वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रोममध्ये केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या आघाडीच्या इटालियन कंपन्यांच्या सीईओंसमवेत बैठका

चर्चेमध्ये ऊर्जा उपकरणे, बांधकाम, विमान वाहतूक, स्वच्छ ऊर्जा आणि आरोग्यसेवा या क्षेत्रांमधील गुंतवणूक, तंत्रज्ञान भागीदारी आणि संयुक्त उपक्रमांवर भर

Posted On: 18 NOV 2026 2:52PM by PIB Mumbai

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी इटलीच्या अधिकृत दौऱ्यात, 17 नोव्हेंबर 2026 रोजी रोम येथे इटलीतील आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी (सीईओ) आणि वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली.

मंत्री गोयल यांनी वॉल्टर टोस्टो एस.पी. ए चे व्यवस्थापकीय संचालक लुका टोस्टो,  नॉर्डिम्पियान्टी सिस्टम एस.आर.एल चे मुख्य कार्यकारी अधिकारी जियान पिएरो गाग्लियार्डी,एटिटेक चे अध्यक्ष जियानी लेटिएरी, मागाल्डी ग्रीन एनर्जीच्या व्यवस्थापकीय संचालक लेटिझिया मागाल्डी आणि ब्राको इमेजिंग एस.पी.ए. चे मुख्य कार्यकारी अधिकारी फुल्वियो रेनोल्डी ब्राको यांची भेट घेतली.

भारतातील इटालियन गुंतवणुकीचा विस्तार, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि भारतीय भागीदारांसोबतचे संयुक्त उपक्रम हे मुद्दे या भेटींवेळी झालेल्या चर्चेच्या केंद्रस्थानी होते. कंपन्यांनी त्यांचे तंत्रज्ञान भारतात आणण्यात आणि उत्पादन, विमान देखभाल, औष्णिक ऊर्जा साठवण आणि औषधनिर्मिती घटक यांसारख्या क्षेत्रांमध्ये भारतीय उद्योगासोबत सहकार्य करण्याबाबत स्वारस्य व्यक्त केले.

कंपन्यांनी स्वारस्य दर्शविल्याबद्दल पीयूष गोयल यांनी त्यांचे स्वागत केले, तसेच भारतातील पायाभूत सुविधा, विमान वाहतूक आणि आरोग्यसेवा यांसह अन्य क्षेत्रांत भारतीय उद्योगांसोबत भागीदारी करण्याचे आवाहन त्यांना केले. 

या दिशेने पुढे जाण्याचा भाग म्हणून, भारतीय संयुक्त उपक्रम भागीदारांचा शोध घेणे, प्रायोगिक प्रकल्प राबवणे, येणाऱ्या खर्चाता तुलनात्मक अभ्यासाबरोबरच आणि भारतीय संस्थांसोबत संयुक्त अभ्यास करणे यांसारख्या काही गोष्टींची गरज चर्चेवेळी लक्षात घेण्यात आली. 

भारत आणि इटली आपली 'विशेष धोरणात्मक भागीदारी' पुढे नेण्याच्या आणि 2029 पर्यंत वार्षिक द्विपक्षीय व्यापार 20 अब्ज युरोवर नेण्याचे लक्ष्य गाठण्याच्या प्रयत्नात असल्याच्या पार्श्र्वभूमीवर या बैठका घेण्यात आल्या.
 


***


Shailesh Patil / Manjiri Ganoo / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2338116) अभ्यागत कक्ष : 12