Posted On:
19 NOV 2026 2:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर 2026
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी 18 नोव्हेंबर 2026 रोजी रोम येथे, इटलीचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री अँटोनियो ताजानी यांच्यासह 'भारत-इटली संयुक्त आर्थिक सहकार्य आयोगाच्या' (जेसीईसी) 23 व्या सत्राचे सह-अध्यक्षपद भूषवले. या बैठकीत द्विपक्षीय आर्थिक आणि व्यावसायिक सहकार्याच्या प्रगतीचा दोन्ही नेत्यांनी आढावा घेतला आणि व्यापार, गुंतवणूक आणि औद्योगिक भागीदारी वाढवण्यासाठीच्या उपायांवर चर्चा केली. त्यांनी 'संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025–2029 आणि मे 2026 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इटली भेटीतून झालेल्या निष्पन्नाच्या आधारे, भारत-इटली विशेष धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याप्रति आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
या चर्चेमध्ये ऑटोमोटिव्ह आणि एरोस्पेसमधील सहकार्य, उद्योग 4.0, कृषी आणि कृषी-तंत्रज्ञान, कनेक्टिव्हिटी आणि ऊर्जा, महत्त्वपूर्ण खनिजे, विज्ञान आणि नवोन्मेष, संस्कृती आणि पर्यटन, तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता या क्षेत्रांमधील सहकार्याचा समावेश होता. दोन्ही बाजूंनी भारताची वाढती उत्पादन क्षमता आणि कुशल मनुष्यबळ आणि प्रगत उत्पादन, अभियांत्रिकी, यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानातील इटलीचे सामर्थ्य, याची पूरकता अधोरेखित केली. त्यांनी उद्योगांचा अधिक सहभाग, संयुक्त उपक्रम, तंत्रज्ञान भागीदारी आणि जागतिक मूल्य साखळ्यांमध्ये एकत्रीकरण याला प्रोत्साहन दिले.
दोन्ही नेत्यांनी भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारावरील वाटाघाटी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे स्वागत केले आणि बाजारपेठेचा विस्तार, व्यापार आणि गुंतवणुकीचा ओघ वाढवणे आणि पुरवठा साखळ्या मजबूत करण्याची दोन्ही देशांची क्षमता, यावर चर्चा केली. या संदर्भात, त्यांनी 2029 पर्यंत 20 अब्ज युरोचे द्विपक्षीय व्यापाराचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या सामायिक उद्दिष्टाचा पुनरुच्चार केला, आणि व्यापारात विविधता आणण्याची तसेच गुंतवणुकीचे प्रमाण वाढवण्याची गरज अधोरेखित केली.
आपल्या भेटीदरम्यान, पियूष गोयल यांनी 17 नोव्हेंबर 2026 रोजी वॉल्टर टोस्टो एस.पी.ए., नॉर्डइम्पियान्टी सिस्टम, ॲटिटेक, मॅगाल्डी ग्रुप आणि ब्रॅको ग्रुप, यासारख्या आघाडीच्या इटालियन कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठ नेतृत्वाबरोबर स्वतंत्र बैठका आयोजित केल्या. भारतामधील गुंतवणूक, उत्पादन आणि तंत्रज्ञान भागीदारीच्या संधींवर चर्चेत भर देण्यात आला.
मंत्रीमहोदयांनी रोम येथे आयोजित भारत-इटली व्यवसाय आणि नवोन्मेष मंचालाही संबोधित केले. या मंचावर वरिष्ठ सरकारी अधिकारी, उद्योग संघटना आणि इटालियन कंपन्यांसोबतच, 12 स्टार्टअप्ससह सुमारे 80 भारतीय व्यावसायिक प्रतिनिधी एकत्र आले होते. या कार्यक्रमाच्या आधी, गोयल यांनी भारतीय व्यावसायिक प्रतिनिधी मंडळांसोबत इटली आणि विस्तारित युरोपीय बाजारपेठेत भरतीय व्यवसायांसाठी असलेल्या संधींसंदर्भात संवाद साधला, ज्यामध्ये भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या संधींचाही समावेश होता.
