक प्रतिरोध निर्माण होतो, आणि त्यांच्या संसर्गावर उपचार करणे अधिकाधिक कठीण होते. एएमआर हे सार्वजनिक आरोग्यापुढील एक गंभीर आव्हान आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी 'वन हेल्थ' दृष्टिकोनांतर्गत मानवी आरोग्य, प्राण्यांचे आरोग्य, कृषी आणि पर्यावरण या क्षेत्रांमध्ये समन्वित कृतीची आवश्यकता आहे.
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर