गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पीएम स्वनिधी सन्मान पुरस्कार 2026 रस्त्यावरील विक्रेत्यांच्या उपजीविकेला बळकटी देण्याच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करतात

Posted On: 19 NOV 2026 2:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 नोव्हेंबर  2026

भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाच्या शहरी विकास विभागाने 20 नोव्हेंबर 2026 रोजी डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र, नवी दिल्ली येथे ‘स्वनिधि सन्मान पुरस्कार 2026’ सोहळ्याचे आयोजन केले आहे. गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील. गृहनिर्माण आणि नगरविकास राज्यमंत्री तोखन साहू, या कार्यक्रमाला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

52 पुरस्कार आणि 5 विशेष सन्मानांचा समावेश असलेल्या या कार्यक्रमात रस्त्यावरील विक्रेत्यांच्या उपजीविकेला बळकटी देण्यासाठी, तसेच आर्थिक समावेशन, डिजिटल स्वीकारार्हता आणि सामाजिक सुरक्षा वाढविण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेश, शहरी स्थानिक संस्था, कर्ज देणाऱ्या संस्था आणि भागीदार संस्थांनी दिलेल्या उत्कृष्ट योगदानाचा गौरव केला जाईल. या कार्यक्रमाला योजनेशी संबंधित विविध भागधारकांचे प्रतिनिधित्व करणारे सुमारे 600 सहभागी उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. खालील श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल:

· राज्ये/केंद्रशासित प्रदेश: 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांना 27 पुरस्कार

· नागरी स्थानिक संस्था: 21 पुरस्कार

· कर्ज देणाऱ्या संस्था: 4 पुरस्कार

· प्रमुख भागधारक: 5 विशेष सन्मान

योजनेचा संक्षिप्त आढावा

1 जून 2020 रोजी सुरू झाल्यापासून, 'पीएम स्वनिधी' (PM SVANidhi) योजनेद्वारे सुमारे 81 लाख रस्त्यावरील विक्रेत्यांना 1.21 कोटींहून अधिक कर्ज मिळवून देण्यात आले, त्याचे एकूण मूल्य सुमारे 20,000 कोटी रुपये इतके आहे. ऑगस्ट 2025 मध्ये, सरकारने या योजनेची पुनर्रचना केली आणि तिची अंमलबजावणी मार्च 2030 पर्यंत वाढवली. याबरोबरच, योजनेचा विस्तार करण्यासाठी आणि आर्थिक समावेशाला अधिक बळकटी देण्यासाठी काही महत्त्वाचे सुधारणात्मक बदलही लागू करण्यात आले. पुढील प्रमाणे:

· रस्त्यावरील विक्रेत्यांच्या बदलत्या कर्जविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी, तिन्ही कर्ज टप्प्यांवरील कर्जाच्या रकमेत वाढ करण्यात आली.

· कर्जाचा दुसरा हप्ता भरला आहे, अशा पात्र लाभार्थ्यांसाठी 30,000 रुपयांपर्यंतची कर्ज  मर्यादा असलेले, यूपीआय (UPI) शी जोडलेले 'रुपे' (RuPay) क्रेडिट कार्ड सुरू करण्यात आले.

· वैधानिक शहरांच्या पलीकडे जाऊन, जनगणना शहरे आणि उपनगरीय भागांचा समावेश करण्यासाठी भौगोलिक व्याप्तीचा विस्तार.

कर्ज सहाय्याव्यतिरिक्त, ही योजना 'स्वनिधी से समृद्धी' (SVANidhi se Samriddhi) च्या माध्यमातून रस्त्यावरील विक्रेत्यांच्या कुटुंबांच्या सर्वांगीण सामाजिक-आर्थिक विकासाला प्रोत्साहन देते. 52 लाखांहून अधिक लाभार्थी कुटुंबांचे सामाजिक-आर्थिक प्रोफाइलिंग पूर्ण झाले असून, केंद्र सरकारच्या आठ कल्याणकारी योजनांतर्गत 1.62 कोटींहून अधिक मंजुऱ्या देण्यात आल्या. ही योजना 50 स्ट्रीट फूड हब्सच्या विकासासारख्या उपक्रमांद्वारे आणि अन्न सुरक्षा आणि स्वच्छता विषयक प्रशिक्षणासह क्षमता-विकास कार्यक्रमांद्वारे रस्त्यावरील विक्री परिसंस्थेला बळकटी देत आहे.

नितीन फुल्लुके/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2338397) अभ्यागत कक्ष : 3