दोन्ही अर्थव्यवस्थांच्या एकमेकांना पूरक सामर्थ्यांमधून निर्माण होणाऱ्या संधींचा शोध घेण्यासाठी, फोरमचा भाग म्हणून तीन विभागीय गोलमेज परिषदांचे (संवाद -चर्चासत्रांचे) आयोजन करण्यात आले होते.
औद्योगिक यंत्रसामग्री आणि कृषी-अन्न गोलमेज परिषदेने स्वयंचलन, तंत्रज्ञान हस्तांतरण, अन्न-प्रक्रिया यंत्रसामग्री, शीत-साखळी पायाभूत सुविधा आणि पॅकेजिंग या क्षेत्रांतील संधींवर प्रकाश टाकला, ज्याचा उद्देश काढणीनंतरचे नुकसान कमी करणे आणि मूल्यवर्धन करणे हा होता. वाहन उद्योग गोलमेज परिषदेने इलेक्ट्रिक आणि भविष्यातील अत्याधुनिक क्षेत्रातील गतिशीलता, घटक, संशोधन आणि नवोपक्रम, आणि शाश्वत उत्पादन या क्षेत्रांतील सहकार्याचा शोध घेतला. सहभागींनी चर्चांना मूर्त व्यावसायिक रूप मिळावे यासाठी असलेले प्रमुख मार्ग म्हणून संयुक्त उपक्रम, गुंतवणूक भागीदारी आणि तंत्रज्ञान सामायिकीकरण यावर चर्चासत्रांमधून भर दिला.
इटलीच्या परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्रालयातील विकास आणि निर्यात प्रोत्साहन('ग्रोथ अँड एक्सपोर्ट प्रमोशन') विभागाचे महासंचालक मौरो बाटोची आणि इटलीतील भारताच्या राजदूत वाणी राव यांच्या हस्ते नवोन्मेष मंचाचे ('इनोव्हेशन फोरम) उद्घाटन झाले. या संपूर्ण उपक्रमादरम्यान पीयूष गोयल जातीने उपस्थित होते. त्यांनी भारतीय आणि इटालियन प्रतिनिधींशी संवाद साधला आणि दोन्ही बाजूंना शाश्वत विकास व तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांत सहकार्य आणि समन्वयाच्या संधी शोधण्यासाठी तसेच, दोन्ही देशांच्या नाविन्यपूर्ण परिसंस्थांमधील (इनोव्हेशन इकोसिस्टम्स) पूरक क्षमतांचा लाभ घेऊन पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केले.
उद्घाटन सत्रात, व्यावसायिक संघटनांनी बिझनेस फोरमचे(औद्योगिक चर्चासत्रांचे)निष्कर्ष सादर केले, त्यानंतर महामहिम अँटोनियो ताजानी आणि पियुष गोयल यांनी उपस्थितांना संबोधित केले. या सत्रांमध्ये दोन्ही अर्थव्यवस्थांमधील मजबूत भागिदारीवर प्रकाश टाकण्यात आला आणि भारत व इटलीची आर्थिक भागीदारी अधिक दृढ करण्याबाबत सामायिक वचनबद्धता अधोरेखित करण्यात आली.
महामहिम अँटोनियो ताजानी यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीदरम्यान, दोन्ही मंत्र्यांनी द्विपक्षीय आर्थिक आणि व्यावसायिक संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला आणि व्यापार, गुंतवणूक व औद्योगिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या विविध मार्गांवर चर्चा केली. सातत्यपूर्ण संवाद आणि अधिक घनिष्ठ व्यावसायिक भागीदारीच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील पंतप्रधानांच्या दूरदृष्टीला मूर्त परिणामांमध्ये रूपांतरित करण्याच्या आपापल्या वचनबद्धतेचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.
या भेटीमुळे भारत-इटली विशेष राजनैतिक भागीदारीला नवी गती मिळाली आणि द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक व व्यावसायिक सहकार्य वाढवण्याच्या सामायिक वचनबद्धतेला बळकटी मिळाली आहे.
नितीन फुल्लुके/राजश्री आगाशे /संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai